Thursday, July 14, 2022

विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिका, दुधगांव बौध्द विहारातील - एक पथदर्शी उपक्रम

विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिका, दुधगांव 

बौध्द विहारातील - एक पथदर्शी उपक्रम 

ज्या समाजात मनुष्य जन्माला आला, त्या समाजाचे त्याच्यावर अनंत उपकार असतात. त्याच्या जडणघडणीत समाजाचा मोठा वाटा असतो. मनुष्य ज्या समाजाचे प्रतिनिधित्व करतो, त्या समाजाच्या उन्नतीसाठी, समाजाचं देणं फेडण्याचा, समाजाच्या ऋणातून उतराई होण्याचा प्रयत्न करत असतो. असाच एक प्रयत्न दुधगांव मधील काही तरुण एकत्र येऊन करत आहेत. विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने अभ्यासिका चालवत आहेत. या पथदर्शी उपक्रमाचा घेतलेला हा आढावा... 

1 जून 2022 रोजी दुधगांवमधील बौध्द वस्तीतील काही सुजाण तरुणांनी एकत्र येत, बौध्द विहारात समाजातील मुलांसाठी "विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिका" सुरू केली आहे. ही अभ्यासिका पूर्णतः मोफत आहे. 

समाजातील मुलांना अभ्यासाची, शिक्षणाची गोडी लागावी. त्यांना शिक्षणाचे महत्त्व समजावे. समाजातील मुलं शिक्षण प्रवाहात अखंड राहावीत. मुलांची गुणवत्ता वाढीस लागावी. भविष्यातील त्यांचा प्रवास सुकर व्हावा. ही मुख्य उद्दिष्टे डोळ्यासमोर ठेवून ही  अभ्यासिका सुरू करण्यात आली आहे. 

काल संध्याकाळी दुसऱ्यांदा अभ्यासिकेला भेट दिली. सारंकाही नजरेखाली घातलं. खूप छान वाटलं. स्वतःहून अभ्यास करणारी, अडचण आली तर प्रमुखाला विचारणारी, खालच्या वर्गातील विद्यार्थ्यांचा अभ्यास घेणारी मुलं पाहून, प्रसन्न वाटलं. 

पहिली ते दहावी पर्यंतचे तब्बल 38 विद्यार्थी नियमितपणे या अभ्यासिकेला उपस्थित असतात. येत्या काळात ही संख्या नक्कीच वाढेल. ही मुलं शाळेत दिलेला अभ्यास इथं पूर्ण करतात. न समजलेल्या संकल्पना अभ्यासिकेच्या प्रमुखांकडून समजून घेतात. मोठी मुलं लहान मुलांचा अभ्यास घेतात. कोणी लिखाण करत बसतं, तर कोणी वाचन करतं बसतं. प्रत्येक विद्यार्थी प्रामाणिकपणे अभ्यास करताना दिसतो. 

समाजातील काही सुशिक्षित तरुण स्वेच्छेने पुढाकार घेऊन समयदान करत आहेत. प्रत्येकाने एक दिवस वाटून घेतला आहे. त्या दिवशी संध्याकाळी 6 ते 8 असे दोन तास, हे तरुण अभ्यासिकेसाठी देतात. नियोजनाप्रमाणे दिलेली जबाबदारी पार पाडतात. अभ्यासिकेतील विद्यार्थ्यांचं संनियंत्रण करणं, त्यांना मार्गदर्शन करणं, त्यांच्या अडीअडचणी सोडवणं. एखादा विद्यार्थी अनुपस्थित असल्यास, लगेच त्याच्या पालकाला फोन करणं, माहिती घेणं. पालकांचं प्रबोधन करणं. इत्यादी कामं हे तरुण अगदी आनंदानं करतात. 

या अभ्यासिकेच्या माध्यमातून अनेक चांगल्या गोष्टी समाजात घडत असल्याचं जाणवलं. समाजातील तरुण आपल्या वाढदिवसाचा खर्च टाळून, अभ्यासिकेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देत आहेत. हा बदल नक्कीच सुखावह आहे. याचसोबत अभ्यासिकेला भेट देणारे गावातील मान्यवर देखील खाऊ अथवा शैक्षणिक साहित्य देऊन मुलांचा व तरुणांचा उत्साह वाढवत आहेत.

काल अभ्यासिकेत बालवाडीतील दोन चिमुकल्या मुलीही अभ्यासिकेत दिसल्या. इतर मुलांचं त्याही अनुकरण करत होत्या. अंकलिपीतील चित्रं वाचत होत्या. वहीत लेखन करत होत्या. प्रमुखाला दाखवत होत्या. शाबासकी मिळवत होत्या. अगदी बालवयातच शिक्षणाची गोडी लागत आहे. हे या अभ्यासिकेचं यशच म्हणावं लागेल.

श्री.मनोज मेकवान व श्री.अमोल कांबळे ( मुंबई पोलीस)हे दोघे या उपक्रमाचे मुख्य आधारस्तंभ आहेत. मनोज माझा वर्गमित्र. त्याच्या हातून खूप चांगलं काम होतं आहे. याचा मनस्वी आनंद आहे. 

अभ्यासिकेचा हा उपक्रम सर्वांसाठी पथदर्शी आहे. कोरोना काळात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी गावागावात अशी अभ्यासिका सुरू व्हायला हव्यात. "विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिका, दुधगांव" ही अभ्यासिका निरंतर चालत रहावी. यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा...!!!








No comments: