Saturday, January 14, 2023

असा हा कर्मवीर - कथा क्र.8 - त्यागमुर्ती रयतमाऊली

🎯 यशवंत - एक प्रेरणास्रोत

🎯 असा हा कर्मवीर - कथा क्र.8 - त्यागमुर्ती रयतमाऊली 

🎯 श्री. संदिप पाटील, दुधगांव. 9096320023.









दुधगांव ता. मिरज येथे कर्मवीर आण्णांच्या पुतळ्याचे सुशोभीकरण सुरू आहे. यानिमित्ताने संपूर्ण गाव एकवटला आहे. देणगी गोळा केली जात आहे. विविध बैठकांच्या माध्यामातून कर्मवीर आण्णांच्या आठवणींना उजाळा मिळतो आहे. यानिमित्ताने दर रविवारी आण्णांच्या जीवनातील कथा, प्रसंग, घटना "असा हा कर्मवीर" या सदराखाली "यशवंत - एक प्रेरणास्रोत" या माझ्या ब्लॉग वर प्रसारित करत आहे. 


कर्मवीरांचा जीवन प्रवास मांडत असताना, त्यांना सावलीप्रमाणे सोबत करणाऱ्या रयतमाऊली लक्ष्मीबाई यांचा त्याग सुद्धा मांडणं आवश्यक वाटतं. आज मकरसंक्रांती. लक्ष्मीबाईंची संक्रांतीची एक आठवण आज कथारूपाने आपणासमोर मांडतो आहे. आशा आहे नेहमीप्रमाणेच हा लेखन प्रपंच आपणांस आवडेल.


धनिणीच्या बागेत कर्मवीरांनी गोरगरिबांच्या मुलांसाठी वसतिगृहाची सुरुवात केली. खरंतर धनिणीच्या बागेत येण्यापूर्वीच, कर्मवीरांनी घरापासूनच वस्तीगृहाची सुरुवात केली होती. साताऱ्यातील भाड्याच्या घरातच या मुलांच्या राहण्याची, जेवणाची सोय केली होती. या मुलांच्या देखरेखीची जबाबदारी आपसूकच लक्ष्मीबाईंवर येऊन पडली होती. पतीच्या या शैक्षणिक कार्यात लक्ष्मीबाई सुद्धा सामील होत्या. सुरुवातीच्या काळात त्या सोवळं पाळायच्या. पण, नंतर त्यांनी ते बंद केलं.  


वसतिगृहातील कोणत्याही मुलाला काहीही कमी पडणार नाही. याची दक्षता त्या घेत. आजारी मुलाच्या उशाशी बसून रात्रभर त्याचे डोके, हात-पाय दाबायचा. एका अर्थी त्या मुलांच्या आईचं होत्या.


सन 1930 च्या मकर संक्रातीची वेळची ही गोष्ट. सणाच्या वेळी वसतिगृहात फारच बिकट परिस्थिती निर्माण झाली. वसतिगृहातील सर्व धान्य संपले होते. एक पैसाही शिल्लक नव्हता. पूर्वीची उधारी राहिल्यामुळे व्यापारी उधार धान्य देण्यास तयार नव्हते. कर्मवीर देणग्या जमा करण्यासाठी बाहेरगावी गेले होते. 


वसतिगृहातील सेक्रेटरीने लक्ष्मीबाईना ही हकिगत सांगितली. अशा बिकट परिस्थितीत काय करावे ? हे त्यांना सुचत नव्हते. आतापर्यंत वसतिगृहाच्या अडीअडचणीला लक्ष्मीबाईच्या अंगावरील जवळपास साठ तोळ्याचे तोळ्यांचे सोन्याचे दागिने विकले गेले हाते. आता विकण्यासाठी काहीही शिल्लक नव्हते. त्याचवेळी लक्ष्मीबाईंचे लक्ष गळ्यातील मंगळसूत्राकडे गेले. क्षणभर मनाची घालमेल झाली आणि लगेच त्यांनी सौभाग्याचे लेणें असलेले मंगळसूत्र काढून, सेक्रेटरीला ते गहाण ठेऊन पैसे आणण्यास सांगितले.


संक्रांतीच्या दिवशी मुले उपाशी झोपू नयेत. म्हणून, स्वतःचा सौभाग्याचा अलंकार सावकाराकडे मोडून टाकणाऱ्या लक्ष्मीबाईंचा हा त्याग नजरेआड करता येणार नाही.


लक्ष्मीबाईंना अवघं 36 वर्षाचं आयुष्य लाभलं. पण, त्या किती जगल्या ? यापेक्षा त्या कशा जगल्या ? हे फार महत्त्वाचे आहे. त्याच्या जगण्यामुळे कित्येकांच्या आयुष्याचे सोने झाले आहे. 


खरंतर कर्मवीर आण्णा व रयतमाऊली लक्ष्मीबाई यांच्या त्यागाने अनेकांच्या आयुष्याचं सोनं झालं आहे. दुधगांव मध्ये कर्मवीरांच्या पुतळ्याचे सुशोभीकरण सुरू आहे. या कार्यात आपण सहभागी होऊन खारीचा वाटा उचलावा. हीच एक नम्र विनंती. धन्यवाद..!!!


सर्वप्रथम मकर संक्रांतीच्या मनःपूर्वक शुभेच्छा...!!!


धन्यवाद...!!!

No comments: