Saturday, January 28, 2023

असे हे कर्मवीर - कथा क्र. 10 कृतज्ञतेचे प्रतिक कर्मवीर

🎯 यशवंत - एक प्रेरणास्रोत
🎯 असे हे कर्मवीर - कथा क्रमांक 10 कृतज्ञतेचे प्रतिक कर्मवीर
🎯 श्री. संदिप पाटील, दुधगांव. 9096320023.







दुधगांव ता. मिरज येथे कर्मवीर आण्णांच्या पुतळ्याचे सुशोभीकरण सुरू आहे. यानिमित्ताने संपूर्ण गाव एकवटला आहे. देणगी गोळा केली जात आहे. विविध बैठकांच्या माध्यामातून कर्मवीर अण्णांच्या आठवणींना उजाळा मिळतो आहे. यानिमित्ताने दर रविवारी आण्णांच्या जीवनातील कथा, प्रसंग, घटना "असा हा कर्मवीर" या सदराखाली "यशवंत - एक प्रेरणास्रोत" या माझ्या ब्लॉग वर प्रसारित करत आहे. 

रयत शिक्षण संस्थेची औपचारिक स्थापना 4 ऑक्टोबर 1919 रोजी झाली असली; तरी संस्थेची अधिकृत नोंदणी 25 एप्रिल 1935 रोजी झाली. 

कर्मवीरांना शिक्षकांसाठी ट्रेनिंग कॉलेज सुरू करायचे होते. अधिकृत नोंदणीनंतर द सिल्व्हर ज्युबिली रूरल ट्रेनिंग कॉलेजची स्थापना करण्यात आली. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर या ट्रेनिंग कॉलेजचे जुने नाव बदलून महात्मा जोतिबा फुले यांचे नाव दिले गेले. रयतने स्थापन केलेली ही पहिली शैक्षणिक संस्था. 

ट्रेनिंग कॉलेजचे पहिले प्राचार्य म्हणून के.एस. दीक्षित यांनी सगळी सूत्रे हाती घेतली. ते पूर्वी सातारा जिल्ह्यात वरिष्ठ शिक्षणाधिकारी होते. कर्मवीरांचा त्याग, कामसू वृत्ती आणि गोरगरिबांच्या शिक्षणाविषयीची प्रामाणिक तळमळ पाहून त्यांना मदत म्हणून प्राचार्य पदाची सूत्रे ताब्यात घेतली. सरकारी नोकरीतल्या त्यांच्या पूर्वानुभवाचा संस्थेला मोठा फायदा झाला. 

रयत शिक्षण संस्थेचे प्राचार्य म्हणून मिळणारा त्यांचा अधिकृत पगार महिना रुपये २५० ठरला होता. पण, त्यांचा सगळा पगार ते त्याच दिवशी संस्थेला देणगी म्हणून देत असत. इतकेच नव्हे तर पगारपत्रकावर जो रेव्हेन्यू स्टॅम्प लावावा लागतो, त्याचे पैसेही ते स्वतःच्या खिशातून देत असत. इतक्या सेवाभावीवृत्तीने दीक्षितांनी संस्थेसाठी काम करत होते. 

उतारवयामुळे दीक्षितांचे निधन झाले. ते गेल्याचे कळताच कर्मवीर श्रीमती दीक्षित यांना भेटायला गेले आणि म्हणाले, "बाईसाहेब, दीक्षित हे माझ्या भावासारखे होते. सुरुवातीपासून त्यांनी ज्याप्रकारे संस्थेची विनामोबदला सेवा केली, त्याची मला जाणीव आहे. आमच्या कृतज्ञतेचे प्रतिक म्हणून संस्थेतर्फे दरमहा तुम्हांला मदत पाठवली जाईल. काळजी करू नका." पुढे श्रीमती दीक्षित हयात असेपर्यंत त्यांना संस्थेतर्फे मनीऑर्डरने दरमहा दहा रुपये पाठवले जात.

रयत शिक्षण संस्थेसाठी अनेकांनी आपले आयुष्यात खर्च केले आहे. पण, कर्मवीरांनी त्या प्रत्येकाची काळजी केली. एखाद्याने केलेले उपकार कर्मवीर कधीच विसरत नव्हते. त्याची परतफेड करण्याचा प्रयत्न ते नेहमी करायचे. या प्रसंगातून अण्णांच्या ठायी असलेली कृतज्ञतावृत्ती दिसून येते. 

दुधगांव ता. मिरज येथे कर्मवीर आण्णांच्या पुतळ्याचे सुशोभीकरण सुरू आहे. यासाठी पंधरा लाखांचा खर्च अपेक्षित आहे. दुधगावकरांनी हाती घेतलेल्या या सामाजिक कार्यात सर्वांनी सहभागी होऊन सढळ हाताने देणगी द्यावी. असे आवाहन "कर्मवीर पुतळा सुशोभीकरण समिती" च्या वतीने करण्यात येत आहे. 

* संपर्क *
श्री. दिपक अथने - 8857 03 61 08
श्री. कैलास आवटी - 9595 23 76 76
श्री. तेजकुमार कोले - 9403 23 04 41

धन्यवाद...!




No comments: