🎯 *यशवंत - एक प्रेरणास्रोत*
🎯 *भाग - 215*
🎯 *श्री.संदीप पाटील,दुधगाव. 9096320023.*
https://sandeepbalgondapatil.blogspot.com/2024/04/215.html
"परिस्थिती कशीही असली तरी, मनस्थिती बिघडू न देता, परिस्थितीवर मात केलेल्या जिद्दीचा प्रवास...*यशवंत - एक प्रेरणास्रोत*"
दर रविवारी प्रसारित होणारी एक प्रेरणादायी कथा मालिका...
https://sandeepbalgondapatil.blogspot.com/2024/04/215.html
एका आदिवासी कुटुंबात जन्माला येऊन देखील कारकुन, शिक्षिका ते देशाच्या प्रथम नागरिक पदापर्यंत मदत मजल मारणाऱ्या "पुती" या महिलेचा प्रेरणादायी प्रवास आजच्या भागात आपण जाणून घेणार आहोत. चला तर मग...
तिचा जन्म 20 जून 1958 रोजी ओडिसाच्या मयुरभंज जिल्ह्यातील बडीपोसी गावातील एका सर्वसामान्य आदिवासी कुटुंबात झाला. तिचे वडील शेतकरी होते. तिच्या कुटुंबीयांनी तिचे नाव पुती असे ठेवले.
पुती चे प्राथमिक शिक्षण गावातील शाळेत झाले तर पदवीचे शिक्षण भुवनेश्वर येथे झाले. तिने बीए पर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं. शिक्षण पूर्ण होताच तिला सरकारी नोकरी मिळाली. सुरुवातीला तिने कारकून म्हणून काम केले आणि पुढे तिची नियुक्ती कनिष्ठ सहाय्यक म्हणून झाली. यानंतर काही काळ तिने शिक्षिका म्हणूनही काम केले. पुती ने एका खाजगी संस्थेत शिक्षिका म्हणून नोकरी केली.
सन 1997 हे वर्ष पुती च्या जीवनाला कलाटणी देणारं वर्ष ठरलं. तिने राजकारणात प्रवेश केला. वार्ड काऊन्सलर म्हणून राजकीय कारकिर्दीला तिने सुरुवात केली. याकाळात तिने केलेल्या कामामुळे तिला पक्षाने नगरसेविका पदासाठी उमेदवारी दिली. आपल्या कार्यकर्तृत्वाचा बळावर ती निवडून आली आणि नगरपरिषदेची उपाध्यक्षही झाली.
अवघ्या तीन वर्षातच पक्षाचा तिच्यावरील विश्वास वाढला होता. त्यामुळेच तिला 2000 साली आमदारकीची उमेदवारी मिळाली. ती निवडून आली आणि राज्यमंत्रीपदी बनली. मिळालेल्या संधीचं तिनं सोनं केलं आणि स्वतःच एक वेगळं स्थान निर्माण केलं.
2015 साली पुतीला झारखंडची पहिली महिला आणि पहिल्या आदिवासी राज्यपाल म्हणून काम करण्याची संधी लाभली. याकाळातही तिने सर्वोत्तम काम केले. म्हणून सन 2021 साली पक्षाने तिचे नाव राष्ट्रपती पदासाठी घोषित केले आणि ती निवडूनही आली. भारताची दुसरी महिला राष्ट्रपती, स्वतंत्र भारतात जन्माला आलेली पहिली राष्ट्रपती आणि भारत देशाची पहिली महिला आदिवासी राष्ट्रपती होण्याचा मान पुतीला मिळाला. ती पुती म्हणजेच महामहीम द्रौपदी मुर्मु होय.
राष्ट्रपती मुर्मू यांचा हा जीवनप्रवास वरवर जरी सोपा वाटत असला, तरी तो फार खडतर आहे. राजकीय जीवनात त्यांना सर्व संधी मिळाल्या असल्यातरी कौटुंबिक जीवन शोकांतिकेनं भरलेलं आहे. लग्नानंतर सहा वर्षातच त्यांच्या पतीचं निधन आणि दोन मुलांचाही मृत्यू झाला आहे.
पतीच्या निधनानंतर कुटुंब सांभाळणारी महिला कोणतेही जबाबदारी नेटाने सांभाळू शकते. किती दुःख, संकट आले तरी, ती खंबीरपणे उभी राहू शकते. संकटाचा सामना करू शकते. राष्ट्रपती मूर्मु यांनी देखील जीवनात आलेल्या संकटांचा सामना करून, मोठमोठ्या जबाबदाऱ्या पार पडल्या आहेत. देशाचा राष्ट्रपतीपदाचा कार्यभार देखील त्या उत्तम प्रकारे सांभाळत आहेत.
एक कारकून, शिक्षिका ते राष्ट्रपती पदापर्यंतचा त्यांचा हा जीवनप्रवास केवळ भारतातीलच नव्हे, तर जगभरातील महिलांसाठी प्रेरणादायी आहे. म्हणूनच, त्या एक यशवंत आहेत.
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज जयंती. या निमित्ताने बाबासाहेबांना विनम्र अभिवादन...!
मागील भाग वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
https://sandeepbalgondapatil.blogspot.com/2024/03/214.html
धन्यवाद...!
No comments:
Post a Comment