Wednesday, November 14, 2018

यशवंत – एक प्रेरणास्त्रोत भाग 36

आज मी ज्या यशवंतांबद्दल आपल्याशी हितगूज करणार आहे, तिनं दिलेल्या लढ्याच्या स्मरणार्थ, तिच्या नावाने आंतरराष्ट्रीय स्तरावर एक दिवस साजरा केला जातोय. कोण आहे ती यशवंत ?? चला तर मग जाणून घेऊ...

9 ऑक्टोबर 2012 चा दिवस.शाळकरी मुलींनी भरलेल्या एका बसमध्ये अचानक काही आतंकवादी शिरले.त्यांनी बस मधील मुलींना विचारले,"गुल मकई कोण आहे?"साऱ्या मुलींच्या नजरा एकाच मुलीकडे वळल्या. दहशतवाद्यांना जे समजायचं ते समजलं आणि त्यांनी त्या पंधरा वर्षाच्या मुलीवर गोळीबार केला. ती मुलगी गंभीर जखमी झाली. तिच्यावर उपचार सुरु झाले. तिला उपचारासाठी परदेशात पाठवलं गेलं. तिथं तिच्यावर उपचार झाले. ती जगावी यासाठी जगभर प्रार्थना केल्या गेल्या. तिला बरे व्हायला जवळजवळ 5 महिन्यांपेक्षा अधिक कालावधी लागला.

एका 15 वर्षाच्या मुलीवर का गोळीबार करण्यात आला??? कदाचित हा प्रश्न वाचक मित्रांना पडला असावा. त्याचं झालं असं.....

याची सुरुवात झाली 2009 साली. तेंव्हा ती 11-12 वर्षा ची होती. ती एका मुस्लिमबहुल राष्ट्रातील. ती ज्या भागात राहायची, त्या भागावर तालिबानी सारख्या आतंकवादी संघटनेने ताबा मिळविला होता. मुस्लिम मुलींनी शिकायचे नाही. असा फतवा त्यांनी काढला. शिवाय,जवळपास  400 पेक्षा अधिक शाळा बंद करण्यात आल्या होत्या. त्यात या गुल मकई  ची सुद्धा शाळा होती. आपल्यावर होत असलेल्या अन्यायाला तिने वाचा फोडली. तिने बंड केला. आपल्या शिक्षणासाठी, मुलींच्या शिक्षणासाठी तिने भाषण द्यायला सुरुवात केली. BBC सारख्या आंतरराष्ट्रीय पातळीवरील वृत्तसंस्थेच्या माध्यमातून गुल मकई या टोपण नावाने, तालिबान्यांची काळी कर्तुत जगासमोर आणली. तालिबान्यांना याची खबर लागली. यातून तिच्यावर हल्ला झाला. तिला आणि तिच्या कुटुंबियांना मारण्यासाठी प्रयत्न सुरू झाले.

या हल्ल्याचे पडसाद जगभर पसरले. तिच्या प्रयत्नांना यश आले. तिच्या देशात मुलींना शिक्षणाचा अधिकार प्राप्त झाला. जगभर तिचं कौतुक झालं आणि 2014 साली तिला जगातील सर्वोच्च मानाचा शांततेचा नोबेल पुरस्कार मिळाला. त्यावेळी ती केवळ 17 वर्षाची होती. ती धाडसी बाला म्हणजेच गुल मकई. ती धाडसी बाला म्हणजेच मलाला युसुफजई.

केवळ मलालावर अन्याय झाला होता का?नाही. तिच्यासारख्या असंख्य मुलींवर झाला. पण,वाचा फोडणारी ती एकमेव. समोर मृत्यू दिसत असतानाही तालिबान्यांकडून होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्याचे काम मलालाने केले. 12 जुलै हा तिचा जन्मदिन जागतिक पातळीवर "मलाला दिन" म्हणून साजरा केला जातो. तिनं जे धाडस दाखवलं, त्यामुळेच ती जगातील प्रभावी व्यक्ती बनू शकली. म्हणूनच ती एक यशवंत आहे.

ज्या वयात आपली मुलं खेळणी,पैसे,खाऊ,मोबाईल यासाठी हट्ट धरतात. त्याच वयात मलालाने आपल्या हक्कांसाठी,अधिकारांसाठी बंड केला. आपले हक्क आणि अधिकार मिळविण्यासाठी, अपयशाला नामोहरम करण्यासाठी, संकटांशी लढण्यासाठी, आपली स्वप्नं पूर्ण करण्यासाठी वेळीच बंड करणं गरजेचं आहे. अन्यथा थंड होण्याची वेळ आपल्यावर येईल. म्हणून वेळीच बंड करा.


No comments: