Sunday, May 24, 2020

यशवंत - एक प्रेरणास्रोत भाग - 157

🎯  यशवंत - एक प्रेरणास्रोत
🎯  भाग - 157
🎯  श्री.संदीप पाटील,दुधगाव. 9096320023.

_माझ्या ब्रॉडकास्ट लिस्टमध्ये सामील होण्यासाठी वरील क्रमांकावर नाव आणि पत्ता(जिल्हा)पाठवा._

कधीकाळी एका हॉटेलमध्ये कूक म्हणून काम करणार्‍या एका व्यक्तीचे आज जगभरात 450 हून अधिक हॉटेल्स आहेत. त्याला हे कसं शक्य झालं ? त्याच्या यशाची गुरुकिल्ली कोणती ? कोण आहे हा यशवंत ? जाणून घेऊ आजच्या भागात. चला तर मग...

मुंबईतील ग्रँड रोड रेल्वे स्टेशन परिसरात राहणाऱ्या एका सामान्य कुटुंबात त्याचा जन्म झाला. लहानपणापासूनच तो हुशार. ज्या गोष्टी आपल्याला जमत नाहीत. त्या आत्मसात करण्यावर त्याचा खूप भर असायचा. यामुळेच त्याने अभियांत्रिकीचे शिक्षण यशस्वी रित्या पूर्ण केले. 

त्याचे वडील एक हॉटेलचालक. त्यांचा व्यवसाय अतिशय जोमाने चालायचा. कोणीतरी त्याच्या वडिलांना फसवून दोन पैकी एक हॉटेल हस्तगत केले. घडल्या प्रसंगाने संपूर्ण कुटुंबच हादरून गेले. मग त्याच्या आईने त्याला वडिलांसोबत काम करण्यास सुचविले. तो राजी तयार झाला. वडिलांच्या व्यवसायाला हातभार लावू लागला. विस्कटलेल्या व्यवसायाची घडी त्याने बसविली. आता त्याच्या विचारांची उंची वाढली होती. मुंबईत सर्वात मोठं हॉटेल उभारण्याचा, व्यवसायाचा विस्तार वाढविण्याचा मोठा विचार त्याच्या मनात निर्माण झाला. त्याने तो विचार वडिलांना बोलूनही दाखवला. वडील राजी झाले आणि त्याच्या स्वप्नं पूर्तीच्या प्रवासाची सुरुवात झाली.

विदेशवारी करून तेथील वेगवेगळ्या खाद्यांची माहिती जमा करण्याचे त्याने निश्चित केले. यासाठी त्याने थेट लंडन गाठले आणि तेथील एका हॉटेलमध्ये त्याने अल्प पगारावर कूक ची नोकरी स्वीकारली. विविध खाद्य पदार्थ शिकण्याबरोबरच हॉटेल व्यवसायातील बारकावे तो शिकला. निश्चित केलेले उद्दिष्ट त्याने साध्य केले. जगभर प्रवास करून तो भारतात परत आला. गाठीला असलेल्या पैशातून त्याने एक हॉटेल सुरू केले. ते यशस्वीरित्या चालविले. मग एकामागोमाग एक अशी अनेक हॉटेल्स सुरू झाले. दरम्यान सांताक्रूझ विमानतळाजवळचे हॉटेल 'प्लाझमा' विकण्यासाठी काढले होते. त्यांने ते हॉटेल खरेदी करण्याचा निर्णय घेतला. जवळ पुरेसे पैसे नव्हते. पण, जिद्द असेल तर माणूस काहीही करून दाखवू शकतो. याची प्रचिती आली. मोठ्या जिद्दीने त्याने पैसे गोळा केले. ते हॉटेल खरेदी केले आणि त्याच जागेवर केवळ भारतातील नव्हेच तर आशियातील पहिले "इको-टेल फाइव्ह स्टार हॉटेल" (पर्यावरण पूरक हॉटेल) उभे राहिले. ते "इको-टेल फाइव्ह स्टार हॉटेल" म्हणजेच "हॉटेल ऑर्किड" होय आणि त्याचा मालक म्हणजेच डॉ.विठ्ठल कामत होय. 

वयाच्या विसाव्या वर्षी विठ्ठल कामत यांनी प्रसिद्ध हॉटेल व्यावसायिक राव बहादुर ऑबेराय यांना सांगितले होते की," मला तुमच्या हॉटेल पेक्षा मोठे हॉटेल मुंबईत बांधायचे आहे." त्यांचे हे स्वप्नं पूर्ण होण्यासाठी तब्बल 30 वर्षे लागली. त्यासाठी प्रचंड मेहनत करावी लागली. यशाच्या शिखरावर पोहोचण्यासाठीची शिडी एका दिवसात चढता येत नाही. हे नव्याने सांगायला नको. 

यश हे तुमच्या आर्थिक आणि सामाजिक स्थितीवर नव्हे, तर तुमच्या मानसिकतेवर अवलंबून असते. आपल्या मानसिकते समोर सर्व समस्या शून्य असतात. दृढ निश्चय, जिद्द आणि कष्ट करण्याची तयारी या यशाच्या गुरुकिल्ली जोरावरच, केवळ भारतातच नव्हे तर जगभरात 450 हून अधिक हॉटेल्स उभे करण्यात, कामत यशस्वी झाले आहेत. म्हणूनच ते एक यशवंत आहेत.

*कृपया ब्लॉग फॉलो करा....*

इथेच थांबतो. उद्या पुन्हा भेटू.
तोपर्यंत नमस्कार.


धन्यवाद..




🎯 *भाग - 156* वाचण्यासाठी 👇येथे क्लिक करा.
https://sandeepbalgondapatil.blogspot.com/2020/05/156.html







No comments: