Tuesday, September 5, 2023

श्री. प्रसाद हसबनीस सर यांना क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार जाहीर झाले निमित्ताने...

श्री. प्रसाद हसबनीस सर यांना क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार जाहीर झाले निमित्ताने...



आवडीच्या क्षेत्रात करिअर करणं प्रत्येकाचं स्वप्नं असतं. पण, परिस्थितीनं स्वप्नं पूर्ण करणं हरेकालाच जमेल असं नाही. म्हणून अनेकजण मार्ग बदलतात. आलेल्या परिस्थितीला तोंड देतात. नाउमेद न होता कष्ट करतात आणि प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर, यशाचं शिखर गाठतात. मग अशा व्यक्तींचा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी बनतो. असंच एक प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व म्हणजे श्री. प्रसाद राजाराम हसबनीस सर. ज्यांना नुकताच क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यांच्या आजवरच्या वाटचालीवर टाकलेला हा प्रकाश...


श्री प्रसाद हसबनीस यांचा जन्म शिराळ्यातील अगदी सर्वसामान्य कुटुंबातला. एकत्र कुटुंब आणि कमावणारे हात कमी अशा परिस्थितीत घरातील, शेतातील कामे, गाई-म्हशींचे दूध काढणे आदी कामे करूनच त्यांना शाळेत जाता येई. अशा परिस्थितीतही उत्तम गुणांनी त्यांनी बारावीपर्यंतचे शिक्षण घेतले. इंजिनिअरिंग करण्याची प्रबळ इच्छा असूनही घरच्या बिकट आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना प्रवेश घेता आला नाही. मग नाईलाज म्हणून डी.एड. करण्याचा आणि शिक्षक होण्याचा मार्ग त्यांनी निवडला.


मुळातच शांत, हुशार, मनमिळावू आणि अभ्यासू असणाऱ्या हसबनीस सरांनी डी.एड. कॉलेजमध्ये प्रथम येण्याचा मान मिळवला. 

डी.एड. नंतर एक वर्ष खाजगी शिकवणी घेणे फॅब्रिकेटरकडे रंगकाम करणे अशी ही कामे करून कुटुंबाला त्यांनी कुटुंबाला हातभार लावला.


जि.प. शाळा पिंपळवट, ता. गुहागर. जि. रत्नागिरी येथून त्यांच्या नोकरीचा श्रीगणेशा झाला. येथे त्यांनी पाच वर्षे अतिशय तन्मयतेने आणि तळमळीने काम केले. नंतर ते आंतरजिल्हा बदलीने स्व: जिल्ह्यात आले. जि.प. शाळा पुणदी ता. पलूस ही त्यांची सांगली जिल्ह्यातील पहिली शाळा. जि.प. शाळा तुपारी, जि.प. शाळा गोटखिंडी नं. 1 या त्यांच्या आजवरच्या शाळा. सध्या ते जि.प. शाळा विठ्ठलवाडी या शाळेत उपशिक्षक पदावर कार्यरत आहेत. आजवर त्यांची 22 वर्षे सेवा झाली आहे. 


श्री. हसबनीस सरांनी स्काऊट अंतर्गत कब विभागात अतिशय उल्लेखनीय कार्य केले आहे. त्यांच्या 27 विद्यार्थ्यांना सुवर्णबाण हा राष्ट्रीय पुरस्कार तर 41 विद्यार्थ्यांना राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाला आहे. इंग्रजी विषय तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून त्यांनी दर्जेदार काम केले आहे. विद्यार्थ्यांच्या विविध स्पर्धांमध्ये जिल्हा, राज्य व राष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभाग व उल्लेखनीय यश प्राप्त झाले आहे.


जि. प. सांगलीच्या अनेक उपक्रमात त्यांचा सहभाग असतो. हॅपिनेस प्रोग्रॅम, डॉ. पतंगराव कदम शिष्यवृत्ती परीक्षा इ. 4 थी च्या मार्गदर्शिका लेखनात तसेच जि. प. च्या DIGI School ॲप निर्मितीत त्यांचा सहभाग अतिशय महत्त्वाचा आहे. यासोबतच SCERT , DIKSHA, बालभारती व्हर्च्युअल क्लास यामध्येही त्यांनी तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून काम केले आहे.  


एक तंत्रस्नेही शिक्षक म्हणून त्यांची ख्याती आहे. शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती, यूट्यूब चॅनेल, ब्लॉग निर्मिती, शैक्षणिक पीडीएफ निर्मिती, ऑनलाईन टेस्ट निर्मिती या आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने ते अध्यापन करत असतात. सरांचा समाज संपर्क खूप चांगला आहे. या माध्यमातून त्यांनी शाळेसाठी आजवर ₹ 20 लाखांपेक्षा अधिक रकमेचा लोकसहभाग जमा केला आहे. 


श्री. हसबनीस सर हे एक उपक्रमशील शिक्षक म्हणून ख्यात आहेत. हस्ताक्षर सुधार, पाढे व इंग्रजी स्पेलिंग पाठांतर, इंग्रजी संभाषण, किल्ले बनवा, संगीत शिक्षण, अभिव्यक्ती दहीहंडी, वाचन प्रेरणा या सारखे नाविन्यपूर्ण उपक्रम त्यांनी राबविले आहेत. याबरोबरच ते शाळेत अनेक पर्यावरणपूरक उपक्रम राबवित असतात. वृक्षारोपण, फटाके नको, पुस्तके वाचू, ग्राम स्वच्छता, निर्माल्य संकलन यासारख्या उपक्रमातून त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धन विषयक जाणीव जागृती केली आहे. 


ते एक उत्तम लेखक आहेत. त्यांनी आजवर विविध विषयांवर 5 पुस्तके लिहिली आहेत. तसेच राज्यस्तरीय दैनिकात सामाजिक आणि शैक्षणिक विषयावर लेख प्रसिद्ध झाले आहेत.


श्री. हसबनीस सर आणि माझी पहिली भेट वाळवा पंचायत समिती इस्लामपूर आयोजित गुणवत्ता कक्षाच्या बैठकीत झाली. आम्ही दोघेही सदस्य आहोत. पंचायत समिती माध्यमातून उभारण्यात आलेल्या डिजिटल स्टुडिओ च्या उभारणीत आम्ही सोबत काम केले आहे. वेळोवेळी झालेल्या भेटीतून सरांच्या स्वभावाचा अंदाज आला. ते एक मितभाषी, शांत आणि संयमी असल्याचे आणि एक उपक्रमशील आणि आदर्श शिक्षक असल्याचे जाणवले. आज महाराष्ट्र राज्य सरकारने क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार देऊन ते एक आदर्श शिक्षक आहेत यावर शिक्कमोर्तब केले आहे. 


श्री. प्रसाद हसबनीस सरांचे हार्दिक अभिनंदन आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी सॉलिड शुभे

च्छा...!


धन्यवाद...!

No comments: