Tuesday, April 27, 2021

यशवंत - एक प्रेरणास्रोत भाग - 179

🎯 *यशवंत - एक प्रेरणास्रोत*

🎯 *भाग - 179*

🎯 *श्री.संदीप पाटील,दुधगाव. 9096320023.*


https://sandeepbalgondapatil.blogspot.com/2021/04/179.html


एका भारतीय फलंदाजाला एका ऑस्ट्रेलियन गोलंदाजाने कसोटी मालिकेत सलग चार वेळा बाद केले. यामुळे त्या भारतीय फलंदाजाला मोठी कामगिरी करता आली नाही. आपलं काहीतरी चुकतंय. याची त्याला जाणीव झाली. त्याने आपली चूक शोधली आणि उर्वरित दोन कसोटी सामन्यांमध्ये दोन शतक झळकावून त्या गोलंदाजाला प्रत्युत्तर दिले. त्या प्रतिभाशाली खेळाडूची ही प्रेरणादायी कथा...


12 एप्रिल 1917 साली जामनगर गुजरात येथे एका सामान्य कुटुंबात त्याचा जन्म झाला. लहानपणापासूनच त्याने क्रिकेट खेळायला सुरुवात केली. प्रथम श्रेणी क्रिकेट स्पर्धेत 11 हजाराहून अधिक धावा आणि 782 विकेट घेऊन स्वतःला सिद्ध केले होते. 1946 साली त्याच्या याच कामगिरीच्या बळावर त्याची निवड भारतीय संघात करण्यात आली. मिळालेल्या संधीचं सोनं केलं. इंग्लंड विरुद्ध कसोटी दौऱ्यात 1120 धावा आणि 129 विकेट घेऊन निवड सार्थ ठरविली. 


1948 साली तो ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेला. या दौऱ्यात रे लिंडवॉल या भेदक गोलंदाजांचा सामना करणे त्याला जमत नव्हते. दोन कसोटी सामन्यांतील चारही डावात रे लिंडवॉल ने त्याला बाद केले. तो विचारात पडला. आपण कोठे चुकतोय ? याचा तो शोध घेऊ लागला. 


तिसऱ्या कसोटीपूर्वी एका पार्टीत रे लिंडवॉल सोबत त्याची भेट झाली. दोघांच्यात बोलणे सुरू झाले. बोलता बोलता त्याने रे लिंडवॉल प्रश्न केला की, " प्रत्येकवेळी मला तूच कसं काय बाद करतोयस ?" यावर हसत हसत रे लिंडवॉल म्हणाला,"तुझा बॅट फ्लो स्लो आहे. तुझ्या बॅट ला माझ्या यॉर्कर खाली यायला लेट होतो." आपण कुठं चुकतंय ? आणि आपल्याला कुठं सुधारणा करायला हवी ? याचं बरोबर उत्तर त्याला गवसलं. तिसऱ्या आणि चौथ्या कसोटीत शतक झळकावून त्याने चुका सुधारल्या.


तो ऑलराऊंडर खेळाडू.फलंदाजी सोबत तो उत्तम गोलंदाजी करायचा. एकदा एका सामन्यात त्याने ऑस्ट्रेलियन फलंदाज ब्राउनला धावचीत केले. हे फक्त धावचीत नव्हते केले तर, आगळ्या वेगळ्या प्रकारे धावचीत केले होते. जेव्हा तो गोलंदाजी करत होता. तेव्हा 'नॉन स्ट्राइकिंग एंड' वर ब्राउन धाव घेण्यासाठी पुढे जाण्याचा प्रयत्न करत होतो. त्याने ब्राउनला चेतावणी दिली. पण, तरी सुद्धा ब्राउन पुढे जातच होता. त्यामुळे, त्याने चेंडू न टाकता त्याला धावचीत केले. अशाप्रकारे 'नॉन स्ट्राइकिंग एंड' चेंडू न टाकता धावचीत करण्याच्या प्रकाराला त्याचे नाव दिले गेले "मांकडींग". या "मांकडींग"चा जनक असलेला तो भारतीय क्रिकेटपटू म्हणजेच मुलवंतराय हिम्मतलाल मांकड उर्फ विनू मांकड होय.


भारताला 1932 साली कसोटी क्रिकेटसाठीची मान्यता मिळाली. परंतु संघाला पहिल्या कसोटी विजयासाठी दोन दशकं वाट पाहावी लागली होती. विजय हजारे यांच्या नेतृत्त्वाखालील भारतीय संघाने 1952 साली इंग्लंडवर 1 डाव आणि 8 धावांनी ऐतिहासिक विजय मिळवला. विनू मांकड यांनी या कसोटीत 12 विकेट्स घेतल्या होत्या. त्यामुळे मांकड यांना पहिल्या कसोटी विजयाचे शिल्पकार म्हंटले जाते. 


यशाच्या मार्गावर मार्गक्रमण करत असताना, अनेक यॉर्कर्स चा सामना करावा लागतो. या यॉर्कर्सना योग्य प्रकारे सीमापार करणे जमले पाहिजे. अन्यथा हेच यॉर्कर यशाच्या मार्गातून बाजूला पडतील. आपल्याकडून काही चुका वारंवार होत असतील तर, त्या चुका सुधारण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला पाहिजे. 


1947 साली विस्डेन द्वारा ‘क्रिकेटर ऑफ द ईयर’ म्हणून त्यांची निवड करण्यात आली होती. म्हणूनच ते एक यशवंत आहेत. 


*कृपया ब्लॉग फॉलो करा....*


इथेच थांबतो. उद्या पुन्हा भेटू.

तोपर्यंत नमस्कार.

*धन्यवाद...*




No comments: