Wednesday, January 27, 2021

मित्रवर्य मुरगेश पाटील यांच्या कार्यशाळेच्या निमित्ताने...

🎯 *यशवंत - एक प्रेरणास्रोत*

🎯 *मित्रवर्य मुरगेश पाटील यांच्या कार्यशाळेच्या निमित्ताने...*

🎯 *श्री.संदीप पाटील,दुधगाव. 9096320023.*

मुरगेश माझा डी.एड. चा वर्गमित्र. तो सर्व मित्रांत "एम.पी." या नावाने ओळखला जातो. तो मूळचा कर्नाटक राज्यातला. त्याचे मूळगाव इंगळगाव ता.अथणी. घराची आर्थिक परिस्थिती तशी बिकटच. यामुळेच प्राथमिक शिक्षण वज्रवाड ता. जत येथे मामाच्या गावी झाले. त्याला इंजिनियर व्हायचं होतं. त्यामुळेच दहावी उत्तम गुणांनी उत्तीर्ण होऊन त्याने विज्ञान शाखेत प्रवेश घेऊन सी.इ.टी. चा अभ्यास सुरू केला. दोन्ही परीक्षेत त्याने नेत्रदीपक कामगिरी केली. त्याने केलेल्या प्रयत्नांना यश आलं. आष्टा येथील डांगे कॉलेज येथे मेकॅनिकल ट्रेडला प्रवेश देखील मिळाला. पण, नियतीच्या मनात काही वेगळंच होतं....

2005 ला कृष्णा नदीला आलेल्या पुरात घरचं मोठं आर्थिक नुकसान झालं. या महापुरातच इंजिनियर व्हायचं त्याचं स्वप्नं देखील वाहून गेलं. निराश झालेल्या एम.पी. ला बारावीच्या फिजिक्स च्या प्राध्यापकांनी डी.एड. ला. प्रवेश घेण्याचा आग्रह केला. हा त्याच्या जीवनातला खरा टर्निंग पॉईंट ठरला. इंजिनियर होण्याची संधी चुकलेल्या आष्टा शहरातच, त्याच्या भविष्याची यशाची पायाभरणी झाली. लठ्ठे अध्यापक विद्यालयात त्याला डी.एड. साठी प्रवेश मिळाला.

एम.पी. चं आणि माझं एक अनोखं नातं. आम्ही दोघेही कन्नड भाषा अवगत असणारे. आमची मैत्री अधिक घट्ट होण्याचं आणखी एक कारण म्हणजे 'दहीभात'. माझ्या डब्यातला दहीभात त्याला खूप आवडायचा. त्यावर ताव मारणे. हा त्याचा आवडता छंद. दहीभातासाठी घडलेले किस्से आठविले की, दोघांनाही हसू अनावर होतं. 

2008 साली शिक्षक भरती प्रक्रियेत पहिल्यांदाच सी.इ.टी. चा प्रयोग झाला. इंजिनियर होण्याची संधी चुकलेल्या एम.पी.ने नियोजनपूर्वक अभ्यास केला

आणि या सी.इ.टी.परिक्षेत तो जिल्ह्यात पहिला आला. 12 जानेवारी 2009 रोजी त्याच्या नोकरीचा श्रीगणेशा झाला. वाळवा तालुक्यातील धोतरेवाडी आणि तासगाव तालुक्यातील चव्हाणवस्ती आरवडे या लहानशा शाळांत त्याने आपल्या कामाचा ठसा उमटविला. सुरुवातीच्या काळात दोन विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता यादीत चमकले.

2019 साली महाराष्ट्र राज्य आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळ संलग्नित जिल्हा परिषद शाळा कवठेएकंद या शाळेत काम करण्याची संधी मिळाली. आंतरराष्ट्रीय शाळेत काम करण्याची मिळालेला एम.पी. हा पहिलाच. त्याच्या टिप्समुळे मलाही अंगापूर नं 1 या आंतरराष्ट्रीय शाळेत काम करण्याची संधी मिळाली.

एम.पी. हुशार आणि चौकस. त्याला गणित आणि बुद्धिमत्ता या विषयात विशेष रस. दुधगाव येथे संपन्न झालेल्या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सप्ताहात, त्याने बुद्धिमत्ता या विषयावर सखोल असे मार्गदर्शन केले. विविध स्पर्धा परीक्षांमध्ये येणाऱ्या प्रश्नांची उकल त्याने विद्यार्थ्यां समोर सादर केली. आज एम.पी. ने दिलेल्या योगदानाबद्दल मन:पूर्वक आभार. येत्या काळात त्याच्या हातून उत्तम शैक्षणिक कार्य घडो. यासाठी शुभेच्छा !!!


धन्यवाद...




No comments: