Thursday, December 31, 2020

वरिष्ठ मुख्याध्यापिका श्रीम. हसिना शेख मॅडम यांच्या सेवानिवृत्ती निमित्त.

🎯 *यशवंत - एक प्रेरणास्रोत*

🎯 *वरिष्ठ मुख्याध्यापिका श्रीम. हसिना शेख मॅडम यांच्या सेवानिवृत्ती निमित्त.*

🎯 *श्री.संदीप पाटील,दुधगाव. 9096320023.*

कर्तृत्व आणि नेतृत्व हे व्यक्तिमत्वाचे महत्वाचे पैलू. कर्तृत्व असलेली व्यक्तीचं नेतृत्व करू शकते आणि नेतृत्व करणाऱ्या व्यक्तीचं कर्तुत्व त्याच्या नेतृत्वातून प्रतित होतं असते. कर्तृत्व आणि नेतृत्व याचा सुंदर मिलाफ असलेल्या जि. प. शाळा बागणी 2 च्या वरिष्ठ मुख्याध्यापिका श्रीम. हसिना शेख मॅडम आज वयाची 58 वर्षे पूर्ण करत, सेवानिवृत्त होत आहेत. त्यांच्या बद्दल थोडसं..

12 डिसेंबर 1962 रोजी सातारा येथील एका गणिततज्ञ शिक्षकाच्या पोटी हसिना शेख यांचा जन्म झाला. घरातील उत्तम शैक्षणिक वातावरणामुळे त्या शालेय शिक्षणात नेहमी अव्वल राहिल्या. वडिलांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून त्यांनी शिक्षिका होण्याचं ध्येय निश्चित केलं आणि 1981 साली डी. एड. पूर्ण केलं. 

1983 साली त्यांचा विवाह भिलवडी येथील एग्रीकल्चर ऑफिसर असलेल्या श्री. जमिल शेख यांच्याशी झाला. त्यांच्या संसारवेलीला फुले उमलली. त्या संसारात रमल्या. असे असतानाही त्यांनी शिक्षिका होण्याचे स्वप्नं पाहणे थांबविले नाही. लग्नानंतर तब्बल 8 वर्षांनी त्यांचे स्वप्नं पूर्णत्वास आले.

18 मार्च 1989 रोजी वडियेरायबाग ता. खानापूर येथून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. पलूस तालुक्यातील पद्मानगर, पलूस नं.1, बांबवडे नं.1 येथे उपशिक्षिका, तर भिलवडी स्टेशन येथे विषय शिक्षिका म्हणून आपल्या कार्याची छाप सोडली. पंचायत समिती पलूस येथे विषयतज्ञ म्हणून तीन वर्ष आणि गटसमन्वयक म्हणून सहा वर्ष कामकाज पाहिले. सांगली जिल्ह्यात गटसमन्वयक म्हणून काम पाहणाऱ्या, केवळ दोन महिलांतील त्या एक होत्या. महिला असूनही गटसमन्वयक पदाची धुरा यशस्वीरित्या त्यांनी सांभाळली. येथेच त्यांच्या कर्तृत्वाची आणि नेतृत्वाची झलक पाहायला मिळते.

शिक्षक म्हणून काम करत असताना,त्यांनी विविध उपक्रम राबविले आहेत. 25 वर्षे जिल्हा,तालुका आणि केंद्रस्तरावर शिष्यवृत्ती संदर्भात मार्गदर्शन केले. शिष्यवृत्ती मार्गदर्शक म्हणून जिल्हाभर नावलौकिक मिळविला. लोकवर्गणी जमा करणे, शैक्षणिक उठाव करणे यात त्यांचा हातखंडा. उठावाच्या माध्यमातून शाळांना भौतिक सुविधा उपलब्ध करून देऊन, शाळा सुसज्ज केल्या आहेत. आजवर काम केलेल्या प्रत्येक शाळेत स्काऊट गाईड मेळाव्यामध्ये सहभाग घेऊन शाळेला विविध पारितोषिके मिळवून दिली आहेत. शैक्षणिक साहित्य निर्मिती, विज्ञान प्रदर्शन आदी स्पर्धांमध्ये सहभाग घेऊन भरघोस यश मिळविले आहे. विविध प्रशिक्षणामध्ये तज्ञ मार्गदर्शकाची भूमिकाही पार पाडली आहे.

शैक्षणिक कार्याबरोबरच सामाजिक कार्यातही त्या अग्रभागी असतात. दरवर्षी एका विद्यार्थ्यांला दत्तक घेऊन त्याचा संपूर्ण शैक्षणिक खर्च करतात. याचबरोबर वेळोवेळी उद्भवलेल्या नैसर्गिक आपत्तीमध्ये सामाजिक उत्तरदायित्व जाणून, आपत्तीग्रस्तांना अन्नधान्य, कपडे आदी सुविधा उपलब्ध करून देत असतात. शिवाय, विविध सेवाभावी संस्थांकडून अशा लोकांना मदत मिळवून देण्यात त्या अग्रेसर असतात.

तश्या त्या संवेदनशील मनाच्या. यातूनच विविध कवितांचा जन्म झाला. विविध प्रशिक्षणे, शैक्षणिक शिबिरे, स्नेहसंमेलने तसेच साहित्य संमेलनामध्ये सहभाग घेऊन, काव्यवाचन स्पर्धांत त्यांनी यश संपादन केले आहे. राज्यस्तरीय काव्य साहित्य संमेलन पुणे येथे काव्यगायन स्पर्धेतही त्यांनी सहभाग नोंदवला आहे. लिंगसमभाव, उतराई, कुटुंब, श्वास अशा विविध विषयांवरील अनेक कविता त्यांनी लिहिल्या आहेत. त्या उत्तम कवयित्री तर आहेतच शिवाय, त्या एक उत्तम लेखिका देखील आहेत. त्यांच्या इ.चौथी शिष्यवृत्ती परीक्षा मार्गदर्शन, इ. सातवी शिष्यवृत्ती परीक्षा शिक्षक व विद्यार्थी मार्गदर्शिका, सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन नोंदवही, इ. पाचवी शिष्यवृत्ती मार्गदर्शन आदी पुस्तकांचे प्रकाशन झाले आहे.

जिल्हा परिषद शाळा बागणी नं. 2 येथे त्यांनी वरिष्ठ मुख्याध्यापिका म्हणून काम केले आहे. येथे त्यांनी विविध उपक्रम राबविले आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अँबॅकस स्पर्धेत अनेक विद्यार्थिनी यशस्वी झाल्या आहेत. जिल्हास्तरावर विविध पुरस्कारही प्राप्त झाले आहेत. स्काऊट गाईड या उपक्रमांमध्ये सहभाग घेऊन प्रथम क्रमांक ही मिळविला आहे. त्यांच्या कारकिर्दीत शाळेची निवड जिल्हास्तरीय मॉडेल स्कूल साठी झालेली आहे.

त्यांच्या 31 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेत सेवेचा आज समारोप होत आहे. शिक्षक म्हणून केवळ पदावरून सेवानिवृत्त होत आहेत. त्यांच्या अंगी असलेला शिक्षक कधीच निवृत्त होणार नाही. गेल्या तीस वर्षात ज्या तळमळीने,तन्मयतेने आणि आत्मीयतेने त्यांनी शिक्षक म्हणून कामकाज पाहिले आहे. त्याच तळमळीने, तन्मयतेने आणि आत्मीयतेने इथून पुढेही शिक्षण क्षेत्रात कार्यरत राहतील. असा विश्वास वाटतो. त्यांच्या भावी आयुष्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद...




2 comments:

Unknown said...

I am Mukhtar Sayyed, Brother In Law of Smt. Hasina Sayyed. It's my honor to be a part of her family. She is really jack of all trades. She is very respectful and admirable human being with lots of good qualities. It would have been really great pleasure to attend her felicitation program, however, long distance of Saudi Arabia didn't made it possible. I pray to Almighty Allah to give her all happiness, peace, health, tranquility and prosperity in this world and hereinafter

Unknown said...

I am Mukhtar Sayyed, Brother In Law of Smt. Hasina Sayyed. It's my honor to be a part of her family. She is really jack of all trades. She is very respectful and admirable human being with lots of good qualities. It would have been really great pleasure to attend her felicitation program, however, long distance of Saudi Arabia didn't made it possible. I pray to Almighty Allah to give her all happiness, peace, health, tranquility and prosperity in this world and hereinafter