Monday, April 27, 2020

शिवज्ञा - एक जबाबदारी च्या निमित्ताने

पापर्डे. ता. पाटण येथील मित्र चि. कृष्णकांत देसाई याच्या 
"शिवज्ञा - एक जबाबदारी" या लेखमालेचे पहिले पर्व नुकतेच संपन्न झाले आहे.. यानिमित्ताने थोडेसे..

प्रिय मित्र कृष्णकांत,
"शिवज्ञा - एक जबाबदारी" या तुझ्या पहिल्यावहिल्या लेखनमालेचे, सलग पंचवीस भागांचे, पहिले पर्व नुकतेच संपन्न झालेले आहे. शिवाय ते अतिशय लोकप्रिय झाले आहे. याबद्दल सर्वप्रथम तुझे खूप खूप अभिनंदन.

छ. शिवाजी महाराज,त्यांचे व्यक्तिमत्त्व, त्यांचे विचार या अनेक बाबींचा अभ्यास करून, त्याचा सद्यपरिस्थितीशी सहसंबंध जोडून, परखड आणि स्पष्ट शिवविचार उत्तम प्रकारे मांडले आहेस. नवनवे विषय घेवून सलग 25 दिवस लेखन करणे आणि ते वाचकांपर्यंत पोहोचवणं म्हणजे दिव्यच. हे शिवधनुष्य तू अतिशय लिलया पेललं आहेस. याचा मला सार्थ अभिमान वाटतो.

या लेखनामुळे आपल्या जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. 2015 साली जि.प.शाळा पापर्डे या ठिकाणी मी कार्यरत असताना शालेय रंगकामाच्या निमित्ताने,लोक सहभाग जमा करताना आपला परिचय झाला. तू एक उत्तम शिव व्याख्याता असल्याचे त्याचवेळी समजले. तुझ्या या वकृत्व कौशल्याचा उपयोग शाळेतील काही विद्यार्थ्यांना झाला आहे. पुढे शाळेचे स्नेहसंमेलन आयोजन करताना वेळोवेळी तुझा खूप मोठा आधार मिळाला. शिव चरित्रावर आधारित नृत्य बसविताना तुझा मोठा सहभाग मिळाला. तुझ्या सहकार्याने शाळेचे तीन स्नेहसंमेलन यशस्वी होऊ शकले. माझी बदली झाल्यानंतर ही आपला स्नेह कमी झाला नाही. तुझ्या या लेखनाने तो अधिकच वृध्दींगत झाला आहे.

खरंतर छ. शिवरायांविषयी लिहिताना तितका मोठा अभ्यास असावा लागतो. छ. शिवराय समजावून सांगण्यासाठी आधी छ. शिवराय समजावून घेणे गरजेचे असते. तू एक उत्तम शिवव्याख्याता असल्याने तुला शिवराय केवळ कळलेच नाहीत तर, त्यांना तू स्वतः मध्ये मुरुवून देखील घेतले आहेस. याचा प्रत्यय तुझ्या *"चंद्रकोर"* या भागात आला आहे.

छ.शिवरायांचा स्वराज्य निर्मितीचा खडतर प्रवास तू लोकांसमोर मांडत आलास. पण, तू देखील अतिशय खडतर परिस्थितीतून पुढे आला आहेस. वडिलांचे छत्र नसतानाही, कुठल्याही आधाराशिवाय, स्वतः कमवत शिक्षण पूर्ण करून नोकरीही मिळविली आहेस. हे सर्व करत असताना रक्तदान, स्वच्छता, व्यसनमुक्ती आदी गावातील समाज कार्यामध्ये तू अग्रेसर राहिला आहेस.

छ. शिवरायांचे अनेक पैलू तू आम्हा वाचकांसमोर उभे केले आहेस. अजूनही अनेक शिवविचार तुझ्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहोचावेत. तुझे लेखन असेच बहरत राहो. यासाठी तुला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद

श्री. संदिप पाटील, दुधगाव.
9096320023.



चि. कृष्णकांत देसाई यांचे लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

https://marathi.pratilipi.com/story/qtsuhqdatxdp?utm_source=android&utm_campaign=content_share



No comments: