Saturday, February 4, 2023

असे हे कर्मवीर - कथा क्र.11 कर्तबगार कर्मवीर

🎯 यशवंत - एक प्रेरणास्रोत

🎯 असे हे कर्मवीर - कथा क्रमांक 11 कर्तबगार कर्मवीर

🎯 श्री. संदिप पाटील, दुधगांव. 9096320023.



एकदा घरी आलेल्या पाहुण्याने "आपले चिरंजीव काय काम करतात ?" असा यक्ष पायगौंडा यांना विचारला. मुळातच कर्मवीर काहीच काम करत नसल्याने, त्यांच्याविषयी वडिलांच्या मनात राग होताच. तो पाहुण्याच्या प्रश्नाने उफाळला. "काही काम करत नाही. तो एकच काम करतो, दोनवेळ जेवणाचं व गावभर फिरण्याचं." असं पायगौंडांनी सांगून टाकलं. वडिलांच्या या उत्तराने कर्मवीरांचा स्वाभिमान दुखावला गेला आणि त्यांनी घर सोडले. आपला मुलगा काहीच करू शकणार नाही. असं ठाम मत वडील पायगौंडा यांचे झाले होते.


वर्षामागून वर्षे गेली. कर्मवीरांनी रयत शिक्षण संस्थेचे रोपट लावलं. या रोपट्याने आकार घ्यायला सुरुवात केली. संस्थेचा लौकिक सर्वदूर पसरला. अनेक मान्यवर संस्थेला भेट देण्यासाठी येऊ लागले. कर्मवीरांचे वडील पायगौंडा पाटील यांना आपल्या मुलाने केलेल्या कामाचा फारसा परिचय झालेला नव्हता. प्रापंचिक जबाबदाऱ्यांपलीकडे त्यांनी फारसा कधी विचारही केला नव्हता. त्यामुळे स्वतःच्या कुटुंबाकडे दुर्लक्ष करून मुलगा लष्कराच्या भाकऱ्या भाजण्यात आपला वेळ व्यर्थ दवडत आहे. असे त्यांना वाटायचे आणि त्याबद्दल ते नेहमी काहीसे नाराजच असत. 


26 ऑक्टोबर 1938 रोजी मुंबई प्रांताचे गव्हर्नर सर रॉजर लॅमले यांनी रयत शिक्षण संस्थेला भेट दिली. 


गव्हर्नर आपल्या मुलाच्या संस्थेला भेट देणार आहेत. हे वृत्त पायगौंडा यांच्या कानांवर गेले. पण, तरीही त्या कार्यक्रमाला हजर राहायची त्यांची तयारी नव्हती. शेवटी गंगाबाईंनी त्यांचे मन वळवले. दोघेही भेटीच्या वेळी साताऱ्याला गेले. 


गव्हर्नरनी संस्थेच्या कार्याबद्दल गौरवोद्वार काढले. ते पायगौंडांनी ऐकले. नंतर गव्हर्नरनी पायगौंडा पाटील यांच्याशी हस्तांदोलनही केले. त्यावेळी ते म्हणाले, “तुमचा मुलगा जे काम करतो आहे, ते तसे सरकारचेच काम आहे. त्यामुळे त्याच्या कामाची सरकारला मदतच होत आहे. शिवाय त्याच वेळी तो जनतेचीही सेवा करत आहे. असा मुलगा मिळाला म्हणजे तुम्ही खूप नशीबवान आहात.' "


पायगौंडांनी आयुष्यभर इंग्रज सरकारची चाकरी केली आणि आता त्याच इंग्रज सरकारच्या प्रांतातल्या सर्वोच्च प्रतिनिधीकडून आपल्या मुलाचे हे कौतुक ऐकताना त्यांना अगदी धन्य धन्य वाटले. मुलाच्या कार्याकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टीकोन या दिवसानंतर खूप बदलला.

धन्यवाद...!





No comments: