Wednesday, August 31, 2022

डॉ.अर्चना थोरात - 'रेडिओ शुगर' चा वैभवशाली आवाज...



डॉ.अर्चना थोरात - 'रेडिओ शुगर' चा वैभवशाली आवाज...

काल रात्री मन थोडं उदास झालं. भूतकाळात गेलं. "यशवंत- एक प्रेरणास्रोत" या माझ्या लेखमालेचा, 'रेडिओ शुगर' वर प्रसारित झालेला "दीपस्तंभ" मधील 2 मे 2022 रोजी प्रसारित झालेला पहिला भाग आठवला.

"परिस्थिती कशीही असली तरी, मनस्थिती बिघडू न देता, परिस्थितीवर मात केलेल्या जिद्दीचा प्रवास ... दीपस्तंभ. लेखक संदीप पाटील, दुधगांव." माझं नाव अन् पहिली कथा ऐकताना मला झालेला आनंद अवर्णनीय होता. आजही हा आनंद जसाच्या तसाच आहे. 

हे सारं आठविण्याचं आणि उदास होण्याचं कारण म्हणजे, 
" सर...
उद्या माझ्या आवाजातील दीपस्तंभ चा शेवटचा भाग....🙏🙏 " 
हा 'रेडिओ शुगर'च्या डॉ.अर्चना थोरात मॅडम यांचा रात्री आलेला व्हाट्सअपवरील मेसेज. 

डॉ.अर्चना थोरात मॅडम म्हणजे 'रेडिओ शुगर' च्या प्रोग्रॅम मॅनेजर. 'दीपस्तंभ' च्या निर्मात्या अन् सादरकर्त्या. 

त्या सांगलीच्या. वडील श्री.विलास चव्हाण पत्रकार तर, आई प्राथमिक शिक्षिका. थोरात मॅडम या उत्तम वक्त्या. 100 हून जास्त वक्तृत्व स्पर्धेत त्यांनी जेतेपद मिळवलं. एम.ए. अर्थशास्त्र, LL.M., SET, Ph.D. in Law असं त्यांचं शिक्षण. "समाज माध्यमावरील खाजगीपणाचा अधिकार" या विषयावर त्यांनी प्रबंध सादर करत त्यांनी डॉक्टरेट मिळविली. शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरची "सर्वोत्कृष्ट विद्यार्थिनी" म्हणून राष्ट्रपती शंकर दयाळ शर्मा राष्ट्रपती सुवर्णपदक त्यांनी पटकावलं आहे. याचसाठी राजभवनात राज्यपाल एस. सी.जमीर यांच्या हस्ते येथे त्यांचा सन्मान करण्यात आला. 

डॉ अर्चना थोरात मॅडम यांना सांगली आकाशवाणी येथे 4 वर्षांचा निवेदक म्हणून अनुभव असल्यानं, 'रेडिओ शुगर' मध्ये संधी मिळाली. त्यांनी मिळालेल्या संधीचं सोनं केलं. कथा, कविता, पुस्तकवाचन, समीक्षण, प्रवास वर्णन, व्यक्ती चित्रणे असे विविध विषय त्यांनी हाताळले. राजघटना मराठीत सांगितली. आरोग्य संपदा, सुभाषित रत्नांनी, कायदा फायद्याचा, मैत्रीण डॉटकॉम, Behind The Curtain असे अनेक कार्यक्रम त्यांनी स्वतः केले. यामुळेचं डॉ.अर्चना थोरात हे नाव सर्वश्रुत झालं. कायद्याच्या जागृकतेविषयी त्यांनी केलेल्या कार्यक्रमामुळे AICTE चा लीलावती अवॉर्ड RIT ला मिळाला.

वाळवा पंचायत समिती, इस्लामपूर आयोजित 'बालसाहित्य संमेलनात' त्यांची अन् माझी पहिली भेट झाली. सौ. आयेशा नदाफ मॅडम यांनी ओळख करून दिली. त्याचवेळी मी "यशवंत- एक प्रेरणास्रोत" विषयी त्यांना सांगितलं. त्यांनी फोन नंबर दिला आणि काही भाग पाठविण्यास सांगितलं. मी वेळ न दवडता, लगेचच पाठवून दिले. 

एप्रिल महिन्यांच्या शेवटच्या आठवड्यात डॉ.अर्चना थोरात यांचा फोन आला. "2 मे पासून तुमच्या लेखमालेचं प्रसारण करतो आहोत. तुमची काही हरकत आहे का ?" मी लगेच होकार कळवला. अन् प्रसारण सुरूही झाले. सकाळी 7 चा प्राईम टाईम मिळाला. उदंड प्रतिसाद मिळाला. डॉ.अर्चना थोरात यांच्याशी फोनवर संपर्क आणि भेटी वाढल्या. यातूनच त्यांच्या अभ्यासू व्यक्तिमत्वाची ओळख झाली. 

"तुमच्या 'दीपस्तंभ' ने माझ्या दिवसाची सुरुवात होत असते. छान लिहिता." अशी प्रतिक्रिया ना. जयंतरावजी पाटील यांचे निकटवर्तीय श्री.संजय पाटील बापू यांनी दिली.

आज सकाळी 7 वाजता डॉ.अर्चना थोरात यांच्या आवाजातील 'दीपस्तंभ'चा अंतिम भाग ऐकला. त्यांची भारती विद्यापीठचे यशवंतराव चव्हाण लॉ कॉलेज, कराड येथे "सहाय्यक प्राध्यापक" पदी निवड झाल्यानं, 'रेडिओ शुगर' वर त्यांचा आवाज आता दररोज ऐकायला मिळणार नाही. 

'संदीप पाटील, दुधगांव' हे नाव घराघरात पोहचलं. ते 'रेडिओ शुगर' अन् 'डॉ.अर्चना थोरात मॅडम' यांच्या मुळंच. उद्या 1 सप्टेंबर पासून 'रेडिओ शुगर' वर डॉ.अर्चना थोरात यांचा आवाज ऐकायला मिळणार नसला तरी, त्यांच्या आवाजानं मनामनात घर केलं आहे. हे नक्की. 

'डॉ.अर्चना थोरात मॅडम' यांना पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा...!!! 

धन्यवाद...!!!

No comments: