भाग 85
🎯 *यशवंत - एक प्रेरणास्रोत*
🎯 *भाग - 85*
🎯 *श्री.संदीप पाटील,दुधगाव. 9096320023.*
एकेकाळी बेरोजगार असलेल्या, बेरोजगार म्हणून मिळणाऱ्या भत्त्यावर आपला उदरनिर्वाह चालविणाऱ्या, एका गरीब असाह्य महिलेचा, इंग्लंडच्या राणीपेक्षाही अधिक श्रीमंत होण्यापर्यंतच्या प्रवासाची ही प्रेरणादायी कथा..
31 जुलै 1962 रोजी इंग्लंडमधील एका खेड्यात, एन आणि पीटर या दांपत्याच्या पोटी जोन चा जन्म झाला. आई वडिलांची भांडणे ऐकत-ऐकतच लहानाची मोठी झाली. तिच्या आईला वयाच्या 35 व्या वर्षी, Multiple Sclerosis अर्थात मेंदू आणि मज्जापेशींच्या काठीण्यामुळे आणि नाशामुळे होणारा रोग झाला. त्यामुळे, काही वर्षातच आईच्या प्रेमाला पोरके व्हावे लागले.
वयाच्या 14 व्या वर्षापर्यंत, जोनला पुस्तके वाचायला मुळीच आवडत नव्हते. परंतु, तिच्या एका मैत्रिणीने तिला जादुगार आणि चेटकिण यावर आधारित एक पुस्तक वाचायला दिले. तेव्हापासून तिला वाचनाची गोडी लागली. पुढे याच गोडीने तिला इंग्लंडच्या राणीपेक्षाही अधिक श्रीमंत बनविले.
जोनचे पदवीपर्यंतचे शिक्षण इंग्लंड मध्ये झाले आणि 1990 मध्ये ती इंग्रजी अध्यापनासाठी पोर्तुगालला गेली. याच वर्षी एका रेल्वे प्रवासात जोन ला एक रहस्यमय पुस्तक लेखन करण्याची कल्पना सुचली आणि लगेचच लेखन देखील पूर्ण केले. आता ते प्रकाशित करण्यासाठी, प्रकाशकाचे उंबरे झिजवू लागली. बऱ्याच प्रकाशकांनी नकार दिला. याच दरम्यान, तिची भेट एक टीव्ही पत्रकार जॉर्ज अरांतेस यांच्यासोबत झाली. दोघांच्याही आवडीनिवडी सारख्याच. दोघांनी लग्न केलं. तिने एका मुलीला जन्म दिला. जितक्या जलद ते जवळ आले, तितक्याच जलद ते अलगही झाले. त्यांचा घटस्फोट झाला.
जोन पदवीनंतर सात वर्ष होऊनदेखील, स्वतःच्या पायावर उभी राहू शकली नव्हती. अशातच मुलीची जबाबदारीही तिच्यावरच येऊन पडली. तिने लिहलेली पुस्तके अजूनही प्रकाशित होऊ शकली नव्हती. त्यामुळे इंग्लंड सरकार देत असलेल्या बेरोजगार भत्त्यावर,तिला आपले जीवन व्यतित करावे लागले. त्यामुळे ती स्वतःला अपयशी समजू लागली होती.तिला या सर्व गोष्टींचा मानसिक त्रास झाल्याने, निद्रानाशासारखा रोग झाला.
अनेक समस्यांनी त्रस्त असूनही, तिने लेखनाचे काम सुरूच ठेवले. रात्रंदिवस लेखन केले. प्रकाशकांच्या दारोदार फिरली. प्रचंड धावाधाव केली. नावाजलेल्या 12 प्रकाशकांनी तिचे पुस्तक प्रकाशित करण्यास असमर्थता दर्शवली. तरीही तिने प्रयत्न सोडले नाहीत.
30 जून 1997 हा दिवस जोनच्या आयुष्यातला सर्वोत्तम दिवस ठरला. कारण, याच दिवशी तिचं पहिलं पुस्तक ‘ Harry Potter and the Philosopher's Stone ’ प्रकाशित झाले. या पुस्तकाने विक्रीचे सर्व उच्चांक मोडले आणि जोनला यशाच्या शिखरावर नेऊन ठेवले. ती जोन म्हणजेच जे.के.रोलिंग होय.
जीवनात यशस्वी झालेल्या यशवंतांच्या जीवनावर ज्यावेळी आपण प्रकाश टाकतो, त्यावेळी एक गोष्ट प्रामुख्याने लक्षात येते की, संघर्ष केल्याशिवाय यश मिळत नाही. यशाचा मार्ग सहज, सोपा मुळीच नसतो. अनेक अडचणी,समस्या, त्रास सहन करूनही आपण आपल्या ध्येयापासून परावृत्त न होता, आपले काम सातत्याने सुरू ठेवले, तर आपल्याला यशस्वी होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही. संघर्ष केल्याशिवाय यशस्वी होता येत नाही. हाच बोध 'हॅरी पॉटर' च्या लेखिका जे. के. रोलिंग यांच्या संघर्षातून आपल्याला मिळते.
रोलिंग यांनी हॅरी पॉटर या पुस्तकाचे एकूण 7 भाग लिहून प्रकाशित केले आहेत. त्यांच्या विक्रीतून त्या इंग्लंडच्या राणीपेक्षाही अधिक श्रीमंत बनल्या. शिवाय या मालिकेवर 8 चित्रपट तयार करण्यात आले आहेत. केवळ पुस्तकांच्या माध्यमातून अब्जाधीश बनलेल्या रोलिंग या जगातील एकमेव लेखिका आहेत. म्हणूनच, त्या एक यशवंत आहेत.
2 comments:
Motivational Articles...Congratulations Keep it up!
Motivational Articles...Congratulations Keep it up!
Post a Comment