Sunday, March 5, 2023

कथा क्र. 15 दुधगांव विद्यार्थी आश्रमचे जनक कर्मवीर

🎯 यशवंत - एक प्रेरणास्रोत

🎯 असे हे कर्मवीर - कथा क्र. 15 दुधगांव विद्यार्थी आश्रमचे जनक कर्मवीर

🎯 श्री. संदिप पाटील, दुधगांव. 9096320023.



दुधगांव चे शिल्पकार स्वर्गीय भाऊसाहेब कुदळे आणि कर्मवीरांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. या दोघांचा जिव्हाळा त्यांच्या प्रथम भेटीपासूनच निर्माण झाला होता. 


1910-11 च्या दरम्यान भाऊसाहेब कुदळे, स्व. आप्पा दादा पाटील, स्व. भाऊसाहेब खोचीकर, स्व. नानारावजी येडेकर, स्व. शामगोंडा बाबगोंडा पाटील, स्व. आमाण्णा हेरवाडे व स्व. दादा जिन्नाप्पा मद्वाण्णा मास्तर या समवयस्क तरूणांनी एकत्र येऊन दुधगांवच्या शैक्षणिक विकासासाठी "दुधगांव शिक्षण प्रसारक मंडळ" या नावाची शिक्षण संस्था स्थापन केली.


संस्था स्थापनेनंतर लगेच भाऊसाहेब कुदळे आणि आप्पा दादा पाटील अखिल भारतीय जैन परिषदेला उपस्थित राहण्यासाठी श्रवणबेळगोळ येथे गेले होते. तेथे कर्मवीर देखील होते. एकाच भागातील असल्यामुळे भाऊसाहेब कुदळे, आप्पा दादा पाटील आणि कर्मवीर एकत्र आले. चर्चा सुरू झाली. चर्चेमध्ये "दुधगांव शिक्षण प्रसारक मंडळ" चा विषय निघाला. 


कर्मवीर शिक्षणप्रेमी असल्याने "दुधगांव शिक्षण प्रसारक मंडळ" विषयी उत्सुकता निर्माण झाली. मंडळाचे कामकाज पाहण्यासाठी कर्मवीर दुधगांवला आले.


येथे मराठी शाळेतील मद्वाण्णा गुरुजी आपल्या मुलांचा सातवीच्या परीक्षेत उत्तम निकाल लागावा. म्हणून, त्यांना सायंकाळी शाळेत बोलावून अधिक अभ्यास घेत. यातूनच, 

कर्मवीरांना दुधगावला "विद्यार्थी आश्रम" नावाची अभ्यासिका सुरू करण्याची कल्पना सुचली. मद्वाण्णा मास्तरांच्या मदतीने या आश्रमाचे वसतिगृहात रूपांतर करण्यात आले. पुढे काले, नेर्ले व सातारा या ठिकाणी जी वसतिगृहे झाली, त्यांची हे वसतिगृह प्रयोगशाळा ठरली. वास्तविक पाहता रयत शिक्षण संस्थेसारख्या इतक्या मोठ्या वटवृक्षाचे मूळ दुधगांव आहे. 


कर्मवीर आणि दुधगांव यांचं एक घनिष्ठ नातं आहे. ते एकमेकांपासून कधीच विलग करता येत नाहीत. कर्मवीरांच्या देदीप्यमान कार्याची आठवण म्हणून, 34 वर्षांपूर्वी दुधगांव मध्ये एक पूर्णाकृती पुतळा उभा करण्यात आला होता. सध्या या पुतळ्याचे सुशोभीकरण करण्याचे काम गावातील तरुणांनी हाती घेतले आहे. यासाठी मोठ्या निधीची आवश्यकता आहे. या लेखाच्या माध्यमातून मी संदीप पाटील आपणांस विनंती करतो की, आपण "फूल न फुलाची पाकळी देऊन" या कार्यास हातभार लावावा. धन्यवाद...!

No comments: