Monday, November 12, 2018

यशवंत - एक प्रेरणास्रोत भाग 33

"अनंत अमुची ध्येयासक्ती अनंत अन् आशा किनारा तुला पामराला!"
कोलंबसाच्या गर्वगीतातील या ओळी ज्याच्या जीवनाला तंतोतंत लागू पडतात. असा एक यशवंत आणि त्याचा प्रेरणादायी प्रवास आज तुमच्यासमोर मांडणार आहे. यापूर्वीच्या सर्व भागांसारखा हाही भाग वाचक मित्रांच्या पसंतीस पडेल.अशी आशा आहे.


एका 15 वर्षाच्या मुलाला डॉक्टरांनी सांगितले कि,"तुला हृदयाचा आजार आहे. त्यामुळे तुला फुटबॉल खेळणे बंद करावे लागेल."
त्या 15 वर्षाच्या मुलाचे वडील एक माळी. पत्र्याचे साधे घर असलेल्या, त्या मुलाला फुटबॉल चे प्रचंड वेड होते. तो वयाच्या 15 व्या वर्षापर्यंत फुलबॉलमधील एक उत्तम खेळाडू बनला होता. पण,नियतीनं त्याच्या समोर  हे संकट उभं केलं होतं. त्याला फुटबॉल सोडण्याचा सल्ला दिला गेला. 

असा यक्षप्रश्न आपल्या समोर उभा राहिला तर आपण नक्कीच फुटबॉल सोडू. पण, जी असामान्य व्यक्तिमत्त्वं होऊन गेलीत, त्यांनी सामान्यांपेक्षा नेमका उलटा विचार करून निर्णय घेतला आणि म्हणून ते सर्वांपेक्षा वेगळे ठरले. असाच वेगळा विचार करून त्या 15 वर्षाच्या मुलाने आपल्या हृदयाचे ऑपरेशन करून घेतले आणि आपले सर्वस्व फुटबॉलसाठी वाहून घेतले.

ऑपरेशननंतर काही वर्षातच त्याच्या वडिलांचे निधन झाले आणि संकटांचा मोठा पहाडच त्यांच्या कुटुंबावर कोसळला. कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी या मुलाच्या आईला दुसऱ्याच्या घरी जेवण बनवायला जावे लागले.

या व यासारख्या अनेक समस्यांकडे या मुलाने दुर्लक्ष केलं आणि आपलं सारं लक्ष एक उत्तम फुटबॉलपटू होण्याकडे दिलं.

वयाच्या 17 व्या वर्षी या खेळाडूला केवळ 1500 पौंड देऊन करारबद्ध केले गेले. याच खेळाडूने आपली गुणवत्ता सिद्ध केली आणि केवळ काहीच वर्षात त्याला 1500 कोटींपेक्षा अधिक किंमत देऊन त्याच्यासोबत करार करण्यात आले. ज्या क्लबने करार केला, तो क्लब म्हणजे रियल माद्रिद आणि तो लाखमोलाचा खेळाडू म्हणजे ख्रिस्तीयानो रोनाल्डो.

आपल्यासमोरील संकटाला आपण कसे सामोरे जातो ? लढतो? की शरण जातो? यावरच यश अवलंबून असतं. तो आपल्यासमोरील संकटाबरोबर लढला. म्हणूनच रोनाल्डो एक यशवंत आहे.

रोनाल्डो प्रचंड ध्येयवादी आहे. आपल्या ध्येयासाठी त्यानं स्वतःला वाहून घेतलं. त्याच्या यशमागचं हेच गुपित आहे. हाच संदेश त्याच्या जीवनप्रवासातून  मिळतो.


No comments: