Sunday, April 25, 2021

यशवंत - एक प्रेरणास्रोत भाग - 177

🎯  यशवंत - एक प्रेरणास्रोत

🎯  भाग - 177

🎯  श्री.संदीप पाटील,दुधगाव. 9096320023.


https://sandeepbalgondapatil.blogspot.com/2021/04/177.html


संकटकाळी संघाच्या मदतीला धावून येणारा खेळाडू संकटमोचक ठरतो. हाच संकटमोचक पुन्हा-पुन्हा संघाच्या मदतीला धावतो. तेंव्हाच,तो "भरवशाचा खेळाडू" म्हणून गणला जातो. भारतीय क्रिकेट संघाच्या मदतीला वारंवार धावून येणाऱ्या, संकट काळात खेळपट्टीवर तग धरून राहणाऱ्या एका "भरवशाच्या खेळाडूची" ही प्रेरणादायी कथा...


11 जानेवारी 1973 रोजी इंदौर शहरात एका मध्यमवर्गीय मराठी कुटुंबात त्याचा जन्म झाला. काही वर्षातच त्याच्या कुटुंबाचे स्थलांतर बेंगलोर येथे झाले. त्याचे वडील जॅम बनविणाऱ्या एका कंपनीत काम करायचे. म्हणून, त्याला सर्वजण प्रेमाने 'जॅमी' म्हणून हाक मारू लागले. 


वयाच्या बाराव्या वर्षीच जॅमीला आपल्यातील 'बेस्ट' चा शोध लागला. क्रिकेट त्याचा आवडता खेळ होता आणि त्यातच त्याला आपले भविष्य घडवायचे होते. त्याने आपले सर्वस्व पणाला लावले. जीव तोडून मेहनत केली. त्याच्या मेहनतीला यश येऊ लागले. 15, 17 व 19 वर्षाखालील कर्नाटक संघात त्याने स्थान मिळविले. प्रथम श्रेणी क्रिकेट मधील त्याच्या कामगिरीच्या बळावर त्याला भारतीय संघातही स्थान मिळाले. 


1996 साली श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यात भारतीय संघाकडून खेळण्याची संधी जॅमीला मिळाली. परंतु, या संधीचं त्याला सोनं करता आलं नाही. सुरुवातीच्या चार सामन्यात त्याला चमकदार कामगिरी करण्यात तो अपयशी ठरला. जॅमीला संघातील आपले स्थान गमवावे लागले. 


त्याची प्रथम श्रेणी क्रिकेट मधील कामगिरी अतिशय प्रभावी होती. यामुळेच, एकदिवसीय संघातून वगळण्यात आलेल्या जॅमीची, इंग्लंडविरु्धच्या कसोटी संघात निवड झाली. पण, पहिल्या सामन्यात त्याला अंतिम 11 खेळाडूंत स्थान पटकाविता आले नाही. त्याची घोर निराशा झाली. दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी संजय मांजरेकर सारखा दिग्गज खेळाडू दुखापतग्रस्त झाला. जॅमीला संधी मिळाली. तो या सामन्यात 6 तासाहून अधिक काळ खेळपट्टीवर तग धरून राहिला. त्याने 95 धावांचा दर्जेदार खेळ करून संघाला पराभवापासून दूर ठेवले. त्याच्या खेळीने सामना अनिर्णीत राहिला. पुढील सामन्यात संजय मांजरेकरचे पुनरागमन झाले तरीही, जॅमीचे कसोटी संघातील स्थान अबाधित राहिले. आपल्या कर्तृत्वाच्या बळावर त्याने पुन्हा भारतीय एकदिवसीय संघात स्थान मिळविले. 


आपल्या कामगिरीने त्याने अनेक विक्रम प्रस्थापित केले. कसोटी व एकदिवसीय या दोन्ही प्रकारांत प्रत्येकी 10000 धावा करणारा सचिन तेंडूलकर नंतर तो भारताचा केवळ दुसरा क्रिकेटपटू बनला. संघ संकटात सापडल्यानंतर स्वत: जबाबदारी घेणारा, तो भरावशाचा खेळाडू जॅमी म्हणजेच 'राहुल द्रविड' होय.


आपल्या पहिल्या-वहिल्या कसोटी सामन्यात सहा तास खेळपट्टीवर टिकून राहणारा द्रविड, संपूर्ण कारकीर्दीत 746 तास खेळपट्टीवर टिकून राहिला. सर्वाधिक चेंडूंचा सामना करणारा खेळाडू बनला. यामुळेच, तो दोन्ही खेळ प्रकारात 10000 धावा करू शकला.


खरंतर संकटं माणसाचा कस पाहत असतात. कधी ती घाबरवतात, शरण येण्यास, पळून जाण्यास भाग पडतात. पण, संकटांचा मुकाबला करणारा, तग धरून राहणाराच यशस्वी होतो. संघ संकटात असताना द्रविड खेळपट्टीवर टिकून राहायचा. म्हणूनच, त्याला 'द वॉल, मि. डिपेंडेबल' म्हणून ओळखले जाते. आपल्या जीवनातील कठीण प्रसंगात तग धरून राहायला हवे. हा संदेश द्रविड च्या जीवनातून मिळतो.


राहुल द्रविड ची आजवरची कामगिरी लक्षात घेऊन भारत सरकारने त्याला अर्जुन, पद्मश्री, पद्मभूषण या पुरस्कारांनी सन्मानित केले आहे. म्हणूनच, तो एक यशवंत आहे.


*कृपया ब्लॉग फॉलो करा....*


इथेच थांबतो. उद्या पुन्हा भेटू.

तोपर्यंत नमस्कार.


धन्यवाद..



No comments: