🎯 *यशवंत - एक प्रेरणास्रोत*
🎯 *भाग - 81*
🎯 *श्री.संदीप पाटील,दुधगाव. 9096320023.*
देशातील लोकांना आपले मूलभूत अधिकार मिळवून देण्यासाठी, आपल्या पतीच्या अंतिम दर्शनासाठी जाणे टाळणाऱ्या एका महिलेचा प्रेरणादायी प्रवास आजच्या भागात आपण जाणून घेणार आहोत.
19 जून 1945 मध्ये तिचा जन्म, एका अशा पित्या च्या पोटी झाला, ज्याने त्या देशाला ब्रिटिश सरकारच्या राजवटीतून स्वातंत्र्य मिळवून दिले होते. म्हणून, तिच्या पित्याला, त्या राष्ट्राचा 'राष्ट्रपिता' असे संबोधले जायचे. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर, लगेचच तिच्या वडिलांची हत्या करण्यात आली होती. त्यामुळे, देशासाठी त्यागाची, समर्पणाची शिदोरी तिला वडिलांकडून वारसा हक्काने मिळालेली होती.
वडिलांच्या मृत्यूनंतर तिच्या आईला, त्या देशाच्या सरकारमध्ये स्थान मिळाले. भारत आणि नेपाळच्या राजदूत म्हणून, आईची नेमणूक केली गेली. आईबरोबर ती दिल्लीला आली आणि येथेच तिचं कॉलेजपर्यंतचे शिक्षण झाले. याच काळात तिच्यावर गांधीजींच्या अहिंसात्मक विचारांचा प्रभाव पडला. गांधीजींच्या अहिंसात्मक विचारांची ती पाईक बनली. पुढे ती लंडनमधील ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीत शिकण्यासाठी गेली. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर, तिने संयुक्त राष्ट्रमध्ये काम करायला सुरुवात केली. येथेच तिची ओळख, भुतान देशाच्या डॉ. मायकल एरिस या तरुणाशी झाली आणि ओळखीचे रूपांतर लग्नात झाले. त्यांना दोन अपत्ये झाली. तिने पीएचडीदेखील पूर्ण केली. संसारात ती चांगलीच रमली होती. इथंपर्यंत सर्व काही ठीकठाक होतं. पण, नियतीच्या मनात मात्र वेगळंच काहीतरी होतं.
1988 साली तिची आई आजारी पडली. आईची देखभाल करण्यासाठी, ती आपल्या देशात परतली. याच काळात देशात प्रचंड अराजकता माजलेली होती. या देशातील लोकशाही संपुष्टात येऊन, लष्करी राजवट अस्तित्वात आली होती. ही एक प्रकारची हुकुमशाहीच. जनतेवर मोठ्या प्रमाणात बंधनं होती. इतकी वर्ष देशाच्या बाहेर राहिल्यामुळे, तिला याची जरादेखील खबर नव्हती. ज्यावेळी जाणीव झाली, त्यावेळी मात्र ती मोठ्या निश्चयाने उभी राहिली. आपल्या देशात लोकशाही राजवट असावी. यासाठी तिने प्रयत्न सुरु केले. तिने राजकारण टाकलेलं, ते पहिलं पाऊल होतं. पण, राजकारणातल्या तिच्या या पावलाने तिच्या वाट्याला खुप मोठा संघर्ष येणार होता. याची जरासुद्धा कल्पना तिला नसावी. तिनं मोठं जनआंदोलन उभारलं. या आंदोलनाला त्या देशातील लोकांचा खूप मोठा पाठिंबा मिळाला. पण, लष्कराने तिचे आंदोलन चिरडण्यासाठी, तब्बल दहा हजार आंदोलकांची कत्तल केली. घडलेला प्रकार तिच्यासाठी धक्कादायक होता.
या हत्याकांडासोबतच, 1989 साली लष्कराने तिला नजरकैदेत ठेवले. एक-दोन वर्षे नाही, तर तब्बल वीस वर्षे, ती लष्कराच्या नजरकैदेत होती. 1990 साली या देशात निवडणुका जाहीर झाल्या. तिच्या पक्षाला 80 टक्के जागा मिळाल्या. परंतु, लष्करप्रमुखाने निवडणूकच रद्द करून टाकली. या काळात तिला तिच्या नवर्याला सुद्धा भेटण्याची परवानगी नव्हती. 1995 पर्यंत त्यांना फक्त पाच वेळाच आपल्या नवर्याला भेटता आले. नवऱ्याचा मृत्यू झाला, त्यावेळी तिला त्याचे अंतिम दर्शन सुद्धा घेता आले नाही. लष्कराने तिला अंतिम दर्शन घेण्यासाठी देशाबाहेर जाण्याची परवानगी दिली खरी, पण पुन्हा परत न येण्याची अट तिच्यासमोर ठेवल्याने, नाईलाजाने तिने पतीच्या अंतिम दर्शनासाठी न जाण्याचा निर्णय घेतला. तिच्यासाठी भावनेपेक्षा कर्तव्य महत्वाचे होते. तिच्यासाठी देश महत्वाचा होता. देशातील नागरिकांना न्याय मिळवून देणे. ती तिचे कर्तव्य समजत होती.
2010 हे वर्ष तिच्यासाठी आणि देशासाठी खूप महत्वाचं होतं. या देशात निवडणुका जाहीर झाल्या. लोकशाहीसाठी ही सुखद गोष्ट होती. या निवडणुकीत त्या विजयी झाल्या. परंतु तिच्या पक्षाला कमी जागा मिळाल्याने, ती विरोधी बाकावर बसली. 2015 साली मात्र ती यशस्वी झाली. देशात लोकशाही अस्तित्वात आली. तिचं स्वप्नं पूर्ण झालं. ती पंतप्रधान बनली. ज्या देशात 1962 पासून लष्करी राजवट लागू होती, तो आपला शेजारी देश म्हणजे म्यानमार आणि देशाला लोकशाही व्यवस्था देण्यासाठी, 25 वर्षे संघर्ष करणारी, ती महिला म्हणजेच आन सान सू की होय.
ध्येयप्राप्तीचा मार्ग सोपाही नाही आणि अवघडही नाही. वाटेत अनेक अडचणी,अडथळे येत असतात. वेळोवेळी भावनिक गुंताही आडवा येत असतो. या मार्गावरून माघारी फिरण्यासाठी, बरीच प्रलोभनं दाखविली जातात. पण, या साऱ्या बाबींमुळे परावृत्त न होणारी व्यक्तीच यशस्वी होऊ शकते. याचं मूर्तीमंत उदाहरण म्हणजेच आन सान सू की होय. त्या ध्येयप्राप्ती होईपर्यंत, आपल्या मार्गापासून परावृत्त झाल्या नाहीत. वीस वर्षे नजरकैद सहन करून, त्यांनी अहिंसेची कास कधीच सोडली नाही. म्हणूनच, त्यांना शांततेचे नोबेल पारितोषिक मिळाले आहे. म्हणूनच, त्या एक यशवंत आहेत.
2 comments:
सलाम आहे आन सान सू की यांच्या कार्याला
पाटील सर धन्यवाद आम्हाला तुमच्यामुळे अशा अभूतपूर्व राष्ट्रभक्तांची ओळख होत आहे .धन्यवाद सर
Great leady.
Post a Comment