Sunday, July 14, 2019

यशवंत एक प्रेरणास्रोत भाग 101


🎯 *यशवंत - एक प्रेरणास्रोत*
🎯 *भाग - 101*
🎯 *श्री.संदीप पाटील,दुधगाव. 9096320023.*


चीनमध्ये नव्यानेच सुरू होऊ घातलेल्या KFC या जगप्रसिद्ध रेस्टॉरंटमध्ये कर्मचाऱ्यांची भरती सुरू होती. या भरती प्रक्रियेसाठी 24 उमेदवार आले होते. पैकी 23 उमेदवार नोकरी मिळवण्यात यशस्वी झाले. पण, एका उमेदवाराला नोकरी मिळाली नाही. ज्या तरुणाला नोकरी मिळाली नाही, त्या तरुणाच्या प्रवासाची ही प्रेरणादायी कथा...

आपल्या कम्युनिस्ट विचार सरणीने संपूर्ण जगाला आपल्या विळख्यात घेण्याच्या तयारीत असलेल्या चीन मधील हॉगझाऊ या गावात, अठरा विश्व दारिद्य्र असलेल्या कुटुंबात, दोन भावंडांच्या पाठीवर 10 सप्टेंबर 1964 रोजी एक किडकिडीत मुलगा जन्मला आला. त्याचे नाव मा युन. बालपणापासूनच धडपड्या, अभ्यासात हुशार नसलेला मुलगा म्हणजे मा युन.

1972 साल. मा युन तेंव्हा केवळ 8 वर्षाचा होता. त्याच्या छोट्याशा गावात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष भेट देऊन गेले. त्यामुळे त्या छोट्याशा गावात पर्यटकांची वर्दळ सुरू झाली. वयाच्या तेराव्या वर्षी मा युन भल्या सकाळी मोठमोठय़ा हॉटेलांच्या दारात जाऊन उभा राहू लागला. इंग्रजी बोलायचा सराव मिळण्याच्या बदल्यात त्याने टूरिस्ट गाइड म्हणून काम सुरू केलं. हा त्याचा पहिला रोजगार. 

गाईड्चं काम पटकन मिळविण्यात यशस्वी झालेला मा युन, शालेय परीक्षेत मार्क मिळवून पटकन यशस्वी शकला नाही. प्राथमिक शाळेत दोनदा आणि माध्यमिक शाळेत तीनदा नापास होण्याची त्याच्यावर वेळ आली. या खेरीज कॉलेजच्या प्रवेश परीक्षेतही तीनदा गटांगळ्या खाल्ल्या त्या वेगळ्याच. याच कालावधीत त्याला तीस ठिकाणी नोकरी नाकारण्यात आली. त्याने पोलिस भरतीसाठी प्रयत्न केला. परंतु, त्यांची प्रकृती पाहूनच त्याला बाहेर करण्यात आले. KFC सारख्या जगप्रसिद्ध रेस्टॉरंटमध्ये मुलाखतीसाठी गेलेल्या 24  उमेदवारांपैकी 23 उमेदवारांना नोकरी मिळाली. ज्या एका उमेदवाराला नोकरी मिळाली नाही तो मा युन होता.

इतक्या गटांगळ्या खाऊन, अपयश येवून देखील मा युन ने प्रयत्न करायचे सोडले नाहीत. 1988 मध्ये एकदाची पदवी मिळवून, महिना बारा डॉलर पगाराची शिक्षकाची नोकरी मिळविण्यात, तो यशस्वी झाला. काही वर्षे नोकरी केल्यानंतर नोकरीत त्याचे मन रमेनासे झाले. म्हणून, बहिणीकडून हातउसणे घेऊन त्याने इंग्रजी भाषांतर करून देणारी कंपनी सुरू केली. 

1995 मध्ये मा युन एका चिनी कंपनीची अमेरिकेतील उधारी वसूल करण्यासाठी अमेरिकेला गेला. कॉम्प्युटर आणि कोडिंग याचा कसलाही गंध नसलेल्या, मा युन ने अमेरिकेत पहिल्यांदाच इंटरनेट वापरलं. ती जादू अनुभवून तो थक्कच तर झालाच. पण, उदास ही झाला. कारण, त्यावेळी इंटरनेट वर चीन ची माहिती देणारे एक ही पेज नव्हते.

हीच उदासी त्याच्या यशाचे गमक बनली. मित्राच्या मदतीने चीनशी संबंधित माहिती देणारी संकेतस्थळं सुरू करायचं मनावर घेतलं. त्या प्रयत्नांना नाव दिलं, "चायना पेजेस". त्याने चायना पेजेस नावाची कंपनी स्थापन केली. ही चीनमधील पहिली इंटरनेटाधारित कंपनी म्हणून ओळखली जाते. पुढे 1999 मध्ये आपल्या 17 मित्रांच्या मदतीने मा युन ने आणखी एका कंपनीची स्थापना केली आणि तयार मागे वळून पाहिलेच नाही. 

मा युन च्या अथक परिश्रमातून अल्पावधीतच ही कंपनी नावारूपास आली. या कंपनीच्या माध्यमातून मा युन आशिया खंडातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनला. ज्या कंपनी मुळे मा युन यशाच्या शिखरावर पोहोचला ती कंपनी म्हणजे अलिबाबा डॉट कॉम आणि तो मा युन म्हणजेच जॅक मा होय.

जन्माला येणारा प्रत्येक जीव हा यशस्वी होण्यासाठीच जन्माला आलेला असतो. परंतु, प्रत्येकाचेच यश हे अलीबाबाच्या गुहेत बंदिस्त असते. या यशाला गुहेतून बाहेर काढण्यासाठी एकच कळ या जगात अस्तित्वात आहे. ती कळ म्हणजेच प्रयत्न होय.

जॅक मा यांचा जन्म गरीब कुटुंबातील. बुद्धिमत्ता सामान्यच. पण, तरीही सातत्याने प्रयत्न करत राहिल्याने त्यांना यशाचा मार्ग सापडला. त्यांनी प्रयत्न, मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर अलीबाबाच्या गुहेत बंदिस्त असलेले यश बाहेर खेचून आणले. म्हणूनच ते एक यशवंत आहेत.

उद्या पुन्हा भेटू एका नव्या यशवंतसह. तो पर्यंत नमस्कार. धन्यवाद!!!!!