Friday, May 22, 2020

यशवंत - एक प्रेरणास्रोत भाग - 155

🎯  यशवंत - एक प्रेरणास्रोत.
🎯  भाग - 155
🎯  श्री.संदीप पाटील,दुधगाव. 9096320023.

_माझ्या ब्रॉडकास्ट लिस्टमध्ये सामील होण्यासाठी वरील क्रमांकावर नाव आणि पत्ता(जिल्हा)पाठवा._

माणसाचा विचार त्याची सर्वात मोठी ताकद असते. विचार मोठा असेल आणि काही करून दाखवण्याची इच्छा शक्ती असेल, तर मग माणसाची सध्याची परिस्थिती काय आहे ? याचा त्याच्यावर काही फरक पडत नाही. ज्याला आपले स्वप्नं काय आहे? ध्येय काय आहे ? हे माहीत असते. तो जीवनातील सर्व आव्हाने, अडचणी आणि प्रतिकूल परिस्थितीही आपली स्वप्नं, आपली ध्येय पूर्ण करतोच. आज आपण अशाच एका यशवंता विषयी जाणून घेणार आहोत की, जो आपल्या विचारांच्या, कठोर परिश्रम आणि दुर्दम्य इछाशक्तीच्या जोरावर यशाच्या शिखरावर जाऊन विराजमान झाला आहे. चला तर मग जाणून घेऊ आजच्या भागात...

13 एप्रिल 1944 रोजी गुजरातमधील मेहसाणा येथील एका शेतकरी कुटुंबात के.के. चा जन्म झाला. तत्कालीन परिस्थिती फार कमी लोक शिक्षण घ्यायचे. परंतु, तो हुशार असल्याने शालेय शिक्षणात सतत आघाडीवर राहिला. शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्याने बी.एस.सी. केमेस्ट्री मधून आपले शिक्षण पूर्ण केले आणि अहमदाबाद येथील एका लॅब मध्ये असिस्टंट म्हणून नोकरी पत्करली.

काही दिवसांनी त्याला सरकारी नोकरी मिळाली. परंतु, नोकरीमध्ये के.के. चे मन फारसे रमले नाही. काहीतरी वेगळं आणि मोठं करून दाखवण्याचा विचार सातत्याने त्याच्या मनात यायचा. आणि याच विचारातून त्याच्या मनामध्ये एका नव्या कल्पनेने शिरकाव केला. कल्पना होती डिटर्जंट पावडर तयार करण्याची. लगेचच के.के. ने या कल्पनेवर काम करायला सुरुवात केली. बाजारातील उपलब्ध डिटर्जंट त्याचा दर्जा, किंमत व ग्राहकांची आर्थिक स्थिती या सर्वाचा विचार करून आणि लॅब मधील आपल्या आजवरच्या अनुभवाचा वापर करून, कठोर मेहनत करून, काही दिवसातच त्याने एका खूपच स्वस्त आणि दर्जेदार अशा डिटर्जंट पावडवरची निर्मिती केली.

खरंतर मनात आलेला विचार आणि तो प्रत्यक्षात आणण्या पर्यंतचा प्रवास, के.के.साठी फारसा अवघड नव्हता. सर्वात मोठा प्रश्न होता पावडरच्या उत्पादनाचा, ते कसे करायचे ? याचा. पावडर च्या उत्पादनासाठी आवश्यक कारखाना उभा करण्यासाठी व पावडर तयार करण्यासाठी कर्मचारी नेमून, त्याचा पगार देण्याची के.के.ची ऐपत नव्हती. कित्येक सामान्य विचार असणारी माणसं नेमकं याच ठिकाणी थांबली आणि मागे फिरली. परंतु, के.के. चा विचार खूप मोठा होता. समोर असलेल्या या पहाडा एवढ्या समस्या पुढे झुकला नाही. याही समस्येवर त्यांने मार्ग काढला. घराच्या पाठीमागे उपलब्ध जागेत त्याने उत्पादनाला सुरुवात केली. दिवसभर नोकरी करायची आणि उरलेल्या वेळेत हाताने केमिकल मिसळून पावडर स्वतः तयार करू लागला. आपले उत्पादन विकण्यासाठी तो सायकलवरून दारोदार फिरू लागला. आपल्या उत्पादनाचा दर्जा आणि महत्त्व लोकांना पटवून देण्यासाठी "आधी वापरून पहा, मग विश्वास ठेवा." असे तो सांगू लागला.

बघता बघता त्याचे उत्पादन प्रचंड लोकप्रिय झाले. मागणी वाढू लागली आणि पुरवठा करण्यासाठी त्याला एक छोटासा कारखाना, काही कर्मचाऱ्यांसोबत उभा करावा लागला. त्याचे उत्पादन घराघरात जाऊन पोहचले. पाहता पाहता ते उत्पादन लोकांचा "सबकी पसंद" बनले. ते "सबकी पसंद" म्हणजेच "निरमा" आणि तो 'के.के. म्हणजेच करसनभाई खोडीदास पटेल'.

माणसाला त्याचा विचार मोठा करतो. तो जितके अपेक्षा करतो, त्याला तितकंच मिळतं. करसन भाई यांनी तो मोठा विचार केला. म्हणूनच, त्यांना मोठं मिळालं. मोठ्या कष्टाने त्यांनी हा व्यवसाय उभा केला आहे. हे करत असताना त्यांना अनेक अडचणी, समस्या यांनी घेरले, म्हणून ते मागे नाही फिरले.  

घराच्या परसबागेत सुरू झालेला, सायकलवर बसून  माल विकावा लागलेला त्यांचा व्यवसाय, आज हजारो कोटींच्या घरात जाऊन बसला आहे. कधीकाळी लॅब असिस्टंट असणारे करसनभाई आज हजारो कोटींचे धनी आहेत. म्हणूनच ते एक यशवंत आहेत.

*कृपया ब्लॉग फॉलो करा....*

इथेच थांबतो. उद्या पुन्हा भेटू.
तोपर्यंत नमस्कार.

धन्यवाद..



🎯 *भाग - 154* वाचण्यासाठी 👇येथे क्लिक करा.
https://sandeepbalgondapatil.blogspot.com/2020/05/153_21.html

No comments: