Tuesday, May 19, 2020

यशवंत - एक प्रेरणास्रोत भाग - 152

🎯  यशवंत - एक प्रेरणास्रोत.
🎯  भाग - 152.
🎯  श्री.संदीप पाटील,दुधगाव. 9096320023.

माझ्या ब्रॉडकास्ट लिस्टमध्ये सामील होण्यासाठी वरील क्रमांकावर नाव आणि पत्ता(जिल्हा)पाठवा.

https://sandeepbalgondapatil.blogspot.com/2020/05/152.html

सध्या भारतासह जगभरात कोरोनाने अक्षरशः थैमान घातलेलं आहे. अनेक देश लॉकडाऊन आहेत. या लढाईच्या काळात अनेक व्यवसायिकांना, कंपन्यांना मोठ्या प्रमाणात नुकसानीला सामोरे जावे लागले आहे. याचाच परिणाम येणाऱ्या काळात या कंपन्यांमध्ये नोकरी करणाऱ्या अनेक कर्मचारी, कामगारांवर होणार आहे. कदाचित बेरोजगार होण्याची वेळ त्यांच्यावर येण्याची शक्यता आहे. म्हणूनच घरांमध्ये बसून हे अनेक कर्मचारी काहीतरी व्यवसाय करण्याचा विचार करत आहेत. याच विचाराला खतपाणी घालण्याचा एक छोटासा प्रयत्न "यशवंत - एक प्रेरणास्त्रोत" या लेखमालेच्या या सातव्या पर्वाच्या निमित्ताने मी करतो आहे. या लेखमालेत येत्या काळात काही व्यावसायिकांच्या संघर्षाची कहाणी आपणासमोर मांडणार आहे. आशा आहे, आपणांस हा प्रवास नक्की आवडेल.

वयाच्या 20 व्या वर्षीच नोकरी सोडून स्वतःचा व्यवसाय सुरू करून, अथक परिश्रम करून, देशातील श्रीमंतांच्या यादीत मानाचे स्थान असणाऱ्या एका व्यावसायिकाचा प्रेरणादायी प्रवास आजच्या भागात आपण जाणून घेणार आहोत. चला तर मग....

24 जून 1965 रोजी गुजरात राज्यातील अहमदाबाद या शहरात एका सर्वसामान्य कुटुंबात त्याचा जन्म झाला. आईवडील आणि भावंडं मिळून त्याचा  आठ जणांचा त्याचा परिवार होता. वडिलांची आर्थिक परिस्थिती अतिशय कमजोर असल्यामुळेच ते आपल्या परिवारासह एका चाळीत आपले जीवन व्यतीत करत होते.

तसा शिक्षणात तो जेमतेमच होता. बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर गुजरात युनिवर्सिटीमध्ये त्याने पुढील शिक्षणासाठी प्रवेश घेतला. पण, याच काळात कुटुंबियांची पोटं भरण्याची जबाबदारी त्याच्यावर येऊन पडली. घरच्या या गरिबीमुळेच तो अत्यंत ध्येयवादी बनला होता. "आपल्या या कुटुंबाला या गरिबीतून बाहेर काढण्याचं स्वप्नं त्याने उराशी बाळगलं." आणि आपलं स्वप्नं पूर्ण करण्यासाठीच, वयाच्या 18 व्या वर्षीच, तो स्वप्नंनगरीत अर्थात मुंबईत पोहोचला.

मुंबईत एका डायमंड कंपनीत अतिशय अल्प पगारावर त्याने नोकरी स्वीकारली. पण, तो या मुंबईत नोकरी करण्यासाठी आलाच नव्हता. त्याला जाणीव होती, "जर आपल्या कुटुंबाला गरिबीतून बाहेर काढायचे असेल, तर नोकरी हा पर्याय नाही. त्यासाठी आपल्याला व्यवसायात उतरावंच लागेल.
त्याने जेमतेम दोन वर्षात नोकरी केली. पण, या काळात व्यवसायासाठी लागणारी सारी कौशल्य त्यांना हस्तगत केली आणि केवळ वयाच्या विसाव्या वर्षीच स्वतः हिऱ्याचं ब्रोकरेज आऊटफिट उघडलं. काही वर्षातच या व्यवसायांचा टर्न ओव्हर लाखांवर पोचला.आता वेळ बदलाची होती. त्याला आता वेगळं क्षेत्र खुणावू लागलं होतं. एका प्लास्टिक कंपनीत त्याने पुन्हा नोकरीला सुरुवात केली. इथेही त्याने या व्यवसायासंदर्भातील सारी कौशल्य आत्मसात केली. आता वेळ आली होती एका नव्या कंपनीच्या स्थापनेची. 1988 साली त्याने एका कंपनीची स्थापना केली आणि यानंतर त्याने मागे वळून पाहिलेच नाही. ती कंपनी होती अदानी एंटरप्राइजेस आणि त्याचा मालक म्हणजेच गौतम अदानी होय.

अदानी यांचा जीवन प्रवास पाहिला तर दोन गोष्टी लक्षात येतील. पहिली गोष्ट अशी की, कोणीही सर्वसामान्य व्यक्ती व्यवसाय करू शकतो आणि तो यशस्वी होऊ शकतो. पण, यासाठी आवश्यक असतात ती व्यवसायातील कौशल्य. ती आत्मसात करणं फारच आवश्यक असतं. आणि दुसरी गोष्ट अशी की, माणसानं प्रचंड ध्येयवादी असायला हवं. आपली स्वप्नं, पूर्ण करण्यासाठी झटणारी, परिश्रम करणारी माणसंचं यशाच्या शिखरावर पोहोचतात.

एकेकाळी अहमदाबादच्या चाळीत राहणारा आज मोठ्या बंगल्यात राहतो आहे. मित्राच्या स्कूटरमागे बसून अहमदाबाद फिरणारा आज स्वतः च्या विमानात बसून आपल्या व्यवसायाचे जाळे केवळ भारतातच नव्हे, तर जगभरात पसरवतो आहे. केवळ कठोर परिश्रमाच्या आणि प्रचंड ध्येयवादाच्या जोरावर गौतम अदानी भारतातील सर्वाधिक श्रीमंतांच्या यादीत मानाच्या स्थानावर जाऊन पोहोचले आहेत. म्हणूनच ते एक यशवंत आहेत.

इथेच थांबतो. उद्या पुन्हा भेटू.
तोपर्यंत नमस्कार.

धन्यवाद..


No comments: