Friday, November 9, 2018

यशवंत — एक प्रेरणास्रोत भाग 8

गुरू ठाकूर आपल्या ”उत्तर” या कवितेत म्हणतात....

असे जगावे छाताडावर आव्हानाचे लावून अत्तर
नजर रोखुनी नजरे मध्ये आयुष्याला द्यावे उत्तर

नको गुलामी नक्षत्रांची
भीती आंधळी ताऱ्यांची
आयुष्याला भिडतानाही
चैन करावी स्वप्नांची
असे दांडगी इच्छा ज्याची मार्ग तयाला मिळती सत्तर

नजर रोखुनी नजरे मध्ये आयुष्याला द्यावे उत्तर

वरील ओळी जिच्या संघर्षाला तंतोतंत लागू होतात.अशीच एक मराठी मातीची ब्रँड अंबॅसेडर. तिची ही संघर्षपूर्ण कहाणी...

पुण्यातल्या एका चाळीत, एका सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेली, जन्मजात अपंग असलेली ही मुलगी.

तिच्यावर दोनदा शस्त्रक्रिया झाली. पण ती 84 टक्के विकलांग असल्यानं त्यात यश आलं नाही.
गरज होती मोठी शस्त्रक्रिया करण्याची. पण त्यासाठी तिच्या पालकांकडे तेवढा पैसाही नव्हता.

आई शिवणकाम करायची आणि वडील रिक्षा चालवून घरखर्च भागवत होते.

त्यातच 2005 साली वडिलांना अपघात झाला आणि त्यांचं रिक्षा चालवणंही थांबलं. आईनं मात्र येणाऱ्या अडचणींना तोंड देत तिचं शिक्षण सुरू ठेवलं.

विकलांग असल्यानं तिला एका खाजगी शाळेने प्रवेश नाकारला.एकदोनदा नव्हे तर तीनवेळा तिला प्राथमिक शाळेत प्रवेश नाकारला.

महानगरपालिकेच्या शाळेत ती शिकली.

कॉलेजमध्ये असताना तिला अभ्यास दौऱ्यातून विकलांगतेच्या कारणास्तव वगळले.
यापूर्वीही विकलांगतेमुळे तिला शाळेत प्रवेश नाकारण्यात आला होता. या गोष्टीची तिला आठवण झाली.

"आता बस्स! आता आपण शांत नाही राहायचं," असं म्हणत तिनं स्वत:च्या हक्कासाठी आवाज उठवला. तिनं बंड पुकारलं.
तिनं कॉलेज प्रशासनाविरोधात तक्रार दाखल केली. आपल्यावर होत असलेल्या अन्यायाविरोधात ती लढली. तिच्या बंडापुढे कॉलेज प्रशासन शरण आले. तिची माफी मागितली गेली.

दरम्यानच्या काळात तिची अनाथाश्रमातील काही मुलांशी तिची भेट झाली आणि तिला तिच्या जीवनाची दिशा त्या क्षणी गवसली.
एक विश्वास तिला मिळाला.

2012 पासून ती  पुण्यातल्या 'रोशनी' संस्थेशी जुळली. 'अॅक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग' म्हणजे ”कार्यानुभवातून शिक्षण” या माध्यमातून प्राथमिक गरजांपासून वंचित मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचं काम ही संस्था करते.
तसंच अंध मुलांना परीक्षेच्या काळात रायटर (लेखनिक) पुरवणं आणि लैंगिक समानतेसारख्या विषयांअंतर्गत महिलांना मासिक पाळीविषयी जागरूक करण्याचं कामही या संस्थेच्या उपक्रमांमधून ती करू लागली.
याशिवाय ती सिग्नलवर भीक मागणाऱ्या मुलांसाठी शाळा चालवत आहे.

तिच्या कार्याची दखल घेऊन संयुक्त राष्ट्रसंघाने 'वर्ल्ड अॅट स्कूल' या उपक्रमासाठी तिची ”वर्ल्ड युथ एज्युकेशन अंबॅसेडर” म्हणजेच "जागतिक युवा शिक्षण राजदूत” म्हणून निवड केली आहे.

अपंगत्वावर मात करत केलेली कामगिरी उल्लेखनीय आहे म्हणून महाराष्ट्र सरकारने तिचा 'राज्य युवा पुरस्कार' देऊन तिचा गौरव केला ती युवा ब्रँड अंबॅसेडर म्हणजेच दीक्षा दिंडे.

विकलांगतेवर मत करत उल्लेखनीय कामगिरी करणारी दीक्षा आणि तिचा आजवरचा प्रवास थक्क करायला लावणारा आहे.

जबरदस्त इच्छाशक्ती,प्रचंड आत्मविश्वास,बंड करण्याची तयारी आणि केवळ सकारात्मक विचारांच्या जोरावर ही शरीराने विकलांग असणारी दीक्षा मनाने विकलांग नाही. हे जाणल्यावर ती मला खरीखुरी यशवंत वाटते.

शरीराच्या विकालांगतेपेक्षा मनाची विकलांगता अधिक हानिकारक असते. ज्यांच्या जीवनात प्रेरणेचा अभाव आहे. अशांनी दीक्षा कडून प्रेरणेची दिक्षा घ्यावी.

No comments: