Thursday, November 8, 2018

यशवंत — एक प्रेरणास्रोत भाग 6


कोणतीही परिस्थिती असो एखादा पर्याय नक्की असतोच.जो अद्यापपर्यंत आपल्याला सापडत नाही.पण,त्याच पर्यायात परिस्थिती बदलून टाकण्याची क्षमता असते. एकदा का निराशेची दृष्टी हटली की मार्ग नक्की सापडतोच....यासाठी आपल्या मनात आशेची फक्त एक ज्योत पेटायला हवा.अशीच निराशेची दृष्टी बाजूला सारून आशेची ज्योत पेटवून स्वतःची अन आपल्या गावाची प्रगती साधणाऱ्या एका ध्येयवेड्या लोकप्रतिनिधीची ही कथा....


1989 चा काळ. एक क्रिकेटवेडा तरुण. रणजी क्रिकेट संघात संधी मिळाली नाही,म्हणून निराश आणि हताश होऊन बसला होता. काय करावे?त्याला काहीच सुचत नव्हते. एका मित्राने सांगितले की,गावाकडे ग्रामपंचायतीच्या निवडणूका लागल्या आहेत. गावातील मित्राने या तरुणाला ग्रामसभेसाठी बोलावलं. गावात प्रवेश केल्यावर हा तरुण पुन्हा निराश झाला. कारण,चौथीत असताना या तरुणाने शिक्षणासाठी गाव सोडलं होतं. तेंव्हाच गाव आणि आताच गाव जमीन अस्मान चा फरक होता.


पिण्याच्या पाण्याचं दुर्भीक्ष्य,जनावरांना ना चारा उपलब्ध, ना जळणासाठी लाकूड, हाताला काम नाही,त्यातून गुन्हेगारीवृत्ती, व्यसनाधीनता बळावली. लोक दारू गाळायचे आणि विकायचे. अशी त्या गावची स्थिती.


ग्रामसभेत त्या तरुणाने त्याच्या गावाच्या विकासासंबंधीच्या त्याच्या कल्पना,त्याची स्वप्नं लोकांपुढे मांडल्या.तेव्हा लोकांनी त्याला एकमतानं सरपंच म्हणून निवडलं.


या तरुण सरपंचाने आदर्श ग्राम योजनेचा प्रकल्प राबवण्यासाठी पंचसूत्री तयार केली. 'श्रमदान, चराईबंदी, कुर्‍हाडबंदी, नशाबंदी,कुटुंबनियोजन."


या तरुण सरपंचाने गावात जलसंधारण, वनीकरण, शैक्षणिक प्रकल्प, आरोग्यविषयक , शेती, दुग्ध- व्यवसाय तसंच सामाजिक-सांस्कृतिक......सर्वच बाबतींत योजना यशस्वीपणे राबवून गावकर्‍यांच्या सहकार्यानं गावाचा कायापालट केला आहे.


या तरुण सरपंचाच्या प्रयत्नाने गावाला अनेक मानसन्मान आणि पुरस्कार प्राप्त झाले आहेत.
मित्रांनो, मी आता पर्यंत ज्या सरपंचांबद्दल आणि ज्या गावाबद्दल सांगतोय. ती व्यक्ती म्हणजे श्री. पोपटराव पवार आणि गाव अर्थात हिवरे बाजार...


कितीही कठीण परिस्थिती असली तरी मार्ग सापडतोच. परिस्थितीने हतबल झालेल्या, निराश झालेल्या, पोपटराव पवारांना आशेचा किरण दिसला आणि त्यांनी जे कार्य करून दाखवले, त्यामुळेच ते मला एक यशवंत वाटतात.

No comments: