Sunday, October 6, 2019

यशवंत - एक प्रेरणास्रोत भाग - 119

🎯 *यशवंत - एक प्रेरणास्रोत*
🎯 *भाग - 119*
🎯 *श्री.संदीप पाटील,दुधगाव. 9096320023.*

स्वतःच्या हिमतीवर स्वतःची वाईट वेळ बदलणाऱ्या, एका जिद्दी काकूच्या संघर्षाची ही प्रेरणादायी कथा...

अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी या गावात राहणारी ती. एका गरीब वडिलांची मुलगी. तिला पाच बहिणी. म्हणून तिचे लग्न लवकर करून देण्यात आले. अभ्यासात कधीच मागे नसणाऱ्या तिला शिकण्याची फार आवड. त्यामुळे लग्न झाल्यावर, ती फारशी समाधानी नव्हती. एका शाळेत शिपाई असणाऱ्या पतीच्या मदतीने, काही वर्ष तिनं अभ्यास सुरू ठेवला. स्पर्धा परीक्षांची तयारी केली. पण, अभ्यासाची जागा कौटुंबिक जबाबदाऱ्यांनी घेतली. मुलं झाली. त्यामुळे तिचे शिक्षण मागे पडले. शिक्षण थांबले असले तरी, ती काही थांबली नाही. तिने वाचनाची आवड कायम ठेवली. मिळेल ते पुस्तक आणि मिळेल तेवढा वेळ ती वाचन करायची.

पतीच्या मिळणार्‍या पगारात त्यांचे कुटुंब चालायचे. कोणाकडे उसने मागायची वेळ त्यांच्यावर कधीच आली नाही. परंतु एकदा मुलगा खूपच आजारी पडल्यामुळे त्यांना पैशाची अडचण जाणवू लागली. तेव्हा, मात्र तिने घराबाहेर पडण्याचा, नोकरी करण्याचा निर्णय घेतला. खूप प्रयत्न केला. पण, नोकरी मिळाली नाही. शेवटी तिला आपल्या पतीच्या शाळेतच काम मिळाले. खिचडी शिजवण्याचे काम. शाळेतील सर्व मुलं तिला खिचडीवाल्या काकू म्हणून हाक मारायची. तेव्हा, ती सर्वार्थाने काकू झाली.

काकू पदवीधर असून देखील, मिळालेले काम अतिशय आवडीने आणि प्रामाणिकपणे करायची. सोबतच, वाचनाचा आपला छंद देखील जपायची. आपली परिस्थिती बदलली पाहिजे. यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. असा विचार ती सतत करायची. आपली वेळ बदलण्याची संधी काकूने शोधली. तिने 2018 साली एक प्रयत्न करून पाहिला. त्यात तिला अपयश आले. ती नाराज झाली नाही. पुन्हा 2019 साली तिने प्रयत्न केला. आपली वेळ बदलण्याच्या दृष्टीने तिने टाकलेले, हे पहिलं पाऊल. 'कौन बनेगा करोडपती' या लोकप्रिय कार्यक्रमात सहभाग नोंदवण्यासाठी तिने प्रयत्न केला होता. अकराव्या सिझनमध्ये सुरुवातीला 32 लाख इच्छुक आले होते. त्यापैकी 4800 स्पर्धक पात्र ठरले. ऑडीशनसाठी 120 स्पर्धक पात्र ठरले. त्यात काकू देखील पात्र ठरली. एक एक अडथळा पार करून काकू हॉटसिटवर आली. समोर असलेल्या बिग बींनी एक एक प्रश्न विचारायला सुरुवात केली. आजवर केलेल्या अभ्यासाचा आधार घेत. काकूने एक एक अडथळा पार करत, प्रश्नाचे उत्तर अचूक देत, यशाला गवसणी घातली आणि सिजन 11 ची ती दुसरी करोडपती बनली. ती करोडपती काकू म्हणजेच बबिता ताडे होय.

बबिता ताडे या खूपच नशीबवान होत्या. म्हणूनच, त्या करोडपती बनल्या. असं म्हणणं कितपत योग्य ठरेल?? असं म्हणणं म्हणजे काकूंनी आजवर केलेले कष्ट, सहन केलेल्या यातनांचा अपमान केल्यासारखे होईल. असे मला वाटते. त्या नशीबवान होत्या म्हणून त्या वीस वर्ष शाळेत खिचडी बनवण्याचे काम करत होत्या का ?? असं म्हणायचं का ?? हे संयुक्तिक ठरणार नाही. काकूंची वेळ चांगली नव्हती. परिस्थतीमुळे त्यांना शिक्षण अर्धवट सोडून द्यावे लागले. परंतु, त्यांची शिकण्याची प्रक्रिया, वाचनाच्या माध्यमातून सतत सुरूच होती. आपल्या बुद्धिमत्तेच्या आणि अभ्यासाच्या जोरावर त्यांनी आपली वेळ (परिस्थिती) बदलली आहे. प्रत्येक व्यक्तीला आपली वेळ बदलण्याची संधी मिळत असते. त्यासाठी सतत क्रियाशील असणं गरजेचं आहे. काकू ज्या प्रकारे क्रियाशील होत्या. त्याप्रकारे क्रियाशील राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ज्ञानाची कवाडे सतत खुली असली पाहिजेत. तरच करोडपती होता येते.

एक मध्यान्ह भोजन शिजविणारी खिचडीवाली काकू ते करोडपती काकू पर्यंतचा प्रवास सोपा नव्हता. याची कल्पना आपल्याला आलीच असेल.  त्यांच्या या यशाची दखल घेऊन, अमरावती जिल्हा परिषदेने मतदान जनजागृती कार्यक्रमाच्या ब्रँड अँबेसिडर म्हणून बबीता ताडे यांची निवड केली. म्हणूनच, त्या एक  यशवंत आहेत.

उद्या पुन्हा भेटू एका नव्या यशवंतसह. तो पर्यंत नमस्कार. धन्यवाद!!!!!



1 comment:

Kavita Digambar Ahir said...

Good job and good activities for women