🎯 यशवंत - एक प्रेरणास्रोत
🎯 असे हे कर्मवीर - कथा क्रमांक 12 तत्वनिष्ठ कर्मवीर
🎯 श्री. संदिप पाटील, दुधगांव. 9096320023.
दुधगांव ता. मिरज येथे कर्मवीर आण्णांच्या पुतळ्याचे सुशोभीकरण सुरू आहे. यानिमित्ताने संपूर्ण गाव एकवटला आहे. देणगी गोळा केली जात आहे. विविध बैठकांच्या माध्यामातून कर्मवीर अण्णांच्या आठवणींना उजाळा मिळतो आहे. यानिमित्ताने दर रविवारी आण्णांच्या जीवनातील कथा, प्रसंग, घटना "असा हा कर्मवीर" या सदराखाली "यशवंत - एक प्रेरणास्रोत" या माझ्या ब्लॉग वर प्रसारित करत आहे.
रयत शिक्षण संस्था ही लोकसहभागातून उभी राहिलेली शिक्षण संस्था होय. संस्था चालवताना कर्मवीरांना अनंत अडचणी आल्या. परंतु, वाईट मार्गाने पैसा उभा करून संस्था चालवणे, त्यांना कधी जमले नाही. वेळप्रसंगी त्यांनी पत्नीचे दागिने गहाण ठेवले. परंतु, वाईट मार्गाचा अवलंब केला नाही. त्यांनी काही तत्व आयुष्यभर जपली. त्याचीच एक कथा...
एकदा एक अमेरिकन शिक्षणतज्ज्ञ सी.सी. कोप हे कॅलिफोर्नियाहून भारतातल्या वेगवेगळ्या शिक्षणसंस्था पाहण्यासाठी आले होते. त्यांचा कार्यक्रम भारत सरकारतर्फे आखण्यात आला होता. त्यांनी रयत शिक्षण संस्थेस 6 फेब्रुवारी 1952 रोजी भेट दिली.
कोप यांना सातारा शहरातल्या संस्थेच्या सर्व शाखा फिरवून दाखवण्यात आल्या. संस्था परिसर फिरून पाहिल्यानंतर त्यांनी कर्मवीरांच्या कार्याचे कौतुक करत म्हणाले की, “भाऊराव, तुम्हांला मी अमेरिकेकडून मदत मिळवून देऊ का?"
यावर कर्मवीर म्हणाले, “आम्हांला अमेरिकेची मदत नको. चला आमचे डॉलर्स मी तुम्हांला दाखवतो.'
कर्मवीर कोप यांना घेऊन बाहेर मैदानात आले. तिथे विद्यार्थ्यांनी फोडलेल्या खडीचे ढीग पडले होते. त्यांच्याकडे बोट दाखवत कर्मवीर म्हणाले, "हे पाहा आमचे डॉलर्स. आम्ही कष्ट करून पैसा उभा करतो आणि जनताही आम्हांला गरजेपुरता पैसा देते." हे ऐकून कोप यांना अचंबा वाटला आणि भाऊरावांविषयीचा त्यांचा आदर दुणावला.
कोप यांनी देऊ केलेली मदत नाकारणारे पहिले भारतीय कर्मवीर हेच. भारतातल्या अनेक नामांकित संस्था त्या काळी परदेशी फंडिंगवर अवलंबून होत्या,आजही असतातच. त्यामुळे असे फंडिंग मिळणे सहजशक्य असूनही ते नाकारण्यात कर्मवीरांचे वेगळेपण दिसते. देणग्या मिळवतानाही कर्मवीरांनी कधीही आपल्या तत्त्वांशी तडजोड केली नाही. हेच या प्रसंगावरून लक्षात येते.


No comments:
Post a Comment