Wednesday, March 24, 2021

परममित्र श्री.श्रीराम रणसिंग सर

 🎯 *यशवंत - एक प्रेरणास्रोत*

🎯 *परममित्र श्री.श्रीराम रणसिंग सर*

🎯 *श्री.संदीप पाटील,दुधगाव. 9096320023.*


*श्रीराम रणसिंग. एक अजब रसायन. बोलकं, हसरं, मनमिळाऊ, सहृदयी, हळवं, अभ्यासू, नाती जपणारं, सर्वांच्या मदतीला धावून जाणारं व्यक्तिमत्व. एकंदरीत रामासारखंचं व्यक्तित्व.*


*7 मार्च 1985 हा सरांचा जन्मदिवस. नगर जिल्ह्यातील एका सर्वसामान्य शेतकरी कष्टकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला. खडतर परिस्थितीवर मात करून त्यांनी शिक्षण पूर्ण केले. 2006 साली जि.प. शाळा दत्तवाडी ता. वाई, जि. सातारा येथे एका दुर्गम शाळेत त्यांच्या नोकरीला सुरुवात झाली.    दत्तवाडी सारख्या दुर्गम शाळेतील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे मोलाचे काम त्यांनी केले. नंतर त्यांची बदली पाटण तालुक्यातील गारवडे या शाळेत झाली.*


गारवडे शाळेतील त्यांचे कामकाज अतिशय उल्लेखनीय असेच. नेहमी शाळेचा आणि शाळेच्या भवितव्याचा विचार त्यांच्या मनात असायचा. तंत्रस्नेही शिक्षक म्हणून संपूर्ण जिल्हाभर प्रसिध्दी त्यांनी मिळविली. लोकसहभागातून पैसे गोळा करून, गारवडे शाळेत भागातील पहिला सुसज्ज संगणक कक्ष तयार केला. शाळेचे रंगकाम, भौतिक सुविधांची निर्मिती, शालेय गुणवत्ता वाढ यासाठी त्यांची नेहमी आग्रही भूमिका होती. गारवडे शाळेची इमारत पत्र्यांची, जीर्ण अशी. येथे सहा वर्गखोल्यांची सुसज्ज अशी देखणी इमारत उभी करण्याचं त्यांचं स्वप्न होतं. त्यासाठी त्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. दोन वर्ग खोल्यांचे पूर्ण झालेले  बांधकाम ही त्यांच्या स्वप्नपूर्तीच्या प्रवासाची सुरुवात. पुढील चार खोल्यांसाठी त्यांनी पाठपुरावा करणे सोडले नव्हते. यासाठी अधिकारी पदाधिकारी यांच्या भेटी घेण्यात ते सदैव मग्न असायचे. 


*रणसिंग सरांचं अन् माझं एक अनोखं नातं. मी पापर्डे शाळेत हजर झालो तेंव्हा, मारुल हवेली केंद्राच्या शालार्थ प्रणालीचे काम सर पाहत होते. खास पगारासंदर्भात भेटण्यासाठी सर शाळेत आले होते. ही आमची पहिली भेट. यानंतर भेटीगाठी वाढतच गेल्या. कित्येकदा सरांच्या घरी जाणं झालं. विचार जुळले की, मने जुळायला वेळ लागत नाही. आमच्या बाबतीतही असेच घडले. आम्ही एकमेकांचे जिवलग मित्र कधी बनलो ? हे आम्हालाही कळालं नाही.*


*अनेकजण रणसिंग सरांकडे मन मोकळं करायचे. त्यापैकी मी एक. शाळेच्या आणि माझ्या वैयक्तिक प्रश्नांवर चर्चा करायचो. चांगल्या वाईट प्रसंगात सरांचे मार्गदर्शन, सल्ला घ्यायचो. माझ्या आजवरच्या शैक्षणिक वाटचालीत सरांचं खुप मोठं योगदान आहे. माझी अंगापुर येथील आंतरराष्ट्रीय शाळेत निवड झाल्यानंतर, माझे अभिनंदन करताना, गारवडे शाळेला आंतरराष्ट्रीय शाळा करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला होता.*


*माझ्यासारख्या मित्रासाठी दोन वेळा सरांच्या डोळ्यात पाणी आले. हे दोन्ही प्रसंग माझ्यासाठी अविस्मरणीय आहेत.*


पालीचा खंडोबा हे सरांचे कुलदैवत. आम्ही पालीला राहायला आलो. तेंव्हा त्यांना आवर्जून येण्यास सांगितले. परंतु, कोरोनाजन्य परिस्थितीत ते शक्य झाले नाही. 5 मार्च 2021 रोजी सरांनी माझ्या दुधगाव येथील घरी भेट दिली. ही भेट आमची शेवटची भेट ठरली. काल 23 मार्च रोजी एका अपघातात सरांचे निधन झाले. "जो आवडे सर्वांना तो आवडे देवाला" असेच काहीसे घडले. एक सच्चा मित्र काळाच्या पडद्याआड गेला. यामुळे शिक्षण क्षेत्राची, समाजाची खुप मोठी हानी झाली आहे.


*"यशवंत- एक प्रेरणास्रोत" मध्ये सरांच्या शैक्षणिक कार्यावर एकवेळ लेख लिहीण्याचा माझा मानस होता. पण, भावपूर्ण निरोप देण्याची पोस्ट लिहिण्याची वाईट वेळ माझ्यावर येईल.असे कधी वाटले नाही. यासारखा दुर्दैवी क्षण नाही.... सर, पुन्हा जन्म घ्यावा...*


*श्री.श्रीराम रणसिंग सर हे डी.सी.पी.एस./ एन. पी. एस. धारक शिक्षक. त्यांच्या पश्चात कुटुंबाला कोणताही आर्थिक लाभ मिळणार नाही. हे दुर्दैव. त्यांच्या निधनाने त्यांच्या कुटुंबाची मोठी वाताहात झाली आहे. सरांचे शिक्षण क्षेत्रातील योगदान अमूल्य आहे. त्यांच्या कुटुंबाला पेन्शन लाभ शासनाने द्यावा.ही त्यांच्यासाठी खरी श्रद्धांजली ठरेल... !*


*सर .... पुन्हा जन्म घ्यावा...*



No comments: