Friday, January 27, 2023

जल्लोष शिक्षणाचा आणि परिचय चार नव्या मित्रांचा

🎯 यशवंत - एक प्रेरणास्रोत

🎯 जल्लोष शिक्षणाचा आणि परिचय चार नव्या मित्रांचा 

🎯 श्री. संदिप पाटील, दुधगांव. 9096320023












दिनांक 24 व 25 जानेवारी 2023 रोजी ऑटो क्लस्टर येथे पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयोजित "जल्लोष शिक्षणाचा" हा विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणारा उपक्रम संपन्न झाला. या उपक्रमात जिल्हा परिषद सांगलीचा "माझी शाळा आदर्श शाळा अर्थात मॉडेल स्कूल" हा शैक्षणिक स्टॉल उभारण्यात आला होता. या शैक्षणिक स्टॉलमध्ये मॉडेल स्कूलचे सादरीकरण करण्याची संधी मला लाभली. खरंतर या उपक्रमात मी अगदी निरिच्छेने सहभागी झालो होतो. परंतु, या उपक्रमात सहभागी झाल्याने मला चार नवे मित्र मिळाले. याचा मला विशेष आनंद वाटतो. त्या चार मित्रांसाठीच हा लेखन प्रपंच...


दोन दिवसांवर भारतीय प्रजासत्ताक दिन येऊन ठेपला होता. त्याची तयारी सुरू होती. अजून बरीच तयारी करणं आवश्यक होतं. त्याचाच विचार करत बसलो होतो. रात्रीचे 8 वाजले होते. अशातच वाळवा पंचायत समिती इस्लामपूरच्या विस्ताराधिकारी सौ. छायादेवी माळी मॅडम यांचा फोन आला. त्यांनी पिंपरी चिंचवड येथील कार्यक्रमात सहभागी होण्याविषयी आग्रह धरला. त्यांच्याविषयी असणाऱ्या विशेष आदरामुळे, मला नकार देताच आला नाही. अगदी इच्छा नसतानाही मी होकार दिला. दुसऱ्या दिवशी सकाळीच पुण्याला निघायचं होतं. सोबत सांगली जिल्हा परिषदेचे विस्ताराधिकारी श्री. आठवले साहेब येणार असल्याचं मॅडमनी सांगितलं. फोन ठेवताच मॅडमनी साहेबांचा नंबर पाठवला. 


श्री.आठवले साहेबांशी फोनवर बोलणं झालं. "मंगळवारी सकाळी लवकर निघायचं आहे." असं त्यांनी सांगितलं. ठरलेल्या वेळेपेक्षा निघायला थोडा उशीरच झाला. ठीक अकरा वाजता मी आष्टात पोहोचलो. अगदी काही मिनिटातच एक ईरटीगा गाडी माझ्यापुढे येऊन उभी राहिली. गाडीत बसलो तर सारेच चेहरे अनोळखी होते.


गाडीनं आष्टा सोडलं तसं, चर्चेला सूर सापडला. सर्वप्रथम मी माझी ओळख सांगितली. इतरांशी ओळख करून घेतली. 


माझ्या उजव्या बाजूला बसलेली व्यक्ती म्हणजे शिक्षण विस्तार अधिकारी श्री. रंगराव आठवले साहेब. साहेब म्हणजे शांत, संयमी स्वभाव असलेलं एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व. 


साहेब पूर्वी सैन्यात होते. येथेच त्यांनी बी.एड. पूर्ण केलं. सैन्यातील सेवानिवृत्ती नंतर अल्पावधीतच शिक्षक म्हणून रुजू झाले. नंतर स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून विस्तार अधिकारी झाले. सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर येथे त्यांची प्रथम नेमणूक. नंतरच्या काळात त्यांनी स्व: जिल्ह्यात सांगली येथे बदली करून घेतली. श्री.आठवले साहेब म्हणजे जबाबदारी अचूकपणे पार पाडणारे अधिकारीच. 


गाडी चालवत असलेली व्यकी म्हणजे श्री. संतोष गुरव सर. त्यांना मी जरा जास्तच निरखून पाहत होतो. यांना कुठेतरी पाहिलंय ? असं मला पुसटसं आठवत होतं. व्हाट्सअप वरील एका ग्रुपवर त्यांचे फोटो बऱ्याचदा पहिल्याच मला जाणवलं. शिवाय, इस्लामपूर येथील वास्तुशांतीच्या कार्यक्रमात त्यांना पाहिल्याचंही माझ्या लक्षात आलं. ही भेट त्यांना लक्षात आणून दिली. 


खरंतर गुरव सर पहिल्याच भेटीत लक्षात राहणारं व्यक्तिमत्व. कारण ही तसंच. वय वर्षे 47 पण, डोक्यावर एकही काळा केस शोधून सापडणार नाही. त्यांनी ते कलप करून काळं करण्याचा प्रयत्न केला नाही. यामुळेच तर शिक्षकांच्या समूहात अगदी वेगळे दिसणारे गुरव सर त्यांच्या केसांमुळे इस्लामपुरातील पहिल्याच भेटीत पक्के लक्षात राहिले. सर जिल्हा परिषद शाळा समडोळी नं. 2 येथे कार्यरत आहेत. एक उत्तम क्रिकेटपटू म्हणून त्यांची ख्याती आहे. नुकत्याच संपन्न झालेल्या कर्मचारी क्रीडा स्पर्धेत मिरज तालुक्याला क्रिकेटमध्ये अंतिम विजेतेपद मिळवून देण्यात त्यांना मोलाचा वाटा असल्याचं समजलं. 


गुरव सरांच्या शेजारी बसलेली व्यक्ती म्हणजे श्री.बाळू गायकवाड सर. मूर्ती लहान पण कीर्ती महान असलेलं एक हरहुन्नरी, सेवाभावी, हजरजबाबी व्यक्तिमत्व. सध्या ते जिल्हा परिषद शाळा कुपवाड नं.1 येथे कार्यरत आहेत. एक उपक्रमशील शिक्षक म्हणून त्यांची ख्याती आहे. 


श्री. नामदेव माळी साहेब लिखित "शाळाभेट" या पुस्तकात श्री.गायकवाड सर यांनी शाळेत राबविलेल्या विविध उपक्रमांचा अंतर्भाव आहे. अत्यंत विनयशील, प्रेमळ आणि निरपेक्ष भावनेने सर्वांना मदत करणारं व्यक्तिमत्व म्हणून गायकवाड सर सरांची सांगली जिल्ह्यातील शिक्षकवृंदात परिचित आहेत. 


माझ्यासाठी मार्गदर्शक असलेले श्री.राहुल पाटणे सर, श्री.सयाजी पाटील सर व माझे सहकारी शिक्षक श्री.सुहेल सोलापुरे सर यांचे अतिशय जवळचे मित्र असल्याचं समजलं. मग मला गणितातील समानतेचा सिद्धांत आठवला. त्यामुळे ते जवळचे मित्र वाटू लागले. माणसं जोडण्याचा त्यांचा छंद मला खूप भावला. 


माझ्या डाव्या बाजूला बसलेली व्यक्ती म्हणजे श्री.राजेश चोबे सर. ते मूळचे उस्मानाबादचे. काही दिवसांपूर्वी झालेल्या आंतरजिल्हा बदल्यांत ते सांगलीत बदलून आले आहेत. सध्या ते जि. प. शाळा नं.1 डिग्रज येथे कार्यरत आहेत. याच शाळेत माझा वर्गमित्र निलेश कांबळे कार्यरत आहे. 


सरांची ही दुसरी आंतरजिल्हा बदली. यापूर्वी ते स्व जिल्ह्यात कार्यरत होते. परंतु, त्यांची पत्नी रत्नागिरी जिल्ह्यात कार्यरत असल्याने आणि उस्मानाबादला बदली होण्याची शक्यता धूसर असल्याने उभयंतांनी सांगलीत बदली करून घेतली. चोबे सर म्हणजे उत्साहाचा खळखळणारा झरा. कधीच न थकणारं व्यक्तिमत्व म्हणजे चोबे सर. सादरीकरणात सरांचा कोणीच हात धरू शकत नाही. आंतरजिल्हा बदली, रोस्टर या विषयांचा प्रचंड अभ्यास असल्याचा सरांशी चर्चा करताना जाणवलं. 


खरंतर श्री.आठवले साहेब, श्री.संतोष गुरव सर, श्री. बाळू गायकवाड सर, श्री.राजेश चोबे सर हे चौघेही पहिल्यांदाच इतक्या जवळून मला भेटले होते. माझ्यापेक्षा वयाने अन् ज्ञानाने थोर आहेत. पण, दोन दिवसाच्या सहवासात अगदी जुनीपुरणी ओळख असल्याचा भास सतत होत राहिला. "जल्लोष शिक्षणाचा" या उपक्रमात सादरीकरण करता-करता दोन दिवस इतका जल्लोष केला की, आमच्यातील मैत्रीचं नातं अतिशय घट्ट झालं. जल्लोष शिक्षणाचा या उपक्रमात मला खूप काही मिळालं. त्यात हे चार नवे मित्र मिळाल्याचा अत्यानंद आहे. येत्या काळात हा स्नेह वृद्धिंगत होत राहिलं. यात शंका नाही.


धन्यवाद...!


No comments: