Thursday, April 23, 2020

"जागतिक पुस्तक दिन" च्या निमित्ताने




आज "जागतिक पुस्तक दिन" या निमित्ताने पुस्तकांच्या बाबतीत माझ्या आठवणी.

मी पहिलं पुस्तकं कोणतं वाचलं ? कधी वाचलं ? वाचनाची गोडी कशी निर्माण झाली ? हे निश्चितपणे सांगू शकणार नाही. परंतु आठवीला हायस्कूलमध्ये प्रवेश घेतल्यानंतरची एक आठवण सांगता येईल. विद्यालयाच्या ग्रंथालय प्रमुख पाटील मॅडम सक्तीने पुस्तक वाचायला द्यायच्या. कदाचित यातूनच वाचनाची गोडी निर्माण झाली असावी. असे मला वाटते.

अकरावी-बारावीला असताना फारशी पुस्तके वाचता आलीच नाहीत. डी. एड. पाटण येथे प्रवेश घेतल्यानंतर विद्यालया मध्ये असणाऱ्या ग्रंथालयातून पुस्तक वाचायला मिळाली. या दोन महिन्याच्या कालावधीत घरापासून दूर असल्याने पुस्तकांचा मोठा आधार मिळाला. त्यावेळी लेखक सुनीलकुमार लवटे यांचे "खाली जमीन वर आकाश" नावाचे पुस्तक वाचल्याचे आजही आठवते.  कालांतराने आष्टा येथील डी.एड. विद्यालयात बदली झाली. येथे आल्यानंतरच मोठ्या प्रमाणात पुस्तक वाचण्याचा योग आला. प्रामुख्याने बाबा कदम यांच्या कादंबऱ्या खूप आकर्षक वाटायच्या आणि त्यांच्या या कादंबऱ्यांचे माध्यमातूनच वाचनाची गोडी वाढत गेली. मृत्युंजय, फकिरा, ययाती,कृष्णाकाठ यासारख्या कादंबऱ्या याच काळात वाचून झाल्या. उत्तम लेखक आणि कवी असलेले तत्कालीन प्राचार्य श्री. एस.पी. यादव साहेब यांचा देखील प्रभाव माझ्यावर पडला आहे.

याच कालावधीत माझे केंद्रप्रमुख असलेले चुलते श्री. प्रदीप पाटील यांच्याशी भेटी वाढल्या. कै. प्रदीप पाटील म्हणजे ज्ञानाचा, ग्रंथाचा,अनुभवाचा मोठा भांडारच. माझ्यावर वाचनाचा उत्तम संस्कार यांनीच केला. त्यांच्याकडे असलेल्या स्वतःच्या ग्रंथालयातून त्यांनी अनेक पुस्तकं वाचनासाठी दिली. त्यांच्यासारखं स्वतःचं ही एक सुसज्ज ग्रंथालय असावं. असं मनोमन वाटायचं. 'द अलकेमिस्ट' पुस्तक पहिल्यांदा यांच्याकडूनच वाचायला मिळाले. अनेक उत्तम विचारांचा संग्रह करता आला. याच कालावधीत कविता लेखनाचा छंद ही निर्माण झाला. शिवाय दोन व्यक्ती कथा ही लिहून झाल्या.

नोकरी च्या निमित्ताने पालघर जिल्हात रुजू झालो. या काळात शाळेच्या ग्रंथालयातील पुस्तके वाचली. अनेक मित्रांकडे असलेल्या कथा कादंबऱ्या वाचल्या. येथे देखील कविता लेखन सुरूच राहिले. मध्यंतरी अजब प्रकाशनाने केवळ 50 रुपयांत पुस्तकं उपलब्ध करून दिली. यामुळे माझे स्वतःचे ग्रंथालयाचे स्वप्नं अंशतः पूर्णत्वास आले. दादर येथील मॅजेस्टिक बुक स्टॉल ने 'अजब' प्रदर्शन मांडले होते. येथेच The Secret आणि The Power of Subconscious Mind ही दोन आयुष्य बदलणारी पुस्तकं हाती पडली.

आंतरजिल्हा बदली ने सातारा जिल्ह्यात आल्यानंतरही वाचन सुटले नाही. आता नेमकं काय वाचायचं ? याची पक्की जाण आली होती. वर्गमित्र विद्यासागर पाटील यांच्यामुळे महिन्याला किमान एक पुस्तक विकत घेण्याची संकल्पना मिळाली. त्याच्या कडील 'The Magic Of Thinning Big' या पुस्तकाने विचारांची उंची वाढविली.  

प्रेरणा देणारी अनेक पुस्तकं वाचनात आली. त्यामुळं बरंच काही सुचू लागलं. सुचलेलं उतरवू लागलो. अन् जन्म झाला "यशवंत-एक प्रेरणास्रोत" या प्रेरणादायी लेखनमालेचा.

दरवर्षी जानेवारी महिन्यात सातारा येथे ग्रंथ महोत्सवाचे आयोजन केले जाते. येथील प्रदर्शनाला भेट देवून अनेक पुस्तके संग्रही ठेवण्याची, वाचण्याची संधी निर्माण झाली. त्यामुळे मी अन् माझे ग्रंथ भांडार समृध्द झाले आहे. आज माझ्याजवळ किमान शंभर पुस्तकांचा संग्रह आहे. याचेही मला समाधान वाटते.

"जागतिक पुस्तक दिन"च्या सर्व "यशवंत" वाचकांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा.

धन्यवाद..
श्री संदीप पाटील, दुधगाव.
9096320023.



No comments: