Tuesday, May 26, 2020

यशवंत - एक प्रेरणास्रोत भाग - 159

🎯  यशवंत - एक प्रेरणास्रोत
🎯  भाग - 159
🎯  श्री.संदीप पाटील,दुधगाव. 9096320023.

_माझ्या ब्रॉडकास्ट लिस्टमध्ये सामील होण्यासाठी वरील क्रमांकावर नाव आणि पत्ता(जिल्हा)पाठवा._


एका लहान खेड्यात जन्माला आलेल्या एका ध्येयवादी व्यक्तीने स्थापन केलेल्या कंपनीने, भारतातील माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील सर्वांत मोठ्या तिसऱ्या क्रमांकाच्या कंपनीचा मान पटकावला. ही कामगिरी करताना त्या कंपनीने विप्रोला सारख्या नावाजलेल्या कंपनीलाही मागे टाकले आहे. अशी कामगिरी करणारी ती व्यक्ती कोण ? ती कंपनी कोणती ? त्याचा संघर्ष काय ? जाणून घेऊ आजच्या भागात. चला तर मग....

तामिळनाडूच्या तुतीकुडी जिल्ह्यातील मूलयपोळी या अतिशय लहान गावात 14 जुलै 1945 रोजी त्याचा जन्म झाला. आई वडील शिक्षणाबाबत अतिशय जागरूक असल्याने त्याच्या शिक्षणाकडे त्यांनी विशेष लक्ष दिले. शिवाय तो जात्याच हुशार असल्याने त्याने शिक्षणात आघाडी घेतली. त्याने इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स इंजीनियरिंग चे शिक्षण पूर्ण केले.

1967 साली म्हणजेच वयाच्या 22 व्या वर्षी पुणे एका कंपनीत त्याने आपल्या नोकरीला सुरुवात केली. परंतु तो नोकरीत असमाधानी होता. त्याला स्वतःचं अस्तित्व निर्माण करायचं होतं. स्वतःचा व्यवसाय सुरु करायचा होता. ते त्याचं स्वप्नं होतं. त्यासाठी काहीही करायची त्याची तयारी होती. यासाठी तो योग्य अशा संधीची वाट पाहत होता.
ही संधी त्याला दिल्लीला गेल्यावर मिळाली. हा त्याच्या जीवनातील टर्निंग पॉईंट ठरला. येथेच त्याला त्याच्यासारखाच आणि मोठा विचार करणारे काही मित्र मिळाले. ते मित्र देखील त्याच्यासारखेच नोकरीतही असमाधानी होते. जीवनात आव्हानात्मक करण्याची संधी शोधत होते.

1975 साल. हा तो काळ होता की, भारतात संगणकाने नुकताच प्रवेश केला होता. येणारे युग हे संगणकाचे युग आहे. हे त्याने अचूक हेरले होते. आपल्या मित्रांना स्वतः संगणक बनवण्याचा आपल्या मनातील विचार त्याने सहकाऱ्यांना बोलून दाखवला. पण, त्यासाठी मोठ्या आर्थिक तरतुदीची आवश्यकता होती. म्हणून ते डगमगले नाहीत. सर्वांनी मोठी जोखीम घेऊन मोठ्या पगाराची नोकरी सोडली. आणि उपलब्ध रकमेत त्याच वर्षी कॅलकुलेटर्स विकणारी स्वतःची एक भागीदारी कंपनी सुरू केली. लगेचच 1976 साली एका गॅरेज मध्ये, संगणक बनविणारी स्वतःची कंपनी सुरू केली. 1977 सालं त्यांच्यासाठी एक मोठी संधी घेवून आलं. याचं वर्षी IBM सारख्या नावाजलेल्या कंपनीला भारतातून काढता पाय घ्यावा लागला होता. बाजारात मोठी पोकळी निर्माण झाली होती. ती पोकळी भरून काढण्याची संधी त्याला मिळाली. त्याने या संधीचं सोनं केलं. आपल्या मेहनतीच्या जोरावर त्यांनी ग्राहकांची मने जिंकली आणि त्याने मागे वळून पाहिलेच नाही. 2019 साली त्याची कंपनी भारतातील माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील सर्वांत मोठ्या तिसऱ्या क्रमांकावर पोहचली आणि तो देशातील सर्वाधिक श्रीमंतांच्या यादीत पाचव्या स्थानावर विराजमान झाला. ती कंपनी म्हणजेच हिंदुस्थान कॉम्प्युटर्स लिमिटेड अर्थात HCL आणि त्याचा संस्थापक म्हणजेच शिव नाडर होय.

नाडर यांचा प्रवास पहिला तर लक्षात येतं की, आपण कोठून आलो आहोत ? आपला जन्म कोठे झाला आहे ? या बाबी यशस्वी होण्यात फारच गौण आहेत.
जोखीम उचलणं म्हणजे संधी साधणं. 
जोखीम उचलणं म्हणजे स्वतःची स्वप्नं पूर्ण करणं.
जोखीम उचलणं म्हणजे यशाच्या शिखरावर पोहोचणं. 
यशस्वी होण्यासाठी, आपली स्वप्नं पूर्ण होण्यासाठी, जोखीम उचलली तर पाहिजेच.

उत्तम पगाराची नोकरी सोडून स्वतःचा व्यवसाय सुरु करण्याची जोखीम शिव नाडर यांनी पत्करली म्हणूनच ते भारतातील सर्वाधिक श्रीमंतांच्या यादीत मानाच्या स्थानावर विराजमान होऊ शकले. म्हणूनच ते एक यशवंत आहेत.

*कृपया ब्लॉग फॉलो करा....*

इथेच थांबतो. उद्या पुन्हा भेटू.
तोपर्यंत नमस्कार.

धन्यवाद..

🎯 *भाग - 158* वाचण्यासाठी 👇येथे क्लिक करा.
https://sandeepbalgondapatil.blogspot.com/2020/05/158.html

No comments: