Wednesday, September 14, 2022

15 वर्षांनंतर मित्राची भेट...

यशवंत - एक प्रेरणास्रोत 

15 वर्षांनंतर मित्राची भेट...

श्री. संदिप पाटील, दुधगांव, 9096320023.



परवा विलिंग्डन महाविद्यालय, सांगली येथे NAS परीक्षा कार्यशाळा संपन्न झाली. अगदी नाईलाजानेच उपस्थित होतो. 


पहिलं सत्र संपलं. तसा मी जेवण करण्यासाठी बाहेर पडलो. सहकारी मित्र उमेश डोहाळे सर यांच्याशी काही क्षण बोलत उभा राहिलो. तोवर मंदार नलवडे सर आणि प्रवीण तळप सर हे माझे सोबती पुढे निघून गेले. मलाही त्यांच्या सोबत जायचं होतं. म्हणून डोहाळे सरांना निरोप देऊन, मी पुढे निघालो. प्रशिक्षणाला आलेला माझ्या वयाचाच, एक प्रशिक्षणार्थी माझ्याकडे एकटक बघत आहे. हे मला जाणवलं. मीही त्याच्याकडे पाहिलं. चेहरा अनोळखी होता. पण, तरीही मी त्याच्याकडे पाहिलं. तो मला पाहून हसला आणि म्हणाला, "ओळखलं का ? " क्षणभर मी विचारात पडलो आणि माझ्या मुखातून चटकन नाव आलं, "प्रशांत सातपुते काय ?" हे नाव उच्चारताच त्याचा चेहरा खुलला, मिठीत आला आणि म्हणाला "बरोबर ओळखलंस मित्रा."


प्रशांत सातपुते. गुरुजन अध्यापक विद्यालय,पाटण येथील डी.एड्.(2005 ) चा वर्गमित्र. पाटण मधील पहिल्या दिवसापासून तो माझा रूम पार्टनर. त्यामुळे त्याच्याशी चांगलीच मैत्री जमली. मी, प्रशांत, राहुल कोळी, राजू नाटेकर (रत्नागिरी), श्रीकांत बाबर ( श्रीकांत) आणि मनीष खरात (संभाजीनगर) असे सहाजण पानस्कर नामक व्यक्तीच्या खोलीत एकत्र राहायचो. 


गुरुजन अध्यापक विद्यालय, पाटण येथे दोन महिनेच शिकलो. त्यात दिवाळी सुट्टी एक महिना. मी आणि राहुल दोघंही आष्टा येथील लठ्ठे अध्यापक विद्यालयात आंतरजिल्हा बदली ने हजर झालो. राजू चिपळूणला, तर प्रशांत जत येथील अध्यापक विद्यालयात बदलून गेला. 


त्याकाळी आजच्या मोबाईल सारखी संदेहवहन व्यवस्था नसल्याने, नंतरच्या काळात आमचा संपर्क झालाच नाही. नाही म्हणायला, 2007 एकदा आष्टा येथे अध्यापक विद्यालय जिल्हांतर्गत क्रीडा स्पर्धेसाठी प्रशांत भेटला होता. एकमेकांच्या खांद्यावर हात टाकून क्रीडा स्पर्धेचा आनंद आम्ही घेतला होता. नंतर प्रशांत कधी भेटलाच नाही. 


नोकरीला लागलो. काळा जगात प्रशांत व्यतिरिक्त सर्व रूम पार्टनर चा संपर्क झाला. शाळा, घर, लेखन अन् व्यवसायात रमलो. प्रशांतला विसरलोच. पण, पंधरा वर्षांनंतर परवा 'प्रशांत सातपुते' या जुन्या मित्राची भेट झाली अन् खुप आनंद झाला. खूप साऱ्या गप्पा झाल्या. एकत्र खाणं झालं. 'तूप, गूळ आणि चपाती' हे माझं आवडतं मिश्रण. प्रशांत च्या डब्यातलं हे मिश्रण खाताना, तर मला अत्यानंद झाला. 


माझा फोन नंबर, माझी शाळा अन् माझं लेखन याची इतंभूत माहिती प्रशांतकडे आहे. पण, त्याची माहिती माझ्याकडे नाही, याचं शल्य मला जाणवलं. प्रशांतच्या अगदी लहानपणी वडील वारले. परंतु, अगदी जिद्दीने आणि नेटाने अभ्यास करून, त्याने नोकरी मिळवली. सुरुवातीला सोलापूर जिल्ह्यात नोकरीला लागला. तेही, घरापासून अगदी दहा मिनिटांच्या अंतरावर. आंतरजिल्हा बदलीने सांगलीत आला. पण, घरापासून 40 किलोमीटर अंतरावर असलेल्या जाडरबोबलाद केंद्रातील एका शाळेवर त्याची नेमणूक मिळाली. अशी जुजबी माहिती मला मिळाली. आता काय प्रशांत चा फोन नंबर असल्याने, येत्या काळात त्याच्या बद्दल खूप सारी माहिती मिळेल. यात शंका नाही.


मित्रांची भेट हे जगण्याचं टॉनिक असतं. असं टॉनिक प्रशांत रूपाने परवा मिळालं. याचं विलक्षण आनंद होतो आहे. 


धन्यवाद...!!!

No comments: