Wednesday, August 16, 2023

कर्मवीर भाऊराव पाटील पुतळा सुशोभीकरण लोकार्पण सोहळ्याच्या निमित्ताने

🎯 यशवंत - एक प्रेरणास्रोत
🎯 कर्मवीर भाऊराव पाटील पुतळा सुशोभीकरण लोकार्पण सोहळ्याच्या निमित्ताने 
🎯 श्री. संदिप पाटील, दुधगांव. 9096320023.


15 ऑगस्ट 2023 रोजी श्री. यशवंत आकाराम कोले गुरूजी (कुंभोज) माजी मुख्याध्यापक यांच्या हस्ते कर्मवीर भाऊराव पाटील पुतळा सुशोभीकरण कार्याचे लोकार्पण करण्यात आले. अध्यक्षस्थानी या सुशोभीकरण कार्याचे प्रमुख संकल्पक श्री. सुनील पाटील (CA) होते.

5 ऑक्टोंबर 2022 रोजी दुधगांव आणि परिसरातील कर्मवीरप्रेमींच्या उपस्थितीत या कार्याचा शुभारंभ करण्यात आला होता. वरवर सोपं वाटणारं हे काम अतिशय क्लिष्ट आणि किचकट होतं. परंतु, अत्यंत नेटकं नियोजन असल्यानं हे कार्य अगदी 9 महिन्यात अंतिम टप्प्यात पोहचलं. 

कर्मवीर भाऊराव पाटील यांचा पुतळा पाहिला की पाहतंच रहावं असं, सुरेख, सुंदर अन् देखणं काम सुशोभीकरणाच्या माध्यमातून झालं आहे. पुतळा आणि परिसर पाहून मन अगदी प्रसन्न होतं आहे.

तब्बल 18 लाख रुपयांचा खर्च या कार्यासाठी अपेक्षित होता. इतका मोठा निधी लोकसहभागातून उभं करणं मोठं आव्हान होतं. परंतु, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्यावर श्रद्धा असणाऱ्या असंख्य देणगीदारांच्या सहकार्यातून इतकी मोठी रक्कम जमा करणं सहज शक्य झालं. समितीतील प्रत्येकाने आपलं घरचं कार्य समजून वेळ, पैसा आणि श्रम या तिन्ही गोष्टी खर्च करून, कार्य पूर्णत्वास नेलं. 

हा संपूर्ण सोहळा अराजकीय होता. ज्या व्यक्तींच्या श्रमातून इतकं भव्य आणि दिमाखदार काम उभं राहिलं, त्या प्रत्येक कारागीर अन् कामगारांचा यथोचित सन्मान या कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

1956 साली कर्मवीर रुग्णालयात होते, तेंव्हा आठ दिवस त्यांची सेवा करणाऱ्या श्री.यशवंत आकाराम कोले गुरूजी (कुंभोज) यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. कर्मवीरांची सेवा करणाऱ्या व्यक्तीच्या हस्ते लोकार्पण झालं. म्हणून हा सोहळा अनेक अर्थांनी वैशिष्ट्यपूर्ण आहे. 

समितीतील सदस्यांच नेटकं अन् सूक्ष्म नियोजन,अचूक निर्णय, आर्थिक पारदर्शकता, सहकार्य वृत्ती, कमालीचा उत्साह, अपार आणि अजोड कष्ट , सोबत देणगीदारांचा विश्वास या बळावर हे लोककार्य पूर्णत्वास आलं आहे. 

कर्मवीर भाऊराव पाटील पुतळा सुशोभीकरण करण्यासाठी देणगी देऊन, वेळ देऊन, श्रमदान करून सहकार्य करणाऱ्या, सर्व महान व्यक्तींचे, दात्यांचे समितीच्या वतीने मनःपूर्वक आभार...! आपले सहकार्य असेच सोबत असावे, हीच एक विनंती...! धन्यवाद..!

No comments: