Friday, November 9, 2018

यशवंत — एक प्रेरणास्रोत भाग 9

यशस्वी लोकांच्या गोष्टी सर्वांनाच आकर्षित करत असतात.त्यांचा संघर्ष वाचून लोक यशाचा मंत्र जाणून घेतात.जगभरात लोकांना प्रेरणादायी ठराव्या अशा अनेक यशोगाथा आहेत.या प्रेरणादायी कहाण्या वाचून अनेकांमध्ये सकारात्मक बदल होतात आणि  काहीतरी करण्याची जिद्द निर्माण होते. या भागात शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या एका मागासवर्गीय महिलेची कथा.


तिचा जन्म महाराष्ट्रातल्या अकोला जिल्ह्यात रोपड़खेड़ा गावात झाला. वडील पोलीस खात्यात हवालदार. आई गृहिणी. तीन मुली आणि तीन मुले असा परिवार.


शिक्षणाची आवड होती. पण,घरची परिस्थिती आणि पारंपरिक  रीती-रिवाजामुळे बालविवाहाला बळी पडली. सासरच्या लोकांकडून छळ,अपमान, निंदा आणि तिरस्कार याशिवाय तिच्या वाटणीला काहीच आले नाही. मोठया मुश्किलीने वडिलांनी तिला माहेरी आणले. ते ही कायमचेच.


"आपल्या आयुष्य म्हणजे एक नरकच आहे.” म्हणून तिने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पण,ती वाचली. त्यावेळी तिने निश्चय केला की, "यापुढे कधीही मरण्याचा विचार करायचा नाही.जीवनात नक्कीच काहीतरी मोठं करायचं. एक ना एक दिवस तर सर्वांनाच मरायचे असते. मग काहीतरी चांगले काम करूनच मरायचं. हा निर्णय तिने घेतला."

स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी ती पुन्हा मुंबईला आली. दिवसाला मिळणाऱ्या दोन रुपयांसाठी ती शिवणकाम करू लागली. दुर्दैवाने थोड्याच दिवसात तिच्या वडिलांची नोकरी गेली आणि संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी तिच्यावर आली. तरीही तिने ती जबाबदारी खंबीरपणे उचलली.

यातच एक अशी घटना घडली ज्यामुळे तिचे आयुष्य पूर्णपणे बदलून गेले. लहान बहिण गंभीररीत्या आजारी पडली. तिला वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र पैशाअभावी तिची बहिण वाचू शकली नाही. तेव्हाच तिने ठरवले की खूप पैसा कमवायचा आणि खूप श्रीमंत व्हायचं.

फर्निचर निर्मिती चा एक व्यवसाय सुरु केला. हा व्यवसाय करताना तिच्या मनात विचार आला तो म्हणजे गरजूंना मदत करणे,त्यांना प्रेरणा देणे. शासनाच्या योजनांचा बेरोजगारांना लाभ व्हावा म्हणूनच तिने ‘सुशिक्षित बेरोजगार युवा संगठन’ नावाची एक संस्था सुरु केली आणि गरजूंना मदत करणे,बेरोजगार तरुणांसाठी शिबीरं घेणे,वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करणे. यासारखे कार्यक्रम हाती घेतले.


”जो दुसऱ्याच्या अंगणात सुखाचे झाड लावतो.त्याच्याच अंगणात सुखाची फुले पडतात.” ही उक्ती तिच्या बाबतीत खरी ठरली. थोड्याच दिवसात तिला कल्याण शहराजवळ स्वस्तात जागा मिळाली आणि इथेच तिचा बांधकाम क्षेत्रातील श्रीगणेश झाला आणि तिने मागे वळून पाहिलेच नाही.


एक गरीब महिला जिच्याकडे मुंबईमध्ये राहायला घर देखील नव्हते, बांधकाम व्यवसायात यशाची शिखरे पादाक्रांत करत मुंबई सारख्या मायानगरी मध्ये एक यशस्वी व्यावसायिक म्हणून नाव कमावणारी ”ती” म्हणजेच श्रीमती कल्पना सरोज.

शेणाच्या गोवऱ्या विक्रीपासून ते थेट कोट्यावधींचा व्यवसाय करणाऱ्या या यशस्वी महिलेचा प्रवास थक्क करणारा आहे. प्रतिकूल परिस्थितीत मेहनत, इमानदारी, साहसी वृत्तीने मार्गक्रमण करत उतुंग उंची गाठणाऱ्या कल्पना सरोज एक ”यशवंत” आहेत.

2 comments:

Unknown said...

खरोखरच कल्पनाताई यशवंत आहेत,ताईंना सलाम

Sandeep Patil, Dudhgaon said...

Thanks