Saturday, April 24, 2021

यशवंत - एक प्रेरणास्रोत भाग - 176

🎯  यशवंत - एक प्रेरणास्रोत

🎯  भाग - 176

🎯  श्री.संदीप पाटील,दुधगाव. 9096320023.


आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताकडून प्रतिनिधित्व करण्याची संधी लाभलेल्या आणि पहिल्याच सामन्यात गोलंदाजाच्या भेदक माऱ्याने रक्तबंबाळ झालेल्या एका 16 वर्षाच्या तरुणाची ही प्रेरणादायी कथा..

मुंबईतील एका सर्वसामान्य कुटुंबात, एका लेखकाच्या पोटी त्याचा जन्म झाला. आईवडिलांना चार अपत्ये. त्याचा क्रमांक चौथा.

तो अभ्यासात अगदीच सामान्य. पण, क्रिकेटमध्ये एकदम असामान्यच. त्याची क्रिकेटमधील आवड त्याच्या भावाने हेरली आणि वयाच्या 12 व्या वर्षीच त्याची रवानगी एका उत्तम क्रिकेट प्रशिक्षकाकडे केली. 

गुरूंनी ही त्याचे कसब हेरले. कसून सराव करून घेतला आणि त्या मातीच्या गोळ्याला आकार देवून 'देवत्व' बहाल केले. 

गुरूंच्या मार्गदर्शनाच्या आणि स्वतःच्या कर्तृत्वाच्या बळावर त्याने शालेय क्रिकेट स्पर्धेत स्वतःचा दबदबा निर्माण केला. यामुळेच वयाच्या 15 व्या वर्षीच त्याला प्रथम श्रेणी क्रिकेट स्पर्धेसाठी निवड झाली. मिळालेल्या संधीचे त्याने सोने केले. आपल्या पहिल्यावहिल्या प्रथम श्रेणी सामन्यामध्ये शतक झळकावून, पहिल्याच सामन्यात शतकी खेळी करणारा सर्वात तरुण खेळाडू होण्याचा एक विक्रम प्रस्थापित केला. 

त्याच्या या धमाकेदार खेळीने, 1988 साली वयाच्या अगदी 16 व्या वर्षीच त्याच्यासाठी भारताच्या मुख्य संघाचे दरवाजे खुले झाले. पण, आपल्या पहिल्यावहिल्या सामन्यात तो सफशेल अयशस्वी ठरला. मोठं अपयश हाती आलं. पण, त्याने हार मानली नाही. आपले प्रयत्न सुरूच ठेवले. 1990 साली त्याने आपला पहिला कसोटी सामना इंग्लंड विरुद्ध खेळला आणि इथं त्याने सर्वात तरुण वयात शतक ठोकण्याचा विक्रमही प्रस्थापित केला. या शतकी खेळीनंतर त्याने मागे वळून पाहिलेच नाही. आपल्या कर्तृत्वाच्या बळावर तो 'शतकांचा बादशाह' बनला. लोकं त्याला 'God Of Cricket' म्हणून ओळखू लागले. शतकांचे शतक ठोकणारा, 'God Of Cricket' म्हणजेच मास्तर ब्लास्टर सचिन तेंडुलकर होय. 

शोले चित्रपट सर्वानीच पहिला असेल. या चित्रपटात एक डायलॉग आहे, "जो डर गया समझो मर गया!" हे वाक्य आपल्याला खूप काही शिकवून जातं. पण, कोणत्याही समस्येला न घाबरता सामोरे गेलात, तर यश नक्कीच आपलंच असतं. असंच काहीसं सचिनच्या बाबतीतही घडलं.

पाकिस्तान सारख्या भेदक गोलंदाजांचा भरणा असलेल्या,बलाढ्य संघासोबत पहिल्या वहिल्या सामन्यात सचिनला मोठ्या अपयशाला सामोरे जावे लागले. शिवाय, या सामन्यात त्याला दुखापतही झाली. हे अपयश मनावर मोठा आघात करणारं होतं. पण, अशा प्रसंगातही तो सकारात्मक राहिला. नकारात्मक गोष्टीकडे लक्ष न देता आपल्या खेळाकडे लक्ष दिले आणि पुढे जावून तो यशाच्या शिखरावर विराजमान झाला.

सचिनने क्रिकेटमध्ये केलेल्या कामगिरी ध्यानात घेऊन भारत सरकारने त्याला 'भारतरत्न' हा मानाचा किताब देवून गौरवान्वित केले आहे. हा पुरस्कार मिळणारा तो प्रथम खेळाडू तर आहेतच. शिवाय, सर्वात तरुण व्यक्तीही आहे. म्हणूनच,तो एक यशवंत आहे. 

आज 24 एप्रिल या "क्रिकेटच्या देवाचा" वाढदिवस आहे. त्याला वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा !


*कृपया ब्लॉग फॉलो करा....*


इथेच थांबतो. उद्या पुन्हा भेटू.

तोपर्यंत नमस्कार.


धन्यवाद..




No comments: