Monday, May 25, 2020

यशवंत - एक प्रेरणास्रोत भाग - 158

🎯  यशवंत - एक प्रेरणास्रोत.
🎯  भाग - 158.
🎯  श्री.संदीप पाटील,दुधगाव. 9096320023.

_माझ्या ब्रॉडकास्ट लिस्टमध्ये सामील होण्यासाठी वरील क्रमांकावर नाव आणि पत्ता(जिल्हा)पाठवा._


सातारा जिल्ह्यातील एका खेड्यात जन्माला आलेल्या आणि केवळ दहावीपर्यंत शिक्षण झालेल्या एका तरुणाने हजारो कोटींची, आंतरराष्ट्रीय ख्याती असलेली कंपनी निर्माण करून, ग्रामीण भागातील तरुणांसमोर आदर्श निर्माण केला. कोण हा तरुण ? काय त्याचा संघर्ष ? जाणून घेऊ आजच्या भागात. चला तर मग...

1 नोव्हेंबर 1966 रोजी सातारा जिल्ह्यातील रहिमतपूर येथे एका सर्वसामान्य कुटुंबात त्याचा जन्म झाला. पोटाची खळगी भरण्यासाठी आईवडिलांनी थेट पुणे गाठलं. वडील फिलिप कंपनी हेल्पर, तर आई घरकाम करायची. आपल्या मुलांनी उत्तम असे शिक्षण घ्यावं. ही वडिलांची इच्छा. आर्थिक परिस्थिती बेताची असतानाही, त्यांनी त्याला इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घातले. पुस्तके,फी यासाठी पैसे लागायचे. त्यासाठी वडील घरात इलेक्ट्रॉनिक्स वस्तू दुरुस्तीचे काम करायचे.

कसेबसे दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण करून त्याने शिक्षणाला कायमचा रामराम ठोकून वडिलांना कामात मदत करायला सुरुवात केली. एका कॅल्क्युलेटर दुरुस्त करणाऱ्या कंपनीत त्याने नोकरी मिळवली. याबरोबरच अन्य यंत्र दुरुस्ती करण्याचे तंत्रही, त्याने आत्मसात केले. थोड्याच दिवसात स्वतःचे दुकान देखील सुरू केले. आता तो बऱ्यापैकी पैसे मिळवू लागला होता. एक दिवस एका बँकेमध्ये प्रिंटर दुरुस्ती करण्यासाठी गेला असता, त्याला टीव्ही सारखी एक वस्तू दिसली. त्याचे कुतूहल जागृत झाले. त्याला कोणीतरी सांगितले की, "याला संगणक म्हणतात आणि येणारे युग हे संगणक युग आहे." तो नव्वदच्या दशकाचा काळ होता. त्यावेळी भारतात संगणकाने चंचुप्रवेश केला होता. त्याला भविष्यात होऊ घातलेल्या बदलाची चाहूल लागली.

आपल्या भावाला कॉम्प्युटर इंजिनिअरिंग साठी प्रवेश घेऊन दिला आणि स्वतः मोठ्या जिद्दीने संगणक दुरुस्त करण्याचे तंत्र आत्मसात केले. काही दिवसातच पुण्यामध्ये संगणक हार्डवेयर दुरुस्तीच्या क्षेत्रात त्याचा दबदबा निर्माण झाला. भारतात इंटरनेटच्या प्रवेश सोबत, संगणकात व्हायरसने   शिरकाव केला. संगणक नादुरुस्त होऊ लागले. एक नवे आव्हान,एका नव्या संधीच्या रूपाने त्याच्या सामोरं उभे राहिले. व्हायरस ने संगणक नादुरुस्त होऊ नये,यासाठी अँटी व्हायरस चा वापर व्हायचा. या अँटी व्हायरस ने आपण पैसे कमावू शकतो. याची जाणीव त्याला झाली. आपल्या भावाच्या मदतीने त्याने स्वतः च अँटी व्हायरस तयार करायचे ठरविले. तब्बल दीड वर्षे प्रयत्न करून एका देशी अँटी व्हायरस चा जन्म झाला. एक नवी कंपनी स्थापन केली. अथक परिश्रम करून आपले उत्पादन विकले आणि कंपनी नावारूपास आली. आंतरराष्ट्रीय बाजारात त्या कंपनीने आपले स्थान भक्कम केले. ती कंपनी म्हणजेच क्लिक हिल आणि त्याचा संस्थापक म्हणजेच कैलास काटकर होय.

कैलासजींचा हा प्रवास अतिशय खडतर आहे.  तीव्र स्पर्धा, आर्थिक चणचण, नवे उत्पादन, अनेक नावाजलेल्या परदेशी कंपन्या या व यासारख्या असंख्य समस्यांना ते पुरून उरले आहेत. तीव्र बुद्धी, खडतर परिश्रम, ऊर्जा, चिकाटी, नाविन्याची ओढ, भविष्याची जाण यासारख्या अनेक गुणांसोबतच गुणवत्तापूर्ण उत्पादनाच्या जोरावर त्यांनी 112 हून अधिक देशात आपल्या कंपनीचे जाळे निर्माण केले आहे. 

कैलाशजींच्या या प्रवासात ना कुटुंबाची आर्थिक स्थिती आड आली, ना शिक्षण. केवळ त्यांचं कर्तृत्वच त्यांना यशाच्या शिखरावर घेऊन गेलं आहे.  पुण्यातील एका चाळीतील एका लहानशा खोलीत सुरू झालेल्या या कंपनीचा प्रवास एक नावाजलेला ब्रँड बनून, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत आज स्वतःचं वेगळं अस्तित्व आणि भक्कम स्थान निर्माण करण्यात कैलाश काटकर यशस्वी झाले आहे. म्हणूनच ते एक यशवंत आहेत.


*कृपया ब्लॉग फॉलो करा....*

इथेच थांबतो. उद्या पुन्हा भेटू.
तोपर्यंत नमस्कार.

धन्यवाद..



🎯 *भाग - 157* वाचण्यासाठी 👇येथे क्लिक करा.
https://sandeepbalgondapatil.blogspot.com/2020/05/157.html

No comments: