Saturday, February 18, 2023

कथा क्र. 13 शिवप्रेमी कर्मवीर

🎯 यशवंत - एक प्रेरणास्रोत

🎯 असे हे कर्मवीर - कथा क्र. 13 शिवप्रेमी कर्मवीर

🎯 श्री. संदिप पाटील, दुधगांव. 9096320023.



आज महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती. सर्वप्रथम शिवरायांना मानाचा मुजरा. गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेली "असे हे कर्मवीर" या कथामालेतील आजची तेरावी कथा. शिवजयंतीच्या निमित्ताने कर्मवीरांच्या शिवप्रेमाची, शिवभक्तीची ही कथा अर्थात शिवप्रेमी कर्मवीर.  





🎯 असे हे कर्मवीर - कथा क्र. 13 शिवप्रेमी कर्मवीर


"सातारा येथे छत्रपतींच्या राजधानीमध्ये महाविद्यालय काढावयाचे." असा निश्चय कर्मवीरांनी केला. हे महाविद्यालयदेखील मोफत व वसतिगृहयुक्त (फ्री अँड रेसिडेन्शियल) असे असावे. असेही त्यांना वाटे. त्याकाळी साताऱ्यासारख्या इतिहास प्रसिद्ध नगरीत एकही महाविद्यालय नव्हते.

महाविद्यालय काढायचे जाहीर करून कर्मवीरांनी सर्वांना मोठा धक्का दिला. त्यांच्या या निर्णयाला संमिश्र प्रतिसाद मिळाला. काहींनी पाठिंबा दिला. पण, कॉलेज काढायच्या कल्पनेला अनेकांनी विरोधही केला. 


संस्थेचे हितचिंतक, विश्वस्त व प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ डॉ. धनंजयराव गाडगीळ कर्मवीरांना म्हणाले, “महाविद्यालयाच्या नादी तुम्ही लागू नका. महाविद्यालय म्हणजे पांढरा हत्ती आहे. तो सांभाळणे तुमच्या आवाक्याबाहेर जाईल.”


'ऐकावे जनाचे व करावे मनाचे' असा कर्मवीरांचा स्वभाव. त्यांच्या विचाराला निश्चित अशी एक बैठक होती. चिंतन होते व द्रष्टेपणा होता. सर्वांचा विरोध असतानाही सातारा शहरामध्ये महाविद्यालय सुरू करायचे व या महाविद्यालयाला "छत्रपती शिवाजी महाराज" यांचे नाव द्यायचे. अशी घोषणा त्यांनी केली.


मालोजीराव नाईक निंबाळकर यांनी इमारती व मोकळ्या जागा संस्थेला उदार अंतःकरणाने बहाल केल्या. याच जागेत "छत्रपती शिवाजी कॉलेज" सुरू करायचे होते.


जागेचा प्रश्न मिटला. आता पैशाचे काय ? डिपॉझिट भरण्याकरिता 25000 रुपये लागणार होते. मूळचे सातारचे पण, मुंबईत वास्तव्यास असलेले धोंडजी पाटील यांनी ही अडचण पूर्ण केली. 


अशातच छत्रपती शिवाजी कॉलेजकरिता पैशाची अडचण आलेली आहे, असे एका धनिकाला समजले. त्या धनिकाने कर्मवीरांना पत्राने कळवले. 


“आपल्या नवीन कॉलेजकरिता पैशाची अडचण आहे असे समजते. आपणांस लागेल तेवढा पैसा आम्ही द्यायला तयार आहोत. परंतु, एका अटीवर. आम्ही सुचवू ते नाव कॉलेजला देणार असाल तर...”


"एक वेळ मी माझ्या बापाचे नाव बदलेन. पण, छत्रपती शिवाजी कॉलेजला दिलेले नाव मी बदलणार नाही. तत्त्व विकून पैसा घेतला, तर हा भाऊ पाटील मेला !" कर्मवीरांनी ताबडतोब उत्तर पाठवले. 


या प्रसंगातून कर्मवीरांच्या तत्वनिष्ठ अन् बाणेदार वृत्तीचे दर्शन होते. शिवाय छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी असणारा आदरही प्रतीत होतो. खऱ्या अर्थानं कर्मवीर एक सच्चे शिवप्रेमी होते. 

No comments: