Tuesday, May 19, 2020

यशवंत - एक प्रेरणास्रोत भाग - 153

🎯  यशवंत - एक प्रेरणास्रोत.
🎯  भाग - 153.
🎯  श्री.संदीप पाटील,दुधगाव. 9096320023.

_माझ्या ब्रॉडकास्ट लिस्टमध्ये सामील होण्यासाठी वरील क्रमांकावर नाव आणि पत्ता(जिल्हा)पाठवा._

परदेशी स्टॉक एक्सचेंज वर नोंदणी झालेली पहिली भारतीय कंपनी कोणती ? या कंपनीची स्थापना कोणी केली? हे आपणास माहीत आहे का ? जर माहित असेल तर अभिनंदन आणि नसेल तर काळजी करू नका. केवळ एकाच मिनिटात तुम्हाला याबाबत नक्की माहिती होईल. या कंपनीची स्थापना करणाऱ्या संस्थापकाचा प्रेरणादायी प्रवास आजच्या भागात जाणून घेणार आहोत.. चला तर मग..

कर्नाटक राज्यातील सिडलाघाट्टा येथे 20 ऑगस्ट 1946 रोजी एका सामान्य कुटुंबात त्याचा जन्म झाला. जन्मताच त्याला कुशाग्र बुद्धिमत्तेची देणगी लाभली होती. त्यामुळे आपल्या बुद्धीच्या बळावर त्याने 1967 मध्ये इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पूर्ण केले. शिवाय कानपूरच्या IIT मधून एम.टेक. देखील पूर्ण केले.

त्यांच्याकडे दूरदृष्टी तर होतीच शिवाय भविष्याचा वेध घेण्याची क्षमता होती. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर अनेक नामांकित कंपन्यांनी त्याच्या समोर नोकरीसाठी अक्षरशः पायघड्या घातल्या. मोठ्या पगाराचे आमिष दाखविले. परंतु, त्याने अहमदाबाद येथील 'इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट' या कंपनीत अत्यल्प पगारावर नोकरी पत्करली. कारणही, तसेच होते. त्याकाळी भारतात संगणक असणारी ती एकमेव कंपनी होती.

भारतात संगणक युगाची सुरुवात 1985 झाली झाली आणि 1990-95 च्या काळात त्याने वेग धरला. 'येणाऱ्या काळात संगणक माणसाच्या जीवनाचा अविभाज्य घटक बनेल.' याची त्याला पुरेपूर 15 वर्षे आधी त्याला कल्पना आली होती. त्यामुळेच मिळालेल्या संधीचा त्याने पुरेपूर फायदा उचलला. संगणक त्याच्या संशोधनाचा विषय बनला होता. त्यामुळेच या कंपनीत तो सकाळी सात वाजल्यापासून पहाटे तीन वाजेपर्यंत, वीस - वीस तास संगणकावर काम करायचा. प्रचंड मेहनत घेतली. संगणकातील अनेक प्रोग्रॅम त्याने जाणून घेतले.

काही वर्षाच्या नोकरीनंतर त्याने स्वतःची कंपनी सुरू केली. पण, अल्पावधीतच ती कंपनी बंद करावी लागली. नाईलाजाने पुन्हा नोकरीच्या शोधत तो पुण्यात आला. येथे आल्यानंतरही त्याने आपल्या स्वप्नांचा पाठलाग सोडला नाही. 1981 साली त्याने आपली कल्पना काही मित्रांना सांगितली आणि त्यांच्या सोबतीने, उसनवार पैसे घेवून एका कंपनीची स्थापना केली. कठोर मेहनतीच्या जोरावर त्यांनी आपली कंपनी नावारूपास आणली. कधीकाळी उसनवार पैसे घेऊन सुरू केलेल्या कंपनीचा टर्नओवर आज हजारो कोटींच्या वर आहे. परदेशी स्टॉक एक्सचेंज वर नोंदणी झालेली ती पहिली भारतीय कंपनी म्हणजे इन्फोसिस होय आणि या कंपनीचे मुख्य संस्थापक म्हणजेच नागवार रामाराव अर्थात एन.आर. नारायण मूर्ती होय.

नारायण मूर्ती हे पैशाने गरीब असलेल्या कुटुंबातील असले, तरी देखील विचारांनी अतिशय समृद्ध होते. भविष्याचा वेध घेण्याची क्षमता त्यांच्याकडे होती. आपली स्वप्नं पूर्ण होईपर्यंत, त्यांचा पाठलाग करण्याची जिद्द आणि चिकाटी त्यांच्याकडे होती. शिवाय मिळालेल्या संधीचं सोनं करण्याची जबरदस्त इच्छाशक्ती त्यांच्याकडे होती.

मूर्ती यांच्या या प्रवासात अनंत अडचणी आल्या. निरंतर प्रतिकूल परिस्थितीशी त्यांनी झुंज दिली. त्यावर मात केली. त्यांनी आपल्या स्वप्नांचा वेड्यासारखा पाठलाग केला. नोकरी सोडून प्रवाहाच्या विरोधात काम केले आणि जगाला हे दाखवून दिले की, 'आपण आत्मविश्वासाने आणि समर्पणाने काहीतरी करण्याचा दृढनिश्चय केला, तर यशस्वी होतोच.'

टाईम मासिकाने त्यांना ‘भारतीय आयटी उद्योगाचे जनक' असे सम्बोधले. म्हणूनच ते एक यशवंत आहेत.

इथेच थांबतो. उद्या पुन्हा भेटू.
तोपर्यंत नमस्कार.

धन्यवाद..




🎯 *भाग - 152* वाचण्यासाठी 👇येथे क्लिक करा.
https://sandeepbalgondapatil.blogspot.com/2020/05/152.html

No comments: