Wednesday, November 14, 2018

यशवंत - एक प्रेरणास्रोत भाग 34

यशवंत या लेखमालिकेत आजवर लिहलेल्या सर्वच यशवंतांना त्यांच्या सुरवातीच्या काळात मोठा संघर्ष करावा लागला आहे. गरिबीमुळे कचरा उचलण्याचे काम करावे लागलेला क्रिस गेल, वर्णभेदाचा शिकार झालेले बराक ओबामा, असाध्य रोगाने पछाडलेले हॉकिंग, शौचालय साफ करण्याचे काम करावे लागलेला जॉन सीना, ज्यांचं संपूर्णं आयुष्य संकटांनीच भरलेलं होतं असा कर्नल सँडर्स किंवा वयाच्या 15व्या वर्षी हृदय शस्त्रक्रिया करावं लागलेला रोनाल्डो. या साऱ्यांचा संघर्ष अतिशय वेदनादायी असाच आहे. पण,ज्यांना यातलं काहीच सहन करावं लागलं नाही. अशीही काही लोकं आहेत, जी आज यशाच्या शिखरावर विराजमान आहेत. त्यातल्याच एकाची ही कहाणी.....

आईवडील कॉम्प्युटर सायन्स चे प्राध्यापक असलेला लैरी लहानपणापासूनच अतिशय हुशार आणि जिज्ञासूवृत्तीचा होता.  त्याला संगणकाची गोडी लागली.

पदवीचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यानं पीएचडी करण्याचं ठरवलं. आपल्या मित्राच्या सोबतीनं संशोधनाला सुरूवात केली. त्याला जादूची अशी कांडी शोधून काढायची होती कि, ती फिरवली असता एका क्षणात जगातील माहितीचा खजिना संगणकाच्या पडद्यावर येईल. ते त्याचं स्वप्नं बनलं. त्यासाठी वाट्टेल ते करण्याची त्याची तयारी होती. शिवाय, त्याने प्रत्यक्ष कामाला सुरुवात देखील केली. 

शोध सुरू झाला. रात्ररात्र जागणं सुरू झालं. टिपणं काढणं सुरू झालं. प्रयोग सुरू झाले. निष्कर्ष येऊ लागले. ते तपासले जाऊ लागले. दिवस संपला. महिना संपला.ववर्ष संपलं. तब्बल चार वर्षे संशोधन केले आणि शोध लागला जादूच्या कांडीचा. ती जादूची कांडी म्हणजेच गुगल सर्च इंजिन आणि त्याचा निर्माता म्हणजेच लैरी पेज.


मित्रहो, कदाचित आपल्याला लैरी पेज यांचा प्रवास अतिशय खडतर वाटणार नाही. पण, जिथं आपल्याला सुईत दोरा ओवायला सेकंदापेक्षा अधिक वेळ लागतो. तिथं गुगल सेकंदापेक्षा कमी वेळेत 40000 पेक्षा अधिक दुवे आपल्या समोर सादर करते. या शोधाने लैरी जगातील श्रीमंतांच्या यादीत पहिल्या पंधरात पोहचले. म्हणूनच, लैरी पेज एक यशवंत आहेत.

आपल्याला लैरी यांची चार वर्षं,केवळच वाटतील. पण, गुगल उभं करताना त्यांना 10 लाख डॉलर्स चं कर्ज घ्यावं लागलं. त्यावेळी मला हे जमेल का? मी हे करू शकेन का? मी एव्हढं मोठं कर्ज कसं फेडू शकेन का ? या सारख्या नकारात्मक विचारांनी भंडावून सोडलं असेल. पण, त्यानं या विचारांना अलगद बाजूला सारलं. शिवाय, अजून आपल्याला काही गोष्टी लक्षात घ्याव्या लागतील. त्या म्हणजे त्यांनी दाखवलेलं धाडस, त्यांचा संयम, त्यांचा विश्वास, त्यांची जिद्द, चिकाटी आणि सर्वात महत्वाचं म्हणजेच कष्ट,मेहनत. शेवटी कुठेही जा. यशस्वी होण्याचा एकच फॉर्म्युला सांगितला जाईल. तो म्हणजे मेहनत.


No comments: