Sunday, April 28, 2024

यशवंत - एक प्रेरणास्रोत भाग - 217


🎯 *यशवंत - एक प्रेरणास्रोत*
🎯 *भाग - 217*
🎯 *श्री.संदीप पाटील,दुधगाव. 9096320023.*

https://sandeepbalgondapatil.blogspot.com/2024/04/217.html




"परिस्थिती कशीही असली तरी, मनस्थिती बिघडू न देता, परिस्थितीवर मात केलेल्या जिद्दीचा प्रवास...*यशवंत - एक प्रेरणास्रोत*"

दर रविवारी प्रसारित होणारी एक प्रेरणादायी कथा मालिका...

https://sandeepbalgondapatil.blogspot.com/2024/04/217.html


केवळ सातशे पन्नास रुपयांसाठी नाईट क्लब मध्ये गाणे जाणाऱ्या एका भारतीय गायिकेचा कॅब्रे सिंगर ते "द क्वीन ऑफ इंडियन पॉप" पर्यंतचा प्रेरणादायी प्रवास आजच्या भागात आपण जाणून घेणार आहोत...चला तर मग..

तिचा जन्म 7 नोव्हेंबर 1947 रोजी चेन्नई मधील एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. सहा भावंडात ती पाचवी होती. वडील मुंबई मध्ये पोलीस होते. त्यामुळे तिची संपूर्ण जडणघडण मुंबई मध्ये झाली. 

तिच्या घरात संगीतमय वातावरण होते. तिचे आईवडील पाश्चात्य, शास्त्रीय, हिंदुस्थानी आणि कर्नाटक संगीत ऐकत असत. भीमसेन जोशी, बेगम अख्तर, किशोरी अमोणकर आणि गुलाम अली खान या सारख्या मातब्बर गायकांचे गाणे घरातिक रेडीओवर सातत्याने ऐकले जायचे होते. हाच तिच्यावर झालेला पहिला संस्कार होय. सातत्याने ऐकल्याने तिला गायनाची गोडी निर्माण झाली. 

तिचे शिक्षण कॉन्व्हेंट शाळेत झाले. तिने संगीताचे धडे घेण्याचा विचार केला. पण, "तुझा आवाज संगीतात बसत नाही." असे सांगून तिला संगीत वर्गातून हाकलून दिले. यामुळे ती नाराज झाली नाही. ती सतत प्रयत्न करत राहिली. तिच्या प्रयत्नांना यश आले. संगीत शिक्षकांनी तिला संगीत शिकविण्यास सुरुवात केली. वयाच्या नवव्या वर्षी तिने पहिल्यांदा रेडीओवर गायन केले. तेंव्हापासून तिची गायनाची धडपड सुरू झाली. 

सन 1969 मध्ये वयाच्या 20 व्या वर्षी नाईट क्लबमधून तिच्या गाण्याच्या कारकिर्दीला सुरुवात केली. चेन्नईतील एका नाईट क्लबमध्ये मासिक सातशे पन्नास रुपये पगारावर पहिल्यांदा लोकांसमोर गाणे गायले. कांजीवरम साडी अन् कपाळावर रूपया एव्हढी बिंदी तिचा असा पारंपरिक पेहराव पाहून प्रेक्षकांनी तिला टोमणे मारायला सुरुवात केली. "ही काय गाणार ? या अम्मा इथे काय करायला आल्या आहेत ?" या सारख्या प्रश्नांनी तिचा आत्मविश्वासमुळे डळमळीत करण्याचा प्रयत्न केला गेला. परंतु, स्वतःवरच्या गाढ विश्वासाने, अतिशय शांतपणे गायनाच्या माध्यमातून उपस्थित सर्वांच्या प्रश्नाचे तडाखेबाज उत्तर दिले. तिच्या परफॉर्मन्सनंतर सगळेच थक्क झाले. यानंतर त्याला कलकत्ता येथील प्रसिद्ध क्लब 'ट्रिंकन्स'मध्ये गाण्याची संधी मिळाली.

दिल्ली येथील हॉटेल ओबेरॉय मध्ये तिला गाण्याची संधी मिळाली. योगायोगाने या ठिकाणी प्रसिद्ध अभिनेते देवानंद आले होते. तिच्या गाण्याने ते प्रभावित झाले आणि आपल्या "हरे कृष्ण हरे राम" चित्रपटात "दम मारो दम" हे गाणे गाण्यासाठी तिला ऑफर देण्यात आली. पण, चित्रपट सृष्टीतील अंतर्गत राजकारणाने तिचीही संधी हिरावून घेतली गेली. चित्रपटसृष्टीत आलेल्या पहिल्या अनुभवाने निराश झाली परंतु, तिने प्रयत्न करणे थांबवले नाही. तिच्या भारदस्त आवाजामुळे या चित्रपटात तिला एक छोटी इंग्रजी कविता गाण्याची संधी मिळाली.

स्वतःवर विश्वास असणारी माणसं किती अडचणी आल्या, तरी थांबत नाहीत. आपले काम करत राहतात. सातत्याने प्रयत्न करत राहिल्याने यश त्यांच्या पायाशी लोळण घेतं. असंच काहीसं तिच्या बाबतीत घडलं. 80 च्या दशकात तिने पुन्हा एकदा "दम मारो दम" हे गाणं स्वतःच्या आवाजात सादर केलं. तिच्या आवाजाने ते गाणं इतकं भारदस्त झालं की, आज जनमानसात मूळ गाणं तिनंच गायलं आहे. असा समज निर्माण झाला आहे. 

तिच्या आवाजाने चित्रपटसृष्टीत तिने स्वतःची ओळख निर्माण केली. "भारताची पहिली पॉप सिंगर" म्हणून तिची ओळख निर्माण झाली. ती भारताची पहिली पॉप सिंगर म्हणजेच उषा उथुप होय. 

उषा यांच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर अगदी पॉप आणि रॉकपर्यंत, उषा यांनी हिंदी, आसामी, मल्याळम, तमिळ, बांगला, आणि गुजराती यासह अनेक भाषांमध्ये गाणी गायली आहेत. त्यांनी एकूण 17 भारतीय आणि आठ परदेशी भाषांमध्ये गाणी गायली आहेत, हा एक विक्रम आहे. 

एका नाईट क्लब पासून सुरू झालेला उषा यांचा प्रवास "भारताची पहिली पॉप सिंगर" पर्यंत येऊन पोहोचला. या प्रवासात अनंत अडचणींना सामोरे जावे लागते. करिअरमधील अडचणींसोबतच, कौटुंबिक अडचणींना त्यांनी तोंड दिले आहे. चित्रपट सृष्टीतील मानाचा फिल्मफेअर पुरस्कार त्यांना मिळाला आहे. सन 2024 मध्ये भारत सरकारने त्यांना पद्मभूषण हा मानाचा पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला आहे. म्हणूनच, त्या एक यशवंत आहेत.

मागील भाग वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://sandeepbalgondapatil.blogspot.com/2024/04/216.html

धन्यवाद...!