Friday, May 15, 2020

मित्रवर्य अविनाश कर्पे याच्या वाढदिवसानिमित्ताने ...

*मित्रवर्य अविनाश कर्पे याच्या वाढदिवसानिमित्ताने ...*

*2018 सालं...  जुनी पेन्शन हक्क संघटनेचं वारं महाराष्ट्राबरोबरच संपूर्ण सातारा जिल्ह्यात जोरात वाहत होतं. जुनी पेन्शन हक्क संघटनेचा दौरा संपूर्ण सातारा जिल्हा फिरून शेवटी पाटण तालुक्यात आला होता. जिल्हा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थित पहिल्यांदाच पाटण तालुका निर्धार मेळावा आयोजित केला गेला होता. या मेळाव्याला संध्याकाळी खूपच उशिरा सुरुवात झाली होती. तरीह देखील मी या मेळाव्यासाठी उपस्थित होतो. कारण एक परिचित चेहरा या कार्यक्रमासाठी मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित राहणार होता.*

मेळाव्याला सुरुवात झाली. व्यासपीठावर अनेक जिल्हा व तालुका प्रतिनिधी विराजमान होते. सुरुवातीला काही मान्यवरांची भाषणे झाली. आणि नंतर तो परिचित चेहरा बोलण्यासाठी उभा राहिला. व्यासपीठावर उभं राहण्याची, बोलण्याची, मान हलविण्याची, नजर फिरवण्याची लकब अगदी जशीच्या तशीच होती. जी मी 12 वर्षांपूर्वी पाहिली होती.

जिल्हा संघटनेवर त्याचा प्रचंड दबदबा असल्याचे या निमित्ताने मला जाणवले. आपला एक मित्र जिल्ह्याच्या संघटनेवर काम करतो आहे. संपूर्ण जिल्ह्यात त्याला मोठा मानसन्मान लाभतो आहे. त्याचा प्रचंड मोठा जनसंपर्क आहे. जुन्या पेन्शन च्या लढ्यामध्ये त्याचे योगदान खूप मोठे आहे. यासाठी तो दिवस रात्र मोठी धावपळ सहन करतो आहे. याचा मला अभिमान वाटला. सातारा जुनी पेन्शन हक्क संघटनेच्या वाटचालीत ज्याचा मोलाचा वाटा आहे, असा *तो परिचित चेहरा म्हणजेच आपल्या सर्वांचा लाडका मित्र " लाला उर्फ अविनाश कर्पे होय. "* आज त्याचा वाढदिवस. त्याला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा..

अविनाश माझा डीएडचा वर्गमित्र. तो डीएडच्या काही घनिष्ठ मित्रांपैकी एक. दिसायला हँडसम असलेलं व्यक्तिमत्त्व. व्यासपीठ गाजविण्यात तरबेज असलेला वक्ता म्हणजे अविनाश. तो सातारा जिल्ह्यातील देऊर ता.कोरेगाव येथील रहिवाशी. एक दोनदा त्याच्या गावी जाणे झाले आहे. डी.एड. ला असताना तो हॉस्टेल ला राहायचा.

*अविनाश उत्तम आचारी शिवाय विचारीही. तितकाच लेखक आणि कवीही. उत्तम गायक आणि उत्तम नर्तकही. असा तो हरहुन्नरी नायक. स्वतःला बॉण्ड म्हणवून घेण्यात त्याला भारी हौस. माझ्या डब्यातील दहीभात त्याला प्रचंड आवडायचा.*

नोकरी लागल्यानंतर ही मैत्रीचा हा बंध अधिकच घट्ट झाला. फोनवर सातत्याने संपर्क असायचा. अनेक बाबतीत सल्लामसलत घडायचे आणि याच माध्यमातून डी. एड. मित्रांचे बचतगट स्थापन करण्याची माझी संकल्पना प्रत्यक्षात आली. वेगवेगळ्या जिल्ह्यात राहत आणि कार्यरत असलेले अनेक मित्र या गटाशी जोडले गेले आहेत. आज या बचतगटाची योग्य दिशेने व यशस्वी वाटचाल सुरू आहे. दोनदा वार्षिक सभाही झाली. त्यात मित्रांच्या भेटीचे समाधान अधिक. यात अविनाशची भूमिका मोलाची आहे.

सध्या अविनाश स्व: जिल्ह्यात कार्यरत आहे. *जुनी पेन्शन हक्क संघटनेत* मोलाचा सहभाग आहे. 2019 साली *" सातारा शिक्षक मंच "* या व्हॉट्सअँप समूहाची स्थापना झाली. या समूहाच्या कृतिशील सदस्यांमध्ये अविनाश चे नाव अग्रभागी आहे. अल्पावधीतच हा समूह संपूर्ण सातारा जिल्ह्यात लोकप्रिय झाला. या समूहाची दखल सातारा जिल्हा प्रशासनाने घेतली आहे. शिवाय, सध्या लॉक डाऊन च्या काळात सातारा जिल्ह्यातील हजारो विद्यार्थी, शाळा बंद असतानाही शैक्षणिक प्रवाहात कायम राहावेत, या उद्देशाने ऑनलाईन टेस्ट ची निर्मिती करण्यात अविनाश ने मोलाचा वाटा उचलला आहे.

*नुकताच अविनाश ने स्वतःचा ब्लॉग निर्माण केला आहे. त्यावर विविध माहिती, शैक्षणिक GR, स्व: लिखित कविता, कथा, प्रवास वर्णन अशा अनेकविध गोष्टींनी परिपूर्ण असा ब्लॉग आहे.*
त्याच्या ब्लॉगची लिंक

https://avinashkarpe.blogspot.com

*"यशवंत - एक प्रेरणास्रोत"* ही माझी लेखमाला सर्वदूर पोहोचविण्यात अविनाशने मोलाचे सहकार्य केले आहे. त्याने ज्या ज्या क्षेत्रात पाऊल टाकले, त्या त्या क्षेत्रात त्याने स्वतःला सिद्ध केले आहे. अनेक खडतर प्रसंगांना तोंड देऊन त्याने यश संपादन केले आहे. त्याच्या याच स्वभावाने तो आपली सर्व स्वप्ने पूर्ण करेल यात शंका नाही. त्याची स्वरूप सर्व स्वप्ने पूर्ण व्हावी. यासाठी माझ्याकडून अनेक अनेक शुभेच्छा. *अविनाश पुन्हा एकदा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.*

*धन्यवाद.*
*संदिप पाटील, दुधगाव.*
*9096320023.*



No comments: