Saturday, March 6, 2021

मित्रवर्य निलेश कांबळे यांच्या नवोपक्रमातील यशाच्या निमित्ताने...

🎯 *यशवंत - एक प्रेरणास्रोत*

🎯 *मित्रवर्य निलेश कांबळे यांच्या नवोपक्रमातील यशाच्या निमित्ताने...*

🎯 *श्री.संदीप पाटील,दुधगाव. 9096320023.*

नुकतंच राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेचा निकाल जाहीर झाला. या स्पर्धेमध्ये मित्रवर्य निलेश कांबळे याने सादर केलेल्या या नवोपक्रमाचा राज्यात उत्तेजनार्थ क्रमांक मिळाला. त्याच्या या यशाबद्दल थोडंसं...

https://sandeepbalgondapatil.blogspot.com/2021/03/blog-post.html

निलेश माझा डी.एड.पासूनचा मित्र. आम्ही एकाच बेंचवर बसून शिक्षक होण्याचे धडे गिरविले. बॅचमधील प्रत्येक मित्राला, प्राध्यापकांना हवंहवंस वाटणारं, कवी मनाचं व्यक्तिमत्त्व म्हणजे निलेश.


बिकट आर्थिक परिस्थितीवर मात करून, 2009 साली देवगड तालुक्यातील पुरळ कोठार येथून त्याच्या नोकरीला सुरुवात झाली. या शाळेतच त्याच्या उपक्रमशीलतेला वाव मिळाला. शाळेचा पट तसा जेमतेमच. पण,तरीही या शाळेचा लौकिक जिल्हाभर नेण्याचं काम त्यानं केलं आहे. विविध उपक्रमांमध्ये त्याच्या शाळेने कित्येक बक्षीसे पटकावली आहेत. " ज्ञानी मी होणार " सारख्या प्रश्नमंजुषा उपक्रमांमध्ये त्याच्या छोट्याशा शाळेतले विद्यार्थी तालुकास्तरापर्यंत पोहोचले आहेत. ही बाब अतिशय गौरवाची आहे.

2017 साली तो आंतरजिल्हा बदलीने सांगली जिल्ह्यात जि.प.शाळा डिग्रज नं.1, ता. मिरज येथे नेमणूक मिळाली. काम करण्याची जबरदस्त इच्छाशक्ती असल्यामुळे या मोठ्या पटाच्या शाळेत अगदी अल्पावधीत त्याने आपल्या कार्याचा ठसा उमटवला. विविध उपक्रमाच्या माध्यमातून आपली उपक्रमशिलता सिद्ध केली. 

2019 साली आलेल्या महापुरात शाळेचे दस्तऐवज वाचविण्यासाठी त्याने केलेली कसरत विसरता येत नाही. महापुरामुळे शाळेचे अतोनात नुकसान झाले. ते भरून काढण्यासाठी वेगवेगळ्या माध्यमातून मदतीची उभारणी करण्यात तो आघाडीवर राहिला. शाळेला मोठ्या प्रमाणात लोकसहभाग मिळाला. शाळेचे रुपडे पालटले. वर्षभरात शाळेचे रुपडे पालटले. आज या शाळेची जिल्हास्तर मॉडेल स्कुल साठी निवड झाली आहे. यात निलेशचा वाटा मोलाचा आहे.

चालू शैक्षणिक वर्षात SCERT पुणे द्वारे दरवर्षी घेण्यात येणाऱ्या नवोपक्रम स्पर्धेत निलेशने भाग घेतला. "घेतला ऑनलाईन शिक्षणाचा वसा, विद्यार्थ्यांनी उमटवला ठसा" हा नाविन्यपूर्ण आणि वैशिष्ट्यपूर्ण नवोपक्रम त्याने सादर केला. लॉकडाऊन काळात मुलांचे शिक्षण बंद राहू नये, मुलांच्या अभ्यासात सातत्य रहावे, मुले शिक्षण प्रवाहात टिकून राहावी. हा या नवोपक्रमाचा उद्देश. या नमोपक्रमांतर्गत त्याने विविध उपक्रमाची निर्मिती केली. ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया, ऑनलाईन शिष्यवृत्ती वर्ग, ऑनलाईन चाचण्या, व्हाट्सअपद्वारे घरचा अभ्यास देणे व तपासणे, दरमहा विद्यार्थी-पालक-शिक्षक यांची ऑनलाईन सहविचार सभा घेणे, वक्तृत्व, निबंध,हस्ताक्षर या सारख्या विविध स्पर्धा ऑनलाईन घेणे, यशस्वी विद्यार्थ्यांना ई-प्रमाणपत्रे देणे, ऑनलाईन आकारिक सराव चाचणी, दिक्षा व युट्यूब चा वापर, ऑनलाईन सहल आयोजन करणे यासारखे अनेक उपक्रम राबवून विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग घेणे. असं या उपक्रमाचं स्वरूप. *थोडक्यात सांगायचं झालं तर, या नवोपक्रमाद्वारे "आभासी शाळा" तयार करून ज्याप्रमाणे नियमित शाळा सुरु असते, त्याचप्रमाणे लॉकडाऊन काळात ऑनलाईन शाळा भरवण्यात आली.*

निलेश ने सादर केलेल्या नवोपक्रमाचा जिल्हा स्तरावर चौथा क्रमांक आला होता. राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेसाठी त्याची निवड झाली होती. काही दिवसांपूर्वी त्याने राज्यस्तरावर या नवोपक्रमाचे सादरीकरण केले. नुकतंच, या स्पर्धेचा निकाल जाहीर झाला. या स्पर्धेमध्ये त्याने सादर केलेल्या या नवोपक्रमाला राज्यात उत्तेजनार्थ क्रमांक मिळाला आहे. ही बाब अतिशय आनंदाची आणि अभिमानाची आहे. 

निलेश ची जडणघडण मी अगदी जवळून पाहिली आहे. एखादं काम मनापासून करणं आणि ते तडीस घेऊन जाणं. हा त्याचा स्थायी स्वभाव. कष्ट, जिद्द आणि उत्तम नियोजन या गुणांच्या जोरावर त्यानं आजवर यश संपादन केलं आहे. नवोपक्रम स्पर्धेतील यश ही त्याचीच  प्रचिती...*

राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेतील घवघवीत यशाबद्दल मनःपूर्वक अभिनंदन !!!

पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा !!!


धन्यवाद...!


No comments: