Sunday, March 31, 2024

यशवंत - एक प्रेरणास्रोत भाग - 213

🎯 *यशवंत - एक प्रेरणास्रोत*

🎯 *भाग - 213*

🎯 *श्री.संदीप पाटील,दुधगाव. 9096320023.*




"परिस्थिती कशीही असली तरी, मनस्थिती बिघडू न देता, परिस्थितीवर मात केलेल्या जिद्दीचा प्रवास...*यशवंत - एक प्रेरणास्रोत*"


दर रविवारी प्रसारित होणारी एक प्रेरणादायी कथा मालिका...

https://sandeepbalgondapatil.blogspot.com/2024/03/213.html



मित्रहो, तुम्हांला तिरंदाजी हा खेळ माहित आहेच. आपण या खेळामध्ये हाताचे असलेले अनन्यसाधारण महत्व जाणतो. परंतु, जर एखाद्या व्यक्तीला हातच नसतील, तर ती व्यक्ती या खेळप्रकारात नैपुण्य प्राप्त करू शकेल काय ? बहुतेक उत्तर नाही असेच येईल. पण मित्रहो, या सर्वप्रकारच्या अशक्यांवर भारतातल्या एका महिलेने मात केली आहे आणि ती जगातील पहिली हात नसलेली तिरंदाज महिला बनली आहे. कोण आहे ती तरुणी ? जाणून घेऊ आजच्या भागात...


10 जानेवारी 2007 रोजी जम्मू आणि काश्मीरमधील किश्तवाड जिल्ह्यातील लोईधर गावात तिचा जन्म झाला. फोकोमेलिया हा असाध्य आजार जन्मत: झाला. या रोगामुळे तिच्या हातांची वाढ झालीच नाही. तिचे वडील शेतकरी तर आई शेळ्या राखण्याचे काम करायची. 


हात नाहीत म्हणून, ती थांबली नाही. तिच्या दैनंदिन कामासाठी तिचे पाय तिचे हात बनले. जी काम हाताने करावी लागायची, तिच कामे ती पायाने लिलल्या करू लागले. 


"हात नसलेली व्यक्ती आयुष्यात काहीच करू शकणार नाही." असे नकारात्मक विचार तिच्या अवतीभोवती असणाऱ्या लोकांनी तिच्या मनी पेरले. परंतु, ती मनाने भक्कम होती, खंबीर होती. स्वतःवर तिचा गाधा विश्वास होता. काहीतरी करून दाखवण्याची उमेद मनात होती. त्यामुळेच नकारात्मक विचारांना तिने जरा देखील थारा दिला नाही. 


2019 साल तिच्या आयुष्यात टर्निंग पॉईंट ठरले. भारतीय सैन्य दलाने आयोजित केलेल्या किश्तवाडमधील एका कार्यक्रमात ती सहभागी झाली. या कार्यक्रमात तिच्यातील आत्मविश्वासाची दखल भारतीय रायफल्स युनिटने घेतली आणि तिच्या जादूमय प्रवासाची सुरुवात झाली. 


तिला तिरंदाजीत करिअर करायचं होतं. म्हणून प्रशिक्षकांनी कृत्रिम हात बसवण्यासंदर्भात विचार केला. परंतु तिच्या बाबतीत ते शक्य नव्हते. पायांच्या मदतीने हात नसतानाही ती झाडावर सहजतेने चढायची. म्हणून, तिच्या पायांचा वापर धनुर्विद्येसाठी करण्याचे ठरले. यावर बरेच मंथन झाले, प्रयोग झाले आणि हातांऐवजी पाय आणि छातीचा वापर करून चालवता येईल, असा धनुष्य तयार करण्यात आला. 


तिच्या खडतर प्रशिक्षणाला सुरुवात झाली. स्वतःवरचा विश्वास आणि प्रबळ इच्छा शक्तीच्या बळावर अगदी अत्यल्प कालावधीत तिने धनुर्विद्येतील कौशल्य प्राप्त केले. यामुळे प्रशिक्षक असणारे तर केंद्रातील सहकारी तिरंदाजदेखील प्रभावित झाले. 


प्रशिक्षणानंतर 11 महिन्यांच्या आत 

तिने आशियाई पॅरा गेम्समध्ये भाग घेतला. हँगझोऊ येथील पॅरा-आशियाई क्रीडा स्पर्धेत तीन पदके जिंकली आहेत. एक रौप्य पदक आणि दोन सुवर्णपदके तिने मिळवली आहेत. पॅरा वर्ल्ड आर्चरी चॅम्पियनशिपमध्ये अंतिम फेरीत पोहोचणारी आणि पदक जिंकणारी ती पहिलीच हातहीन महिला तिरंदाज ठरली. ती हातहीन महिला तिरंदाज म्हणजेच शीतल देवी होय. 


"जीवनात काहीतरी करून दाखवण्याची जिद्द मनात असेल आणि प्रयत्न करण्याची तयारी असेल, सारं काही शक्य आहे.” समोर कितीही संकटं आली तरी, त्यांना व्यक्तीच्या जिद्द आणि मेहनतीपुढे हार मानावी लागते. अंगी जिद्द आणि चिकाटी असेल तर, मनात असलेलं प्रत्येक स्वप्नं पूर्ण करता येतंच. याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे भारतीय महिला तिरंदाज शीतल देवी होय. 

 

शीतल देवी यांच्या कर्तुत्वाची दखल घेऊन भारत सरकारने त्यांना अर्जुन पुरस्काराने सन्मानित केले आहे. अर्जुन पुरस्कार जिंकण्यापूर्वी तिला आशियाई पॅरालिम्पिक समितीने वर्षातील सर्वोत्कृष्ट युवा खेळाडू म्हणूनही निवडले आहे. म्हणूनच, त्या एक यशवंत आहेत.


मागील भाग वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://sandeepbalgondapatil.blogspot.com/2024/03/212.html


धन्यवाद...!

No comments: