Sunday, January 22, 2023

असे हे कर्मवीर - कथा क्र.9 अडचणीपुढे न झुकणारे कर्मवीर

🎯 यशवंत - एक प्रेरणास्रोत
🎯 असे हे कर्मवीर - कथा क्र.9 - अडचणीपुढे न झुकणारे कर्मवीर
🎯 श्री. संदिप पाटील, दुधगांव. 9096320023.







दुधगांव ता. मिरज येथे कर्मवीर आण्णांच्या पुतळ्याचे सुशोभीकरण सुरू आहे. यानिमित्ताने संपूर्ण गाव एकवटला आहे. देणगी गोळा केली जात आहे. विविध बैठकांच्या माध्यामातून कर्मवीर आण्णांच्या आठवणींना उजाळा मिळतो आहे. यानिमित्ताने दर रविवारी आण्णांच्या जीवनातील कथा, प्रसंग, घटना "असा हा कर्मवीर" या सदराखाली "यशवंत - एक प्रेरणास्रोत" या माझ्या ब्लॉग वर प्रसारित करत आहे. 

असा हा कर्मवीर - कथा क्र.9 - अडचणीपुढे न झुकणारे कर्मवीर

1926 सालची घटना. गांधीजी साताऱ्याला येणार असल्याची बातमी कर्मवीरांना समजली. गांधीजींच्या विचारांचा जबरदस्त पगडा त्यांच्या मनावर पडला होता. त्यामुळे गांधीजी साताऱ्यात येत असल्याचा मनस्वी आनंद कर्मवीरांना झाला. त्यामुळे साताऱ्यातील वसतिगृहाचा नामकरणविधी गांधीजींच्या हस्तेच करायचे. असे त्यांनी निर्धार केला. या वसतिगृहाला छत्रपती शाहू महाराज यांचे नाव द्यायचा विचार कर्मवीरांनी आधीच पक्का केला होता. 

नामकरणविधी संदर्भात कर्मवीरांनी गांधीजींशी पत्रव्यवहार केला आणि गांधीजींचे होकारार्थी उत्तरही आले. ही बातमी गावभर वाऱ्यासारखी पसरली. कर्मवीरांच्या टीकाकारांना ही बाब रुचली नाही. त्यांचा प्रचंड जळफळाट झाला. "ही भेट कशी रद्द होईल." या दृष्टीने त्यांनी प्रयत्न सुरू केले. अखेर त्यांचे प्रयत्न यशस्वी झाले. 

" वेळेअभावी महात्माजींना आपल्या वसतिगृहास भेट देता येणार नाही." अशी तार गांधीजींच्या खासगी सचिवाची आली. असे काही घडेल. याची कर्मवीरांना अटकळ होती. पण, यावर कशी मात करायची ? याची आधीच तयारी त्यांनी केली होती. 

25 फेब्रुवारी 1927 रोजी गांधीजी साताऱ्यात सकाळी येणार होते. त्या दिवशी सकाळीच कर्मवीर आपले सर्व विद्यार्थी घेऊन, गांधीजी ज्या रस्त्याने येणार होते, तिथे ते यायची विशिष्ट वेळ साधून गेले. गांधीजींची गाडी आल्याबरोबर रस्त्याच्या मधोमध उभे राहून कर्मवीरांनी गाडी अडवली आणि विद्यार्थ्यांनी गाडीला गराडा घातला. गाडी थांबली. 

"हा काय प्रकार आहे?" अशी गांधीजींनी चौकशी केली. कर्मवीरांनी त्यांना थोडक्यात आपल्या कार्याची माहिती दिली. आधी झालेल्या पत्रव्यवहाराचा संदर्भ दिला आणि "आमच्या वसतिगृहास थोडा वेळ भेट देऊन विद्यार्थ्यांना आशीर्वाद द्या." अशी विनंती केली. गांधीजींनी ती एकदम मान्य केली. त्याप्रमाणे ते त्याच दिवशी दुपारी कबूल केलेल्या वेळी वसतिगृहात आलेसुद्धा.

1927 मध्ये कर्मवीरांचे कार्य नुकतेच सुरू झाले होते. खूप अभिमानाने इतरांना दाखवावे. असे त्याच्याकडे काहीच नव्हते. ना वसतिगृहाची स्वतःची स्वतंत्र इमारत, ना मोठा निधी, ना कर्तबगार पदाधिकारी, ना पाठराखण करणारा एखादा 'गॉडफादर'. ते स्वतः ही खूप शिकलेले किंवा विचारवंत म्हणून मान्यताप्राप्त नव्हते. देश किंवा राज्य पातळीवर सोडाच पण, खुद्द सातारा शहरापुरता विचार केला, तरी सगळ्यांनी दखल घ्यावी इतकी भरीव कामगिरी अद्याप त्यांनी उभी केली नव्हती.  

याउलट गांधीजी देशाचे सर्वोच्च नेते म्हणून निर्विवाद मान्यता पावलेले होते. कर्मवीरांच्या कार्याची स्थानिक काँग्रेसनेत्यांनी आजवर दखल घेतली नव्हती. अशा विपरीत परिस्थितीतही गांधीजींनी आपला गौरव केला. ही बाब कर्मवीरांच्या दृष्टीने 
मोठी अभिमानास्पद होती.

कुठल्याही अडचणीपुढे मान झुकविण्याचा कर्मवीरांचा स्वभाव नव्हता. त्यामुळे ते बेधडक प्रत्येक समस्येला भिडायचे. रयत शिक्षण संस्था उभी करताना, अनंत अडचणींना त्यांना सामोरे जावे लागले. पण, ते प्रत्येक समस्याला बेधडकपणे सामोरे गेले. कर्मवीरांचा हा बाणा सर्वांसाठी प्रेरक आणि मार्गदर्शक आहे. 

दुधगांव मध्ये कर्मवीरांच्या पुतळ्याचे सुशोभीकरण सुरू आहे. या कार्यात आपण सहभागी होऊन खारीचा वाटा उचलावा. हीच एक नम्र विनंती. धन्यवाद..!!!

कर्मवीर भाऊराव पाटील नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित सांगली.
शाखा-दुधगाव
ACCOUNT HOLDER NAME:
KARMVEER PUTALA SUSHOBHIKARAN SAMITI DUDHGAON
IFSCCODE:
ICIC0000104
ACCOUNT NO:
KBNP33UV3RH52219

*संपर्क*
श्री. दिपक अथने - 8857 03 61 08
श्री. कैलास आवटी - 9595 23 76 76
श्री. तेजकुमार कोले - 9403 23 04 41

धन्यवाद...!!!

No comments: