Wednesday, March 23, 2022

हृदयातला श्रीराम

हृदयातला श्रीराम


श्री. श्रीराम रणसिंग सर यांना जाऊन आज एक वर्ष पूर्ण होत आहे. त्यांची आठवण आली नाही, असा एकही दिवस आजवर उजाडला नाही. गेल्या वर्षभरात क्षणाक्षणाला त्यांची उणीव भासली. वर्षपूर्ती च्या निमित्ताने त्यांच्या आजवरच्या जीवन प्रवासाच्या आठवणींचा संग्रह पुस्तक रूपाने प्रकाशित होतो आहे. या पुस्तकात लिहिलेला हा लेख "हृदयातला श्रीराम..."

काही व्यक्तींचा सहवास हा परिसासारखा असतो. त्या व्यक्तींच्या सहवासात,सानिध्यात गेलं की, आयुष्याचं सोनं होतं. आपल्या आयुष्याचं सोनं करणाऱ्या अशा व्यक्तींना आपल्या "हृदयात" अढळ स्थान असतं. प्रत्येकाच्या आयुष्यात अशा व्यक्ती असतात, ज्या हृदयाच्या एका कप्प्यात कायम असतात. माझ्याही हृदयात असलेलं, व्यक्तिमत्त्व म्हणजे श्री.श्रीराम रणसिंग. त्यांच्या अकाली जाण्याने, माझं किती नुकसान झालं आहे ? हे मोजता येणार नाही. त्यांच्याच आठवणीत लिहिलेला हा लेख म्हणजेच "हृदयातला श्रीराम."

हरेकाच्या अडचणीत धावून जाणारं,अडचण कसलीही असो मार्ग शोधणारं,योग्य दिशा दाखवणारं, मैत्रीचं नातं जोडणारं अन् जपणारं, विद्यार्थी, पालक, शिक्षक अन् अधिकारीप्रिय असणारं, प्रत्येकाला हवंहवंसं वाटणारं व्यक्तिमत्व म्हणजे श्रीराम रणसिंग. 

सरांची आणि माझी पहिली भेट झाली, ते ठिकाण म्हणजे जि.प.शाळा पापर्डे. मी नव्यानेच हजर झालो होतो. मारुल हवेली केंद्राचे शालार्थचे काम सर बघायचे. माझी भेट घेण्यासाठी व पगार काढण्यासंदर्भात चर्चा करण्यासाठी ते आले होते. सोबत श्री.तुषार दाभाडे सरही होते. नंतर भेटींचा सिलसिला वाढतच गेला. विविध कार्यक्रम, स्पर्धा, प्रशिक्षण, जुनी पेन्शन मागणी मोर्चाच्या निमित्ताने अनेकदा एकत्र आलो. 'विचार जुळले की, मने जुळायला वेळ लागत नाही.' आमच्या बाबतीतही असेच घडले. आम्ही एकमेकांचे जिवलग मित्र कधी बनलो ? हे आम्हालाही कळालं नाही.

रणसिंग सरांची निर्णय घेण्याची क्षमता अतिशय जबरदस्त. ते उत्तमोत्तम सल्ला देण्यात माहीर. व्यक्तीची पारख करण्याची कला त्यांना अवगत होती. एखाद्या व्यक्तीबद्दलचा त्यांचा अंदाज शक्यतो चुकायचा नाही. निडर, निर्भिड, स्पष्टवक्ता हे त्यांच्या व्यक्तिमत्वाचे पैलू मी जवळून अनुभवले आहेत. 

रणसिंग सर जसे धाडसी अन् निर्भीड होते, तसे ते संवेदनशीलही होते. एखाद्या भावूक प्रसंगात चटकन त्यांचे डोळे भरून यायचे. तब्बल पाचवेळा असे भावनिक प्रसंग मी प्रत्यक्ष अनुभवले आहेत.

मल्हारपेठ येथे एका बीटस्तरीय प्रशिक्षणात सर्व शिक्षकांना आपल्या जीवनातील आनंदाचा अन् दुःखाचा प्रसंग सांगावयाचा होता. त्यावेळी सर वाई तालुक्यातील दत्तवाडी सारख्या दुर्गम शाळेतील प्रसंग सांगत होते. ते प्रसंग सांगत असताना सरांच्या डोळ्यातून अश्रूधारा वाहत होत्या. दत्तवाडी हा त्यांच्या जिव्हाळ्याचा विषय होता. तिथल्या आठवणींनी त्यांना गलबलून आलं होतं.

रणसिंग सर व मी अधिक जवळ येण्याचा दुवा म्हणजे माझा डी.एड.ला ज्युनिअर असलेले मित्र जिवंधर मलमे होय. मलमे सरांची बदली गारवडे येथे झाली होती. त्यामुळे माझे गारवडे शाळेत वरचेवर जाणं व्हायचं. मलमे सरांच्या सोबतीने रणसिंग सर गारवडे शाळेला नवा रंग चढवत होते. दोघेही राहायला कराडला असल्याने, ते एकच वाहनावरून प्रवास करायचे. नेहमी सोबत असल्याने, चांगला जिव्हाळा निर्माण झाला होता. परंतु, अल्पावधीतच मलमे सरांची आंतरजिल्हा बदली सांगलीत झाली. त्यांना बदली नको होती. बदली रद्द करण्यासाठी रणसिंग सरांनीही प्रयत्न केले. परंतु, बदली रद्द झाले नाही. शेवटी निरोपाची वेळ आलीच. निरोप देताना सरांचा कंठ दाटून आला होता. हे दुसऱ्यांदा घडत होतं.

जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी सरांसोबत दोनदा मुंबईला जाणं झालं. 2018 साली जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी दिंडी निघाली. ही दिंडी मुंबईत पोहोचणार होती. पाटण तालुक्यातून अनेक शिक्षक बांधव या दिंडीत सामील होण्यासाठी निघाले होते. आम्ही दोघंही या दिंडीत सामील झालो. सरांसोबत तीन दिवस मुंबईत राहणं झालं. सरांचे मेहुणे मुंबईत पोलीस होते. त्यांच्या खोलीत दोन रात्री राहिलो. या दिंडीतून थोडासा वेळ काढून आम्ही एलिफंटा लेणी पाहण्यासाठी गेलो. बोटीतून प्रवास करताना आम्हांला एक परदेशी मित्र मिळाला. त्याच्या सोबत गप्पा मारत पुढील प्रवास केला. संपूर्ण लेणी परिसर त्या परदेशी पाहुण्यासोबतच आम्ही फिरलो. शेवटी त्या पाहुण्याचा निरोप घेण्याची वेळ आली, तेंव्हा सरांना गहिवरून आलं होतं. अगदी अल्प काळासाठी झालेली ती भेट. पण, त्या मित्राला त्यांनी आपल्या ह्रदयात जागा दिली होती. 

माझ्या पत्नीचा गर्भपात झाला, त्यावेळी सांत्वन करताना आणि 2018 साली माझी बदली पापर्डे येथून कडवे बु. येथे झाली, त्यावेळी निरोप देताना, सरांच्या डोळ्यात माझ्यासाठी पाणी आलं होतं. 

खरं तर डोळ्यात पाणी कुणासाठी येतं ? ज्याला आपण आपल्या हृदयात सामावून घेतो त्याच्याचसाठी... सरांच्या डोळ्यात माझ्यासाठी दोन वेळा पाणी आलं होतं. मी स्वतःला खूप भाग्यवान समजत होतो. कारण,त्यांनी मला आपल्या हृदयात जागा दिली होती. मी खुप सुखी होतो. परंतु त्या क्रूर नियतीला माझं हे सुख बघवलं नाही. तिनं माझं हे सुख हिरावून नेलं. सर दूरच्या प्रवासाला निघून गेले. उरल्या फक्त त्यांच्या आठवणी....

संगणकावर, सरल पोर्टलवर काम करताना, मोबाईल, लॅपटॉप, प्रिंटर खरेदी करताना सरांची अनमोल मदत व्हायची. गेल्या वर्षभरात त्यांची प्रचंड उणीव भासली अन् पुढेही भासत राहिल. पाटण-साताऱ्याच्या रस्त्यावरून ये-जा करताना, सर राहायचे, त्या इमारतीकडे गाडीची चाकं हमखास वळायची. हसतमुखानं स्वागत व्हायचं. रणसिंग मॅडम देखील तितक्याच प्रेमानं हवं-नको ते पाहायच्या. परतताना दोघंही गाडीपर्यंत सोडायला यायचे. पण, आता सारं बदललं. वर्षभरात कित्येकदा पाटण-साताऱ्याच्या रस्त्यावरून येणं-जाणं झालं. प्रत्येकवेळी सर राहायचे, त्या इमारतीकडे नजर वळाली. पण, गाडीची चाकं वळली नाहीत. कारण....

रणसिंग सरांना जाऊन वर्ष होत आलं. पण, इतक्या दिवसांत सरांची आठवण आली नाही, असा एकही दिवस उजाडला नाही. खूप साऱ्या आठवणी मागे ठेवून, ते पुढच्या प्रवासाला निघून गेले. ते जरी हयात नसले, तरी ते माझ्यासाठी जिवंत आहेत, "हृदयाला श्रीराम" बनून...

श्रीराम रणसिंग सरांच्या सहवासात आल्यानं माझ्यात काही अंशी बदल झाला आहे. माझी विचार करण्याची अन् काम करण्याची पद्धत यात अमुलाग्र बदल घडला आहे. जे माझ्या बाबतीत घडलं आहे, तसं ते अनेकांच्या बाबतीतही घडलं आहे. त्यांचा सहवास, परिसस्पर्श अनेकांना लाभावा, जीवनात बदल घडावा. यासाठी श्री.श्रीराम रणसिंग सरांना मनुष्य रूपाने पुन्हा एकदा जन्म मिळावा. हीच माझी ईश्वरचरणी प्रार्थना आहे. इथंच थांबतो...

धन्यवाद...

1 comment: