Tuesday, February 28, 2023

केंद्रप्रमुख श्री. सुरेश चव्हाण साहेब यांच्या सेवानिवृत्ती निमित्ताने...

 🎯 यशवंत - एक प्रेरणास्रोत

🎯 केंद्रप्रमुख श्री. सुरेश चव्हाण साहेब यांच्या सेवानिवृत्ती निमित्ताने...

🎯 श्री. संदिप पाटील, दुधगांव. 9096320023. 


प्रशासनात काम करताना अधिकाऱ्यांना कानांपेक्षा डोळ्यांवर अधिक विश्वास ठेवावा लागतो. असे अधिकारीच दीर्घकाळ स्मरणात राहतात. कानांपेक्षा डोळ्यांवर विश्वास ठेवणारे, वरून काटेरी अन् आतून फणसासारखे गोड, आपल्या शिक्षकाची बाजू प्रशासनासमोर भक्कमपणे घेणारे, शिस्तप्रिय व्यक्तिमत्व म्हणजेच श्री. सुरेश चिंतामण चव्हाण साहेब. ते नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त 28 फेब्रुवारी 2023 रोजी केंद्रप्रमुख पदावरून सेवा निवृत्त होत आहेत. त्या निमित्ताने हा लेखन प्रपंच...



25 फेब्रुवारी 1965 रोजी पाटण तालुक्यातील चव्हाणवाडी, नाणेगाव खुर्द या अतिशय दुर्गम खेड्यात एका सर्व सामान्य शेतकरी कुटुंबात श्री.सुरेश चव्हाण साहेब यांचा जन्म झाला. अतिशय हालाखीतच त्यांची जडणघडण झाली. प्राथमिक शिक्षण चव्हाणवाडीत तर, माध्यमिक शिक्षण नाणेगाव व पाटण येथे झाले. ते अगदी अपघातानेच शिक्षक झाले.


त्यांच्या चुलत्यांनी त्यांना शिक्षक भरतीबाबत माहिती दिली. अर्ज भरण्यास प्रेरित केले. दहावीच्या गुणांवर अन्ट्रेण्ड म्हणून नोकरी मिळाली. 24 ऑकटोबर 1985 रोजी पाटण तालुक्यातील कोयनानगर भागातील अतिशय दुर्गम असणाऱ्या मळे शाळेतून त्यांचा सेवारंभ झाला. पुढे त्यांनी डी.एड. आणि बी. एड. चे शिक्षण पूर्ण केले.


सडानिनाई, सडाबोडकेवाडी, दाढोली, पापर्डे, मेष्टेवाडी आदी शाळांवर त्यांनी सेवा वाजवली. त्यांनी 37 वर्षाच्या सेवाकाळात उपशिक्षकपदी 9 वर्षे, पात्र पदवीधरपदी 16 वर्षे, वरिष्ठ मुख्याध्यापकपदी 2 वर्षे व केंद्रप्रमुखपदी 10 वर्षे काम केले. 


दिवशी बुद्रुक, मारूल हवेली, काळगाव, बेलवडे खुर्द, म्हावशी, पाटण मुले आदी केंद्राचा केंद्रप्रमुख म्हणून कार्यभार सांभाळला. केंद्रप्रमुख म्हणून कामकाज पाहत असताना, प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत दिवशी केंद्राने अतिशय देदीप्यमान कामगिरी केली. पाटण तालुक्यातील 50 केंद्रात दिवशी केंद्राने प्रथम क्रमांक पटकावला. याबद्दल मा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांचेकडून त्यांचा सन्मान करण्यात आला. हा त्यांच्या जीवनातील सर्वोच्च क्षण. 


शिक्षण क्षेत्रातील त्यांच्या या कार्याची दखल घेऊन 1998-99 साली पंचायत समिती, पाटण ने त्यांना "आदर्श शिक्षक पुरस्कार" देऊन सन्मानित केले. 


चव्हाण साहेब यांच्याशी पहिली भेट झाली ते ठिकाण म्हणजे पापर्डे होय. त्यावेळी ते दिवशी केंद्राचे केंद्रप्रमुख होते. श्री. हनुमंतराव काटे यांच्यासोबत ते *माझ्या* शाळेत आले होते. साहेबांनी या शाळेत तब्बल सात वर्षे काम केले असल्याने, या शाळेविषयी त्यांना विलक्षण जिव्हाळा होता. बदलीने काटे साहेब कराडला गेले. तेव्हा मारूल हवेली केंद्राचा केंद्रप्रमुखपदाचा अतिरिक्त कार्यभार श्री.चव्हाण साहेबांकडे आला. 


चव्हाण साहेब म्हणजे एक कणखर व्यक्तिमत्व. त्यांची स्वतःची अशी काही ठाम मतं आहेत. ते अतिशय परखड बोलणारे प्रचंड शिस्तप्रिय व्यक्ती. कानांपेक्षा डोळ्यांवर त्यांचा अधिक विश्वास असायचा. त्यामुळे एखाद्या शिक्षकाविषयी चुकीचा ग्रह त्यांनी कधीच करून घेतला नाही. वरिष्ठांकडे शिक्षकांची बाजू अतिशय सक्षमपणे मांडायचे. हे मी प्रत्यक्ष मी अनुभवलं आहे. एकदा एका व्यक्तीने माझी गटशिक्षणाधिकाऱ्यांकडे तक्रार केली. त्यावेळी चव्हाण साहेबांनी माझ्या अनुपस्थितीत, माझी बाजू भक्कमपणे मांडली. त्यामुळे झालेल्या तक्रारीचा काहीएक परिणाम झाला नाही. शिवाय गटशिक्षणाधिकारी शाळेत भेटीस आल्यानंतर "दूध का दूध और पानी का पानी" झाले.


पापर्डे शाळेत काम करताना त्यांची प्रेरणा फार मोलाची ठरली. यामुळेच येथे अडीच लाखांचा लोकसहभाग जमा करता आला. दोन डिजिटल क्लासरूम, संगणक कक्ष, शालेय रंगकाम आधी भौतिक सुविधा निर्माण करता आल्या. 


माझी पापर्डे येथून बदली झाल्यानंतरही सरांशी असलेला स्नेह कायम राहिला. त्यावेळी साहेबांनी दिलेल्या प्रेरणेच्या जोरावरच आजही जोमाने काम सुरू आहे. इथून पुढेही सुरूच राहील. श्री चव्हाण साहेबांना सेवानिवृत्तीच्या अनंत शुभेच्छा. त्यांच्या भावी वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा देतो आणि थांबतो


धन्यवाद..!


No comments: