Saturday, September 3, 2022

तिसरी पासून शाळेतच न गेलेल्या चि.जीत पवार ची यशोगाथा...

तिसरी पासून शाळेतच न गेलेल्या चि.जीत खंडेराव पवार चे NMMS परीक्षेत उज्ज्वल यश...



दुधगांव मधील चि.जीत खंडेराव पवार या विद्यार्थ्याने NMMS परीक्षेत उज्ज्वल यश संपादन करून, स्वतःचा एक वेगळा ठसा उमटवला आहे. तो भाऊसाहेब कुदळे विद्यालय, दुधगांव चा विद्यार्थी आहे. 

ड्यूकेन मस्क्युलर डिस्ट्रोफी (डीएमडी) या स्नायू विकाराने ग्रस्त आहे. ड्यूकेन मस्क्युलर डिस्ट्रोफी हा एक अनुवांशिक विकार आहे. ड्यूकेन मस्क्युलर डिस्ट्रोफीचे प्राथमिक कारण डिस्ट्रोफिन (स्नायू प्रथिने) साठी कोड बनवणाऱ्या जिन्स मधील दोष आहे. डिस्ट्रोफिनशिवाय शरीरातील स्नायू योग्यरित्या कार्य करू शकत नाही. अनुवंशिकता नसूनही स्वयंचलित म्युटेशनमुळे ड्यूकेन मस्क्युलर डिस्ट्रोफी होऊ शकतो.

स्नायूंचे कार्य सुरळीत आणि वाढ होत नसल्यामुळे, जीत स्वतःच्या पायावर उभा राहू शकत नाही. तसेच, स्वतःच्या हालचाली स्वतः करू शकत नाही. यामुळे तो इयत्ता तिसरीपासून शाळेत जाऊ शकला नाही. शिकू शकला नाही. परंतु, अशा प्रतिकूल परिस्थितीतही त्याने आपले स्वयंअध्ययन सुरूच ठेवले. 

कोरोनाजन्य परिस्थितीत शाळा बंद झाल्या. ऑनलाइन शिक्षण सुरू झाले. तेव्हा, मात्र शाळेतील शिक्षकांना जीत च्या बौद्धिक क्षमतेची जाणीव झाली आणि खऱ्या अर्थाने त्याच्या शिक्षणाला सुरुवात झाली.

एकीकडे कोरोनासारखी परिस्थिती जगाला शाप ठरत असतानाच, जीतला मात्र ही परिस्थिती वरदान ठरली. ऑनलाईन शिक्षण सुरू झाले. केवळ शाळेवर विसंबून न राहता, त्याने आपल्या ज्ञानाची कक्षा विस्तृत केल्या. जगभरातील तज्ञ शिक्षकांकडून तो शिकू. लागला. अगदी अमेरिकेतील शिक्षकांकडूनही तो शिकतो आहे. अशाप्रकारे त्याचं शिक्षण सुरू आहे.

जीत वेगवेगळ्या ऑनलाइन परीक्षा नियमितपणे देत असतो. NMMS सारख्या परीक्षेची तयारी देखील त्याने स्वयं अध्ययनाद्वारेच केली. या परीक्षेत त्यांनी मिळवलेले, यश अभूतपूर्व असेच आहे.

नोबल फाउंडेशन,जळगावच्या वतीने आयोजित करण्यात येत असलेल्या नोबल सायन्स टॅलेंट सर्च एक्झाम (NSTSE) मध्ये जीत ने यश संपादन केले आहे आणि अभिमानाची गोष्ट अशी की, संपूर्ण सांगली जिल्ह्यातून, इयत्ता आठवीतून निवड झालेला, जीत एकमेव विद्यार्थी आहे. या स्पर्धेत सलग तीन वर्षे यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांना ISRO आणि IIT सारख्या संस्थांची सहल घडवली जाते. 

आमच्या कर्मवीर सार्वजनिक वाचनालय, दुधगांव च्या वतीने लॉकडाऊन काळात आयोजित करण्यात आलेल्या "कर्मवीर टॅलेंट सर्च" या परीक्षेतही जीतने द्वितीय क्रमांक पटकावून आपल्या बुद्धी कौशल्याची चुणूक दाखवून सर्वांनाच प्रभावित केले आहे. 

चि.जीत पवारला विज्ञान विषयाची प्रचंड आवड आहे. त्याचा या विषयाचा गाढा अभ्यास आहे. येत्या काळात तो एक नामवंत शास्त्रज्ञ झाल्यास आश्चर्य वाटायला नको. 

ड्यूकेन मस्क्युलर डिस्ट्रोफी या रोगावरील औषध फक्त अमेरिकेत तयार होतं. एक ग्रॅमच्या औषधाची किंमत तब्बल अडीच लाख रुपये आहे. किमान 20 ग्रॅमची ऑर्डर असल्याशिवाय या औषधाचे रॉ मटेरियल निर्यात केलं जात नाही. बेंगलोरमध्ये या रॉ मटेरियलवर प्रक्रिया केली जाते. औषध तयार केले जाते आणि कलकत्त्यातील एका हॉस्पिटलमध्ये याचे इंजेक्शन दिली जाते. या औषधाच्या एका इंजेक्शन ची किंमत 65 हजार रुपये असून, प्रति आठवडा एक याप्रमाणे 5 इंजेक्शन जीतने घेतली आहेत. ड्यूकेन मस्क्युलर डिस्ट्रोफी या रोगावरील इंजेक्शन घेणारा चि.जीत संपूर्ण भारतातील पहिलाच आहे.

जीत चे वडील श्री खंडेराव पवार सर माझे चांगले मित्र. यामुळे बऱ्याचदा जीत शी प्रत्यक्ष भेटणं, बोलणं झालं. त्याच्या आईवडिलांकडून जीत बद्दल खूप काही ऐकलं. यातून त्यांच्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाची जाणीव झाली. तो प्रचंड जिद्दी, आत्मविश्वासू आणि सकारात्मक विचाराचा आहे. त्याचा आजवरचा प्रवास त्याच्या प्रबळ इच्छा शक्तीच्या बळावर यशस्वी झाला आहे. याच इच्छाशक्तीच्या बळावर तो स्वतःच्या पायावर उभं राहणारच. यात कसलीही शंका नाही. त्याच्या या संघर्षात आपण सर्वांनी त्याला आर्थिक अन् मानसिक पाठिंबा खंबीरपणे द्यायला हवा...

चि.जीतच्या यशाबद्दल त्याचे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा...!!!


धन्यवाद...!!! 

No comments: