Monday, November 12, 2018

यशवंत - एक प्रेरणास्रोत भाग 35

लहानपणापासूनच एक उत्तम धावपट्टू असलेल्या एका तरुणाला वयाच्या 18 व्या वर्षीच ऑलम्पिक स्पर्धेत आपलं कौशल्य दाखविण्याची संधी मिळाली. जी फक्त गुणवंतांनाच मिळते. पण,त्यात तो सपशेल अपयशी ठरला. त्याला अपयश का आले?त्यानं अपयशावर कसा विजय मिळवला?त्यानं असा कोणता पराक्रम केला? कि, आज त्याच्या नावाचा इतका दबदबा आहे. चला तर मग जाणून घेऊ.. त्या यशवंताचा प्रेरणादायी प्रवास....

त्याचा जन्म एका खेडेगावातला. एक असं खेडेगाव कि, ज्या गावात पाण्याची प्रचंड टंचाई. आपल्या कुटुंबाला हातभार म्हणून दारू आणि सिगारेट ची विक्री याला करावी लागली. क्रिकेट आणि फुटबॉल ची प्रचंड आवड असलेला हा खेळाडू, वयाच्या बाराव्या वर्षीच एक उत्तम धावपट्टू बनला होता. पण,क्रिकेटच्या आवडीमुळे त्याचं धावण्याकडं दुर्लक्ष होत होतं. तेंव्हा त्याच्या शिक्षकांनी वेळीच कानउघाडणी केल्याने त्यानं आपलं सर्व लक्ष धावण्याकडे दिलं.

वयाच्या पंधराव्या वर्षापर्यंत त्याने अनेक स्पर्धा जिंकून आपली ओळख निर्माण केली होती. याबरोबरच त्याला 2004 च्या अथेन्स ऑलम्पिक स्पर्धेत देशाचं प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली. कमी वयात मिळालेली प्रचंड लोकप्रियता,  पैसा, केलेले अनेक विक्रम या सर्वांची हवा त्याच्या डोक्यात शिरली आणि नको तेच घडलं. या स्पर्धेत तो सपशेल अपयशी ठरला. त्यानं सर्वांची घोर निराशा केली. तो निराश झाला. 

पण, आता वेळ आली होती ती स्वतःला सावरण्याची.
वेळ आली होती, आत्मपरीक्षण करण्याची.
वेळ आली होती, चुका शोधण्याची
वेळ आली होती, सुधारण्याची आणि 
वेळ आली होती, स्वतःला पुन्हा सिद्ध करण्याची.

हा पराभव त्याच्या जीवनातला टर्निंग पॉईंट ठरला. त्यानं स्वतःला सावरलं, आत्मपरीक्षण केलं, चुका शोधल्या, त्याची पुनरावृत्ती होणार नाही. याची दक्षता घेतली, प्रचंड मेहनत घेतली आणि 2008 च्या बीजिंग ऑलम्पिक स्पर्धेत स्वतःला सिद्ध केलं आणि तीन सुवर्णपदकं आपल्या नावावर केली. तो इथंच थांबला नाही, तर 2012 आणि 2016 च्या ऑलम्पिक स्पर्धेत हीच परंपरा कायम ठेवली आणि तो नऊ सुवर्णपदकांचा तो मानकरी बनला. तो ऑलम्पिकवीर धावपट्टू म्हणजेच उसेन बोल्ट.

अपयश हे एक संकट म्हणून न पाहता, संधी म्हणून पाहिलं, तरच यशाच्या शिखरावर विराजमान होता येईल. उसेन बोल्ट ने आपल्या पहिल्या पराभवाकडे एक संधी म्हणून पाहिलं. म्हणूनच, त्याला या संधीचं रूपांतर सुवर्णपदकात करता आलं. म्हणूनच तो एक यशवंत आहे.

आपल्या चुकांमुळे आपण अपयशी झाला. तरी निराश होऊ नका नका. असे अपयश मोठे अनुभव देवून जातात. अशा परिस्थितीत पुन्हा पुन्हा प्रयत्न करत राहावे लागेल. यश मिळाल्याशिवाय राहणार नाही. हाच संदेश उसेन बोल्टच्या या जीवन प्रवासातून मिळतो.




No comments: