Sunday, January 24, 2021

मित्रवर्य निलेश कांबळे यांच्या कार्यशाळेच्या निमित्ताने

🎯 *यशवंत - एक प्रेरणास्रोत*

🎯 *मित्रवर्य निलेश कांबळे यांच्या कार्यशाळेच्या निमित्ताने...*

🎯 *श्री.संदीप पाटील,दुधगाव. 9096320023.*

निलेश माझा डी.एड.पासूनचा मित्र. आम्ही एकाच बेंचवर बसून शिक्षक होण्याचे धडे गिरविले. त्याचे गाव आष्टा ता. वाळवा. बारावीपर्यंत शिक्षण म. गांधी विद्यालय आष्टा येथे पूर्ण करून, त्याच कॅम्पस मध्ये असलेल्या लठ्ठे अध्यापक विद्यालयात डी.एड. साठी प्रवेश मिळाला. गावातच डी.एड. करण्याची संधी लाभलेला आमच्या बॅचमधील तो एकमेव. 

निलेशच्या घरची आर्थिक परिस्थिती अगदी बेताचीच. अशा परिस्थितीतही आमच्या बॅच मधील एकही मित्र त्याच्या घरातून रिकाम्या पोटी कधीच परतला नाही. काका मावशींचं आम्हाला निलेश इतकंच प्रेम मिळायचं. त्यामुळे बॅचमधील प्रत्येकाला ते घर आपलंसं वाटायचं. 

बॅचमधील प्रत्येक मित्राला हवाहवासा वाटणारा निलेश प्राध्यापकांनाही हवाहवासा वाटायचा. कुठलंही काम असलं तर, प्रत्येक प्राध्यापकांच्या मुखी निलेश चं नाव सदैव असायचं.

तो उत्तम कवी आहे. वेगवेगळ्या विषयावर त्याने कविता लिहिल्या आहेत.मी ही डी. एड. च्या काळात काही कविता लिहिल्या आहेत. माझी लेखणाची आवड ओळखून त्याने वही अन् पेन दिल्याची आठवण ताजी झाली.

त्याच्या नोकरीची सुरुवात 2009 साली देवगड तालुक्यातील पुरळ कोठार येथून झाली. या शाळेतच त्याच्या उपक्रमशील त्याला मोठा वाव मिळाला. त्याच्या भविष्याची पायाभरणी येथेच झाली. शाळेचा पट तसा जेमतेमच. पण, तरीही या शाळेचा लौकिक जिल्हाभर नेण्याचं काम त्यानं केलं आहे. विविध उपक्रमांमध्ये त्याच्या शाळेने कित्येक बक्षीसे पटकावली आहेत. " ज्ञानी मी होणार " सारख्या प्रश्नमंजुषा उपक्रमांमध्ये त्याच्या छोट्याशा शाळेतले विद्यार्थी तालुकास्तरापर्यंत पोहोचले आहेत. ही बाब अतिशय गौरवाची आहे. या काळात त्याने पुढील शिक्षण पूर्ण केले. IGNOU तून B.Ed देखील पूर्ण केले आहे. त्याला तंत्रज्ञानाची विशेष आवड आहे.

2017 साली तो आंतरजिल्हा बदलीने सांगली जिल्ह्यात आला. मिरज तालुक्यातील जि.प.शाळा डिग्रज नं.1 येथे त्याला नेमणूक मिळाली. छोट्या पटाच्या शाळावरून अगदी मोठ्या पटाच्या शाळेवर त्याची नेमणूक झाली. जबाबदारी वाढली. पण, काम करण्याची जबरदस्त इच्छाशक्ती असल्यामुळे या शाळेत अगदी अल्पावधीत त्याने आपल्या कार्याचा ठसा उमटवला. विविध उपक्रमाच्या माध्यमातून आपली उपक्रमशिलता सिद्ध केली. त्याने सादर केलेल्या नवोपक्रमाचा जिल्हा स्तरावर चौथा क्रमांक आला असून, राज्यस्तरीय स्पर्धेसाठी त्यांची निवड झाली आहे. राज्यस्तरावर ही तो यशस्वी होईल. अशी आशा वाटते.

2019 साली आलेल्या महापुरामध्ये डिग्रज नं.1 शाळेचे मोठे नुकसान झाले. संपूर्ण शाळा महापुराच्या विळख्यात सापडली. पोहत जाऊन शाळेतील महत्वाचे दस्तऐवज वाचवले आहे. महापुरामुळे शाळेचे अतोनात नुकसान झाले. ते भरून काढण्यासाठी वेगवेगळ्या माध्यमातून मदतीची उभारणी करण्यात तो आघाडीवर राहिला. शाळेला मोठ्या प्रमाणात लोकसहभाग मिळाला. शाळेचे रुपडे पालटले. वर्षभरात शाळेचे रुपडे पालटले. आज या शाळेची जिल्हास्तर मॉडेल स्कुल साठी निवड झाली आहे. यात निलेशचा वाटा मोलाचा आहे.

आज दुधगाव येथे निलेशची बुद्धिमत्तेची कार्यशाळा संपन्न झाली. यानिमित्ताने त्याच्या ज्ञानाचा फायदा गावातील काही तरुणांना झाला आहे. 

स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सप्ताह निमित्त उपस्थित राहून मार्गदर्शन केल्याबद्दल निलेशचे आभार. येत्या काळात त्यांच्याकडून उत्तमोत्तम कार्य घडो. यासाठी मन:पूर्वक शुभेच्छा !!!





No comments: