Monday, May 18, 2020

यशवंत - एक प्रेरणास्रोत भाग - 151

🎯  यशवंत - एक प्रेरणास्रोत
🎯  भाग - 151
🎯  श्री.संदीप पाटील,दुधगाव. 9096320023.

माझ्या ब्रॉडकास्ट लिस्टमध्ये सामील होण्यासाठी वरील क्रमांकावर नाव आणि पत्ता(जिल्हा)पाठवा.

एकीकडे कोरोनाने संपूर्ण जगाला विळखा घातलेला असतानाच, तिकडे एका संस्थेने भारतातील सर्वाधिक श्रीमंत लोकांची यादी प्रसिद्ध केली. पहिल्या क्रमांकावर कोण असेल ? याची कल्पना आपल्याला असेलच. पण, मि. व्हाईट नावाने प्रसिद्ध व्यक्ती दुसऱ्या क्रमांकावर विराजमान झाली आणि सर्वच चकित झाले. कोण हा मि. व्हाईट ? काय त्याचा संघर्ष जाणून घेऊ आजच्या भागात. चला तर मग.

1954 साली राजस्थान मधील बिकानेर येथे एका सर्वसामान्य मारवाडी कुटुंबात मि. व्हाईट चा जन्म झाला. मारवाडी कुटुंबात जन्माला आलेला असल्यामुळेच लहानपणापासूनच त्याच्यावर व्यवसायच करण्याबाबतचे संस्कार झाले. त्यामुळे शिक्षणात तो जेमतेमच राहिला. बारावी पास होऊन पदवीच्या शिक्षणासाठी प्रवेश घेतला. अचानक एकेदिवशी वडिलांचा मृत्यू झाला. त्यामुळे त्याला शिक्षण अर्धवट सोडावे लागले.

अगदी कमी वयातच त्याने आपल्या भावाबरोबर काम करायला सुरुवात केली . काही दिवसांत त्याने स्वतःचा नवा व्यवसाय सुरू केला. पण, तो तोट्यात जावू लागला. त्यामुळे लवकरच तो व्यवसाय बंद करावा लागला. त्यावेळी तो 32 वर्षांचा होता.

याच कालावधीत त्याने पुन्हा आपल्या भावासोबत कामाला सुरुवात केली. आता तो शेयर मार्केट मध्ये ट्रेडिंग करू लागला. हे काम करतानाच तो स्वतः देखील शेयर खरेदी करू लागला. प्रत्येक निर्णय विचारपूर्वक घेवून शेयर बाजारात पैसे गुंतवू लागला. मोठ्या संयमाने छोटी-छोटी गुंतवणूक, मोठ्मोठ्या कालावधीसाठी करू लागला. असे करता करता 1999 सालं उजाडलं. तोपर्यंत तो करोडपती बनला होता. आता त्याने एका नवीन व्यवसायात पदार्पण करायचे ठरविले.

त्याने 2002 साली मुंबई जवळील पवई या ठिकाणी, ग्राहकाच्या मनातील प्रत्येक वस्तू एकदम माफक दरात उपलब्ध करून देणारं एक रिटेल स्टोअर सुरू केलं. हळू हळू एका चे दोन, दोनाचे चार अशी संख्या वाढू लागली. प्रत्येक मोठ्या शहरात स्वतःचे रिटेल स्टोअर केवळ सुरूच केले नाही तर ते उत्तम प्रकारे चालविले देखील. 2017 साली त्यांनी आपल्या या कंपनीचे IPO शेयर बाजारात आणले आणि या दोनच दिवसांत त्याची संपत्ती 100 पटीने वाढली. 'फोर्ब्स रियल टाइम बिलिनियरीज इंडेक्स' ने फेब्रुवारी 2020 मध्ये जाहीर केलेल्या भारतातील सर्वाधिक श्रीमंत लोकांच्या यादीत त्याला दुसरे स्थान देण्यात आले. तो मि. व्हाईट म्हणजे राधाकृष्ण दमानी आणि ते रिटेल स्टोअर म्हणजे डी मार्ट होय.

आपला पहिला व्यवसाय डबघाईला आला म्हणून मि. दमाणी यांनी प्रयत्न करणे सोडले नाही. खरंतर "पुन्हा एकदा प्रयत्न करणं. हेच यशाचे गमक आहे." मि. दमाणी यांनी दुसऱ्या 'आणखी एकदा प्रयत्न करण्याच्या' मार्गाने वाटचाल केली. "आपल्या यशाच्या शेयर बाजाराने आयुष्यभरात ला उचांक गाठावा. असे वाटत असेल. तर, आजपासून नव्हे तर आतापासूनच कष्टाची गुंतवणूक करा." नेमका हाच संदेश मि. दमानी यांच्या जीवन प्रवासातून मिळतो. 

मि. दमानी भारतातील सर्वाधिक श्रीमंताच्या यादीत दुसऱ्या स्थानावर विराजमान आहेत. म्हणूनच ते एक यशवंत आहेत.

इथेच थांबतो. उद्या पुन्हा भेटू.
तोपर्यंत नमस्कार.

धन्यवाद..



No comments: