Saturday, May 23, 2020

यशवंत - एक प्रेरणास्रोत भाग - 156

🎯  यशवंत - एक प्रेरणास्रोत
🎯  भाग - 156
🎯  श्री.संदीप पाटील,दुधगाव. 9096320023.

_माझ्या ब्रॉडकास्ट लिस्टमध्ये सामील होण्यासाठी वरील क्रमांकावर नाव आणि पत्ता(जिल्हा)पाठवा._

भारत - पाकच्या फाळणीत आपले सर्वस्व गमावून पाकिस्तानातून भारतात रिकामे आलेल्या एका पाचवी नापास महाशयाने, अनंत अडचणींवर मात करून स्वतःचे वेगळे अस्तित्व निर्माण केले. आपल्या कर्तुत्वाच्या जोरावर त्याने अब्जावधी रुपयांचे साम्राज्य निर्माण केले. स्वतःचा वेगळा ब्रँड निर्माण केला. त्या कर्तृत्ववान यशवंताचा प्रेरणादायी प्रवास, आजच्या भागात आपण जाणून घेणार आहोत. चला तर मग.. 

27 मार्च 1923 साली तत्कालीन भारतातील सियालकोट येथे एका सामान्य कुटुंबात महाशयचा जन्म झाला. शालेय शिक्षणात काडीचाही रस नसल्याने चौथीपर्यंत तो कसाबसा पास झाला.पण, पाचवीत पास होऊ शकला नाही. पर्यायाने वयाच्या 10 व्या वर्षीच त्याने शिक्षण सोडून दिले.

शालेय शिक्षण अर्ध्यात सुटले. पण, व्यावहारिक जीवनातील शिक्षण महाशयाची वाट पाहत होते. उनाडक्या करत हिंडणाऱ्या या मुलाने "काहीतरी काम शिकावे." या उद्देशाने वडिलांनी एका दुकानात कामाला लावले. परंतु, ते काम त्याला आवडले नाही. म्हणून त्याने ते काम सोडून दिले. वयाच्या 15 व्या वर्षापर्यंत त्याने आपल्याला न आवडणारी पन्नासेक कामे सोडून दिली. यामुळे त्याचे वडील हैराण झाले आणि त्यांनी त्याला एक मसाल्याचे दुकानच काढून दिली. मसाल्याचा व्यवसाय त्याला मनापासून आवडू लागला. त्याने या व्यवसायात जम बसविला.

तो काळ भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा होता. अशातच भारताची फाळणी झाली. सियालकोट प्रांत पाकिस्तानात गेला. तेथील हिंदूंची अवस्था बदतर झाली. त्यामुळेच महाशय आणि त्याचा परिवार आपले सर्वस्व सोडून सियालकोट मधून भारतातील दिल्ली येथे आला. दिल्लीत येताना त्याच्याकडे केवळ पंधराशे रुपये होते. रुपयांमध्ये काही त्याने टांगा खरेदी केला. एकेकाळचा मसाला व्यापारी, आज टांगेवाला बनला होता. वेळ अतिशय वाईट होती. यातच केवळ दोनच महिन्यांत, व्यवसाय न आवडल्याने महाशयांने टांगा चालविणे बंद केले.

एकेदिवशी बेरोजगारी महाशय विचार करत बसला होता. "आपण केवळ मसाला बनविण्याचेच काम उत्तम प्रकारे करू शकतो. शिवाय, ते आपल्या आवडीचे काम आहे." या विचाराने त्याच्या मनात विश्वास निर्माण झाला. त्याने घरातच मसाला बनविण्याचे काम सुरू केले. घरोघरी जाऊन तो आपले उत्पादन विकू लागला. त्याच्या ईमानदार वृत्तीने, दर्जेदार आणि निर्भेळ मसाल्याने ग्राहकांचे मन त्याने जिंकले. त्याच्या मसाल्याची मागणी वाढू लागली. त्याने स्वतः ची फॅक्टरी उभी केली. यानंतर त्याने मागे वळून पाहिलेच नाही. केवळ दिल्लीतच नव्हे तर जगभरात त्याच्या मसाल्याचा वास पसरला. साऱ्या जगभरात त्याचा ब्रँड नावारूपास आला. तो प्रसिद्ध ब्रँड म्हणजेच MDH. आणि तो महाशय म्हणजेच महाशय धर्मपाल गुलाटी होय. 

धर्मपाल गुलाटी यांच्या जीवन प्रवासावरून प्रकर्षाने जाणवणारी एक बाब म्हणजे," ज्या क्षेत्रात आपणास आवड आहे. ज्या कामात आपण निपुण आहोत. ती आवड आणि ते कामच आपल्याला यशाच्या शिखरावर पोहोचू शकते." आवड नसणारे काम आपला वेळ आणि शक्ती दोन्ही व्यर्थ घालविते. यशस्वी होण्यासाठी, व्यर्थ जाणारा वेळ आणि शक्ती वाचविण्यासाठी आपल्या आवडीचे क्षेत्र कोणते ? हे लवकरात लवकर शोधले पाहिजे. आणि त्यात जीव ओतून काम केले पाहिजे. 

धर्मपाल गुलाटी यांनी देखील हेच केले आहे. आज 92 वर्षे वय असताना ही कामातील त्याचा उत्साह एखाद्या तरुणाला ही लाजवेल असा आहे. ते भारतातील सर्वात वयोवृध्द आणि सर्वाधिक पगार असणारे CEO आहेत. म्हणूनच ते एक यशवंत आहेत.



*कृपया ब्लॉग फॉलो करा....*

इथेच थांबतो. उद्या पुन्हा भेटू.
तोपर्यंत नमस्कार.

धन्यवाद..



🎯 *भाग - 154* वाचण्यासाठी 👇येथे क्लिक करा.
https://sandeepbalgondapatil.blogspot.com/2020/05/155.html

No comments: