Sunday, April 25, 2021

यशवंत - एक प्रेरणास्रोत भाग - 178

 🎯 *यशवंत - एक प्रेरणास्रोत*

🎯 *भाग - 178*

🎯 *श्री.संदीप पाटील,दुधगाव. 9096320023.*


https://sandeepbalgondapatil.blogspot.com/2021/04/178.html


1971 साली भारतीय संघ वेस्ट इंडिज च्या दौऱ्यावर गेला होता. विमानतळावर असलेल्या कस्टम अधिकाऱ्याने भारतीय संघातील एका खेळाडूच्या उंचीकडे पाहून टोमणे मारले. दौरा आटोपून संघ जेंव्हा पुन्हा विमानतळावर परतला. तेंव्हा तो अधिकारी त्या खेळाडू पुढे नतमस्तक झाला. त्या प्रतिभाशाली खेळाडूची ही प्रेरणादायी कथा... 

10 जुलै 1949 रोजी मुंबईतील एका सामान्य कुटुंबात त्याचा जन्म झाला. त्याचे वडील आणि काका हे चांगले क्रिकेटपटू होते. त्याच्या एका मामांनी तर, भारतातर्फे कसोटी सामन्यात भाग घेतला होता. शिवाय, त्याचे दोन्ही आजोबा आणि आई ह्यांना क्रिकेटविषयी विशेष प्रेम होते. अशा क्रिकेटमय वातावरणात वाढल्यामुळे त्याला लहानपणापासूनच क्रिकेटची उत्कट आवड निर्माण झाली. घरातील सर्व मंडळींनी त्याला क्रिकेट खेळण्यास मनापासून प्रोत्साहन दिले. 

अगदी बालवयातच त्याने एक उत्तम क्रिकेटपटू होण्याचं स्वप्नं त्यानं पाहिलं. त्यानं आपल्या स्वप्नांचा पाठलाग केला. कठोर परिश्रम घेतले. शालेय स्तरावरील अनेक स्पर्धेत त्याने उत्तम कामगिरी केली. याच कामगिरीच्या बळावर सुरुवातीला मुंबई संघाचे आणि नंतर भारतीय मुख्य संघाचे दरवाजे खुले झाले. 

1971 साली त्याची निवड वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी झाली. विमानतळावर कस्टम अधिकाऱ्याने त्याच्याकडे पाहून टोमणे मारले. हा त्याचा पहिलाच दौरा होता. त्यात अशा प्रकारच्या स्वागताने तो पेटून उठला. या अपमानाचा बदला आपल्या बॅटनेच घ्यायचा. त्याने निश्चय केला. 

पहिल्या कसोटी सामन्यात त्याची निवड झाली नाही. पण, दुसऱ्या सामन्यात त्याला संधी मिळाली. त्याने स्वतः ला सिद्ध केलं. या सामन्यात दोन्ही डावात त्याने अर्धशतकी खेळी केली. त्याने आपल्या पहिल्या कसोटी मालिकेतील चार सामन्यांमध्ये 774 धावा केल्या. जो अद्याप एका कसोटी मालिकेत एका भारतीय फलंदाजाने केलेल्या सर्वाधिक वैयक्तिक धावांचा रेकॉर्ड आहे. या मालिकेनंतर त्याने मागे वळून पाहिलेच नाही. अनेक नवे विक्रम त्याने प्रस्थापित केले. लोकं त्याला 'विक्रमादित्य' म्हणून संबोधू लागले. बॅट ने धावांचा पाऊस पाडला. कसोटी सामन्यात 10 हजार धावांचा डोंगर उभा करणारा, तो जगातला पहिलाच खेळाडू बनला. तो विक्रमादित्य सनी म्हणजेच सुनील गावसकर होय. 

सुनिल गावसकर यांनी आपल्या धमाकेदार कामगिरीच्या जोरावर क्रिकेट विश्वात ज्यांची ओखळ 'द डॉन' अशी केली जाते, असे सर डॉन ब्रॅडमन यांचा सर्वाधिक शतकांचा विक्रम मोडला. 

अंगी असलेलं कौशल्य, आत्मसात केलेलं तंत्र, आणि ध्येयावरील एकाग्रता या गुणांच्या जोरावर व्यक्ती आपलं कोणतंही इस्पित सध्या करू शकतो. तुमचं शारीरिक व्यंग तुमच्या यशाच्या आडवं येऊ शकतं नाही. हेच सुनील गावस्कर यांच्या जीवन प्रवासातून लक्षात येते. 

गार्नर, होल्डिंग, रॉबर्ट्स, मार्शल, लिली सारख्या भयावह बोलर्सच्या नजरेला नजर भिडवून बचावाची अभेद्य तटबंदी उभी करणाऱ्या सुनील गावस्करांची आजवरची कामगिरी लक्षात घेऊन भारत सरकारने त्यांना 'पद्मश्री आणि पद्मभूषण' या पुरस्कारांनी सन्मानित केले आहे. म्हणूनच, तो एक यशवंत आहे.


*कृपया ब्लॉग फॉलो करा....*


इथेच थांबतो. उद्या पुन्हा भेटू.

तोपर्यंत नमस्कार.


धन्यवाद...






No comments: